महिलेची आर्थिक फसवणूक करून मारहाण
मालवण
महिलेची आर्थिक फसवणूक तसेच कोयत्याने दुखापत केल्याप्रकरणी योगेश गोपाळ चव्हाण (वय ३२ रा. आडवण देउळवाडा) याच्या विरोधात मालवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संशयितास अटक करून मंगळवारी मालवण न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी अभिनोक्ता अॅड तुषार भणगे यांनी काम पाहिले.
फिर्यादी महिला व संशयित योगेश गोपाळ चव्हाण (३२ रा. आडवण देउळवाडा) हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी महिलेचा पाच वर्षाचा मुलगा असून आजारी आहे. पती मयत झाल्याने त्या विरार येथे राहण्यास गेल्या. विरार येथे संशयित योगेश चव्हाण याच्याशी ओळख झाली. योगेश चव्हाण याने लग्नाची मागणी घातली. तेव्हापासून योगेश चव्हाण व त्या एकत्र विरार येथे राहात होते. योगेश याने त्यांच्या मुलाची व त्यांची सर्व जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली. मुलाला दवाखान्यात नेणे, त्याची काळजी घेवून विश्वास संपादन केला. त्यानंतर योगेश चव्हाण हा त्यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करत असे. त्यांचे सोने योगेश चव्हाण याने परस्पर गहाण ठेवून त्यातून आलेले पैश्याच्या विनियोग कसा केला याची माहिती दिली नाही.
योगेश माझगाव डॉक येथे नोकरीत होता. तेथे परमंट होण्यासाठी त्याला पैशाची गरज असल्याचे सांगून त्याने त्या महिलेचे मंगळसूत्र, फोर व्हीलर गाडी गहाण ठेवून पैसे घेतले. तसेच तिच्याकडील दुसरी फोर व्हीलर विकून पैसे घेतले. मुलगा वारंवार आजारी असल्याने व त्याची जबाबदारी योगेश चव्हाण घेत नसल्याने तसेच उलट वारंवार पैशाची मागणी करत असत्त्याने महिलेने योगेशला संपर्क न ठेवणे बाबत सांगितले. ती मालवण तालुक्यातील एका गावात काकांकडे राहायला आली. याचा राग आल्याने २३ जुलै २०२४ रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ती राहत असलेल्या तिच्या काकांच्या घरी जावून योगेश याने घरात घुसून जोरजोराने शिवीगाळ करु लागला. त्याच्याकडील कोयत्यासारखा हत्यार काढून महिलेवर वार केला, त्यावेळी कोयत्याची मूठ तिच्या डोक्याला लागली. त्याने पुन्हा तिच्या गळ्यावर मारण्याच्या उद्देशाने वार केला. तेव्हा काका यानी त्याचा वार अडवला. त्यांच्या करंगळीला जखम झाली त्यानंतर आरडाओरडा झाल्याने संशयित योगेश चव्हाण तेथून पळून गेला.
आरोपी योगेश चव्हाण याने महिलेकडील सोन्याची चैन ज्या सोनाराकडे गहाण ठेवल्याचे सांगितले होते. त्या सोनाराकडून एक सोन्याची चैन त्यात गणपतीचे सोन्याचे लॉकेट जप्त करण्यात आले. अशी माहिती पोलीस प्रशासन व वकील यांच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे