*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार यांच्या “अप्रतिम” काव्यसंग्रहाचे डॉ.प्रतिभा जाधव यांनी केलेले पुस्तक परीक्षण*
काव्यसंग्रह- ‘अप्रतिम’
कवयित्री-प्रा.सुमती पवार
प्रकाशक- वैशाली प्रकाशन, पुणे
प्रकाशन- २०२१
एकूण पृष्ठ- १४८
मूल्य रु. १५०
*निरामय जगण्याची सकारात्मक कविता: ‘अप्रतिम’*
🖊️-डॉ.प्रतिभा जाधव
————————————
साहित्यिक सुमती पवार हे अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात असलेलं नाव आहे. बालकविता,स्फुट, लावणी इ.लेखनप्रकारांत त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या आजवर तीस साहित्यकृती प्रकाशित आहेत. त्यांचे ‘सुमतीचे श्लोक’ हेही संस्कार मूल्य पेरणारे लेखन आहे. या साहित्याच्या निमित्ताने सुमती पवार यांचे जीवनानुभव वाचताना वाचकांना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो. त्यांच्या ‘अप्रतिम’ ह्या काव्यसंग्रहात एकूण ९८ कविता आहेत. श्रावण देखाव्यापासून ते बाभळीच्या झाडापर्यंत विविध विषय त्यांनी ह्यात हाताळलेले आहेत. त्या म्हणतात, “ह्या कवितांमध्ये आयुष्यावर भाष्य आहे. प्रेमकविता, चांदण्यांचे कवडसे आहेत आणि अजून बरेच काही जे वाचकांना आनंद देईल, सुखावेल.”
आज आयुष्याच्या सायंकाळी अनुभव, ज्ञान, समाधान यांनी समृद्ध झालेल्या सुमतीताई पवार सातत्यपूर्ण लेखन करत आहेत. उमेश शिंदे यांच्या आवाजात त्या कवितांचे अभिवाचन रसिकांमध्ये लोकप्रिय आहे. रसिकांच्या उदंड प्रेमाच्या त्या धनी झालेल्या आहेत. ‘अप्रतिम’ ह्या काव्यसंग्रहामध्ये त्यांनी जीवनाचा अनुभव मांडला आहे. थोड्याफार फरकाने जवळपास सर्वांचे अनुभव सारखेच असतात. मानवी जीवनाशी संबंधित जवळपास सर्वच विषयांना त्यांनी कवितेतून स्पर्श केलेला आहे. झाडे, पाणी, फुले, निसर्ग, कृपा-अवकृपा, प्रेम,राग, द्वेष, चराचर,मानवी वृत्ती-प्रवृत्ती, मैत्र, नातेसंबंध असे नाना विषय वाचायला मिळतील. कोरोनाकाळामध्ये अंतर्मुख होऊन त्यांनी लिहिलेल्या कविताही यात आहेत. त्या लिहितात की,
‘सगे ना सोयरे फिरके ना कोणी, स्मशानी ही आहे पाहा आणीबाणी
कुणी तो बिचारा ठेवतो निखारा, कुणी देत नाही मुखातही पाणी’
अस्मानी सुलतानिशी लढताना बळीराजाला अगणित समस्यांना तोंड द्यावे लागते. अवर्षण-दुष्काळ असला की त्याच्या भोवती अनेक अडचणींचा घेराव पडतो. यासंदर्भात त्या लिहितात कि,
‘पाऊस पडू दे पडू दे दुथडी भरून वाहू दे, शेतकऱ्यांच्या घागरी सांडू दे ये
रे येरे तू पावसा देई साऱ्यांना दिलासा किती, सालापासून रे नाही तुझा भरवसा
रे येरे येरे तू पावसा,
सारीकडून नाडला शेतकरी किदरला, साऱ्या जगाचा पोशिंदा पार उघडा पडला
नाही दया माया कुणा नाही कुणी विचारत, शेत नांगर वखर टाकले का खत?
