*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्र वेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम ललित लेख*
*”साद माझ्या मनातली”*
अगं, अगं, अगं…थांब
जरा माझं ऐकून तरी घे..
बघ,
गेलीस ना निघून..?
तुझं हे असं असतं, क्षणात राग येतो अन् आवरताही येत नाही..
असा नाकावर राग असणं बरं नव्हे गं..!
मी बोलत, विनवित, तुला साद घालीत राहिलो अन् तू माझ्याकडे एकही कटाक्ष न टाकता पाठ फिरवून निघून गेलीस..
जाताना एकदाही मागे वळून नाही पाहिलंस..
खरंच गं..! एका क्षणात मी तुला एवढा परका झालो..?
माझ्याकडे फिरून एकदा पहावे असेही तुला वाटले नाही..?
एवढी तू निष्ठुर झालीस..?
छे.. छे… कित्ती हे प्रश्न..!
भावनांनी ओतप्रोत भरलेल्या मनाच्या खोलवर डोहातून अजुनी एक एक प्रश्न डोकं वर काढत मजकडे डोकावून पहात होता.. तू रुसून माझ्यापासून दूर होण्याची कारणे शोधत तू परतशील याच आशेवर निस्तेज असलेल्या डोळ्यांच्या सताड उघड्या पापण्यांवर उद्याच्या सोनेरी क्षणांची स्वप्ने सजवत होता ..
कधीतरी तू येशील..सागराच्या गर्भातून फेसाळत येणाऱ्या लाटेने हळुवार किनाऱ्याच्या कुशीत शिरावे अन् किनाऱ्याशी तिचे मिलन व्हावे, क्षणात दोघांनी एकरूप व्हावे.. तशीच तू नकळत येशील नि अलगद माझ्या मिठीत विसावशील ही आस मनाशी घर करून होती.. देह जरी निराळे असले तरी आपले श्वास एकच होते…हे हृदय केवळ तुझ्यासाठीच धडधडत होते..तीच हृदयाची धडधड पुन्हा तुला माझ्याकडे खेचून आणेल ही वेडी आशा कुठेतरी मनाच्या तळाशी निपचित पडून होती..
तू आलीस… अन् मी आनंदून गेलो.. गुलाब पुष्पावर पहाटे सांडलेले दवबिंदू सूर्याच्या कोमल किरणांचे स्वर्ण लेवून उजळून जावेत.. तसाच निस्तेज पडलेला माझा चेहरा तुझ्या येण्याच्या कल्पनांनीच तुझ्या ओठांची लाली पिऊन लाल गुलाबी झाला..
पण..,
तू आलीस ती केवळ तुझ्या मनात भडकलेला अग्नी शांत करायला अन् मला त्या ज्वाळांची धग पोहचवून जळताना पहायला..!
तुझ्या एका हास्यासाठी मी जीव ओवाळून टाकला अन् तुझ्यातील भडाग्नीवर तू माझाच जीव जाळून पाहीला.. मी तरीही राहिलो शांत, निश्चयी, निर्मळ.. ग्रीष्मात आटलेल्या नदीच्या पात्रातील खोल डोहात साठून राहीलेल्या पाण्यागत..! वादळ, वारा झेलून सुद्धा एकही तरंग उठला नव्हता माझ्या अंतर्मनावर…मी तसाच होतो.. निर्विकार, निश्चल..!
तुझा गोरापान हसरा मुखडा जणू “चाँद का तुकडा”, सुडौल रेखीव बांधा अन् तुझ्या पाठीवर मुक्तपणे खेळणारे लांबसडक सोनेरी रेशमी कुंतल.. नजरेसमोर येताच प्रत्येक क्षणी मज तुजपाशी आकर्षून घेत होते.. वेडापिसा करत होते..
पण…,
तुझ्या रेशमी केसांमध्ये मी माळलेला बकुळ फुलांचा नाजूक गजरा जेव्हा कुस्करून तू फेकून दिलास तेव्हा तुझ्यासाठी तळमळणाऱ्या काळजात धस्स झालं.. मी पुरता हादरून गेलो..
