*खेळाडू हे आपल्या राष्ट्राची संपत्ती आहेत: शशांक तळेकर*
(तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी वक्तव्य)
कणकवली / तळेरे:
खेळ खेळल्याने विद्यार्थ्यांना त्यांचा स्वाभिमान, सामाजिक कौशल्य, आत्मविश्वास सुधारण्यास मदत होते,त्यांना वेळेचे महत्व व्यवस्थापन आणि जीवनात शिस्तीचे समजून येते .खेळ विद्यार्थ्यांना तणाव आणि नैराश्य कमी करण्यास मदत करते. म्हणजेच सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच खेळाडू हे आपल्या राष्ट्राची संपत्ती आहेत असे प्रतिपादन तळेरे माजी सरपंच शशांक तळेकर यांनी करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या, ते वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळेरे येथील तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर,शाळा स.सदस्य शरद वायंगणकर,प्रविण वरूणकर, उमेश कदम,निलेश सोरप,प्राचार्य अविनाश मांजरेकर,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, माजी सरपंच चंद्रकांत तळेकर, डॉ.धनश्री जाधव, प्रशालेचे क्रीडा शिक्षक नवलसिंग तडवी, जेष्ठ क्रीडाशिक्षक दत्तात्रय मारकड तसेच तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक व खेळाडू संघ, स्व.सुनिल तळेकर वाचनालय अध्यक्ष राजू वळंजु, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका सुचिता तळेकर,इ.उपस्थित होते.
याप्रसंगी कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्राचार्य अविनाश मांजरेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेस सुरवात झाली. स्पर्धेसाठी पहिल्या दिवशी 14 व 19 वर्षांखालील मुले-मुली यांचे एकूण वीस संघ स्पर्धेत उतरले.स्पर्धेसाठी प्रज्ञेश निग्रे,राज कांबळे,प्रविण पडेलकर यांनी पंच म्हणून काम पाहिले.
प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी प्रास्ताविकेमधुन खेळ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे.खेळाचे महत्व आपल्या दैनंदिन जीवनात अनन्यसाधारण आहे,असे सांगितले. कणकवली तालुका क्रीडा समन्वयक बयाजी बुराण यांनी खेळाची नियमावली आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांसमोर मांडली.
स्पर्धेसाठी गेले चार-पाच दिवस मेहनत घेऊन प्रशालेचे क्रीडाशिक्षक नवलसिंग तडवी व विद्यार्थी यांनी उत्तम असे क्रीडांगण तयार केले. उद्घाटन प्रसंगी सूत्रसंचालन व आभार प्रशालेचे प्राध्या. सचिन शेटये यांनी मानले.