येरे येरे तू पावसा….’
कवयित्रीच्या जाणीवे-नेणीवेत घट्ट रुजलेले ‘कापडणे’ गाव त्यांच्या कवितेतही दिसते. तिथल्या आठवणींबद्दल त्या लिहितात की,
‘जेव्हा जेव्हा आठवतं मला माझं गाव, कीर्त काय सांगू कापडणं त्याचं नाव
भरीव तो आहे पहा, मोठा इतिहास , पंचक्रोशीमध्ये आहे, गाव माझं खास
देशासाठी वेडेपिसे झाले होते सारे , गावामध्ये वाहती हो क्रांतीचेच वारे
घरावर ठेवूनी हो जळता निखारा, प्यारा होता फक्त आम्हा हिंदुस्तान सारा’
मानवी जीवनात अनेक मोहाचे फसवे क्षण येतात आणि क्षणात आयुष्य उद्ध्वस्त करून जातात आणि त्या नाजूक वळणावर मन आणि बुद्धी जागृत ठेवली तर माणसाच्या आयुष्याची वाताहत होत नाही. कुविचार, कुसंगती, व्यसन अशा मोहात फसू नये म्हणून,
‘मोहाचे क्षणी किती ते येती करुनी जाती माती, अरे अरे रे अरे माणसा शुद्ध ठेव तू मती
वाट वाकडी कधी नसावी घेऊन जाते विलया, नेकी निती सद्सद्विवेक रोखतात प्रलया
घराघरातून नांदो शांती वाढत जावो प्रीती, अरे अरे रे अरे माणसा शुद्ध ठेव तू मती’ अशा शब्दात कवयित्री भवतालास सजग करू पाहाते.
आई आणि वडील यांच्यावर कविता न लिहिलेला कवी विरळाच असेल तद्वत सुमती पवार यांची लेखणीही यास अपवाद नाही. त्या आपल्या ‘माय’ विषयी लिहितात की,
‘माय माऊलीची माया जशी आभाळाची छाया, तुझ्या सावलीत आई जन्म जात नाही वाया
तुझे कर्तृत्वच थोर घेते सांभाळून सारे, तुला पाहून पळती दुरूनच विषवारे
तुझ्या मायाळू डोळ्यात सारे विश्व सामावते, राबराबते घरात बाहेरही कमावते
नाही कष्टाला गं सीमा सारे मुकाट सोसते, एका पदरात सारे घर बांधून ठेवते’
लावणी व प्रेमकविता या कविताप्रकारांतही सुमती पवार यांचा हातखंडा आहे. त्यांच्या कविता ह्या गेयता व जात्याच एक लय घेऊन येतात. याचे उदाहरण म्हणजे ‘ते भाव साजणा’ ही कविता-
‘पाहून हसला तू मज घातले उखाणे ते भाव साजणा रे मी झेलले सुखाने
नजरेत भाव तुझा किती प्रेम सांडलेस,हा आप्त भाव माझा कळला तुला लगेच
परिमल तो सुगंधी ती मोगरा दुकाने, ते भाव साजणा रे मी झेलले सुखाने’
हाच प्रीतभाव पुढे नेत आपल्या सख्याला पुढील कवितेत त्या म्हणतात की,
‘फुले वेचिता गंध त्याचा मला, कशी सावरू तू जरा सांग ना मला
फुलासवे येतेस सय राजा तुझी रे, गंध वेडे फुल बघा होई बावरे रे
झुळूक येता वाऱ्याची भुलवी मला, कशी सावर तू जरा सांग ना मला’
अश्रू एक तर अत्यानंदात येतात किंवा अति दुःख वेदना झाल्यावर वाहतात आणि ते कधीही खोटं बोलत नाहीत कारण बाह्यपरिस्थितीला आंतरिकभावाने दिलेली ती विव्हल उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते. याबद्दल सुमती पवार लिहितात की,