जशी पायाखालून जमीन सरकून जावी अन् हवेत तरंगत कुठेतरी दूरवर फेकले जावे…अगदी तसाच मी तुझ्यापासून दूर दूर फेकला गेलो.. दिवसा उजेडी लख्ख तेजस्वी सूर्यप्रकाशात मी अंधारही पाहिला..
पण, तू तुझी स्वप्ने डोळ्यांच्या पापण्यांवर घेत निवडलास तुझ्यासाठी अपुल्या अंगणी धवल केशरी प्राजक्त फुलांच्या पायघड्या घालणारा.. तुझ्या कुंतलात नाजूक कोमल सुगंधित मोगऱ्याचा गजरा माळणारा, तुला प्रिय असलेला जीवनसाथी..!
अंगणी परसात फुलणाऱ्या सुगंधित मोगऱ्याचा गजरा रानावनात फुलणाऱ्या बकुळ फुलांपेक्षा कितीतरी किंमती मौल्यवान वाटला तुला..
खरंच.., तू मिळविलेल्या किंमती मौल्यवान फुलांनी स्वतःला भाग्यवान समजत गेलीस..
पण, किंमती मौल्यवान फुले देणारे साद घालतात मनाला केवळ स्वार्थासाठीच..! क्षणिक भाळतात सौंदर्यावर.. अन् आस्वाद घेऊन चुरगळून फेकून देतात कोमेजलेला गजरा फेकावा तसाच..!
तुला खरं प्रेम समजलंच नाही.. तू केलास तो केवळ एक व्यवहार..! अन् तुझ्याशी झाला तो फक्त व्यापार..!
मी पुन्हा पुन्हा साद घालत राहिलो..पण तू एकदाही ऐकली नाहीस ‘साद माझ्या मनातली..’
तू चालत राहिलीस त्याच रस्त्यावर जिथे तुझ्यासाठी घातल्या होत्या सुगंधाने भारलेल्या पायघड्या…
पण, त्या प्राजक्त फुलांच्या पायघड्या तुझी नाजूक कोमल पाऊले पडताच चुरगळून, कोमेजून गेल्या अन् सकाळच्या सूर्याच्या कोवळ्या उन्हात तर पार करपल्या, स्वतःचे अस्तित्वच हरवून बसल्या..
खरंच गं.., जे मोहक दिसतं ते टिकणारं नसतं.. दिखावा असतो तो केवळ आकर्षून घेण्यासाठीचा..!
तू त्या दिखव्याला भुललीस..
तुला आठवतंय का.. तू कुस्करून फेकलेला मी तुझ्या कुंतलांमध्ये माळलेला बकुळ फुलांचा गजरा..?
मी आजही मनाच्या गाभाऱ्यात ती चुरगळलेली, कुस्करलेली बकुळ फुले जपून ठेवलीत..
ज्या बकुळ फुलांच्या गजऱ्याचा सुगंध सुकल्यावरही चिरकाल टिकतो.. त्यांनाच तू लाथाडलंस अन् जवळ केलास मनमोहक शुभ्रधवल मोगरा..!
तू विसरलीस का गं..? मोगऱ्याचा गंध नि तारुण्य केवळ एकाच दिवसांचे असते..
सायंकाळ होताच तो कोमेजतो..अन् रात्रीच्या अंधारात लुप्त होतो..
अखेरीस, तू उरलीस.. एकटीच..!
अन् शेवटी तू माझ्या मनाला साद घालू लागलीस.. पण, तेव्हा मी, तू चुरगळून, कुस्करून फेकलेली तीच सुगंधी बकुळ फुले माळली होती केवळ माझ्या अंतर्मनावर प्रेम करणाऱ्या माझ्या प्रियेच्या नाजूक रेशमी बटांवर..!
सदैव गंध उधळीत राहण्यासाठी…!
© दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६