‘हा आसू आहे पहा किती अनमोल काही न बोलता खरे सांगतो
मनामनातील सल हा आसू आहे पहा
मुकी वेदना झरझर सांडे काही न बोलता बोल
अंतरातले येई बाहेरी दडविले जे खोल’
आपण सर्वजण अंतिमत: व प्रथमतः भारतीय नागरिक आहोत. या देशाप्रती आपल्या मनात ओतप्रोत निष्ठा, प्रेम व श्रद्धा भरलेली आहे. ही भावना आपल्या कवितेत व्यक्त करताना सुमती पवार लिहितात की,
‘अंधारात या नकाच राहू चला उजळूया दिशा ,एक राष्ट्र एक वेष हो करूया एक भाषा
रक्त तर हो आहे एकच, रंग लाल त्याचा , राष्ट्राला घडवू या सारे राखू मान तिरंग्याचा’
त्यानंतर मानवी आयुष्याचे खरे स्वरूप सांगताना त्या लिहितात की,
‘गुढ गहन ते आयुष्याचे पुस्तक आहे पाने उलटत जो तो मागे वळूनी पाहे
पुढची पाने असती कोरी माहीत नसते काही, म्हणून बघती उलटून पुन्हा ते मागील शाई
भूतकाळाच्या अंधारी ते खूप कवडसे, डोकावून तो उगाच टाकी पहा उसासे
टपटप येती डोळ्यांमधूनही आठवणी त्या, उलगडतांना मनात गोंधळ धुसफुसती त्या’
आपल्या कवितेविषयी कवीलाही काही नाजूक-हळवे वाटत असते. तद्वत सुमती पवार आपल्या कवितेबद्दल भावना व्यक्त करतात,
‘कविता माझी फुलपाखरू पहा आभाळी उडते , ती अशी तशी ना चंद्र सूर्यावर जडते
लेऊन रुपेरी पंख, मोहवते दामिनी बनून आकाशी गडगडते
ती गंध फुलांचा आसमंत दरवळते ती दवबिंदू हो सूर्यकिरण पांघरते
ती पाचू बनूनी हिरवाईचा शालू रेशीम बनुनी धुक्यातही विरघळते’
शब्द हे शस्त्रापेक्षाही धारदार असतात आणि त्याची जखम ही खोलवर होते. एकवेळ शस्त्रामुळे शरीरावर झालेली जखम बरी होईल परंतु मनाला शब्दामुळे झालेली जखम मात्र ताजीच राहते. त्याबद्दल कवयित्री लिहिते की,
‘व्रण कधीही मिटत नाही विसरत नाही कुणी, भले कुणीही किती म्हणू दे आम्ही सोडले पाणी
लाटा येती अपमानाच्या रक्त उकळले मनी, बोलणारा विव्हल करतो, ताठ्याचा तो धनी
चरचर कापत जाती शब्द जिव्हारी लागती आणि म्हणे हो विसरून जावे सुज्ञ सारे सांगती’
माणसांच्या विविध वृत्तीप्रवृत्तीच्या अनुभूती घेतल्यानंतर सुमती पवारांच्या लेखणीची प्रगल्भता परिपक्वता वाचकांना संदेश देते ,
‘कधीकधी शांत राहणेच पहा बरं असतं
सगळ्या प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात
आपले अंदाज चुकतात आणि माणसे मग फसतात
तुम्ही शांत राहताच वादळ गपगार होतं’
अशाप्रकारे एकूणच सुमती पवार यांची कविता सहज सुलभ व सुंदर भाषाशैलीत विभिन्न विषय घेऊन येते. ती आल्हाददायक आहे तेवढीच अंतर्मुख करत, नैराश्य झटकून आयुष्याकडे निरामय व सकारात्मकतेने बघण्याची दृष्टी, धाडस व बळ देते.
*-डॉ.प्रतिभा जाधव*
pratibhajadhav279@gmail.com