You are currently viewing माझे गांव कापडणे…

माझे गांव कापडणे…

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*३५) माझे गांव कापडणे…*

 

मंडळी, लग्न तर झाले. गावाची व घराची ही

हौस झाली. पण एवढे मोठे लग्न! हौसेला मोल

नसते हो.. पण कर्ज किती झाले होते माहित नाही. मी तर ते कळण्याइतकी मोठी नव्हतेच.

त्यामुळे मला ते कधीच समजले नाही. अप्पांचे

शेती, राजकारण, समाजकारण हातात हात घालून चालू होते.१९५९ ला माईचे लग्न झाले.

स्वातंत्र्य चळवळ संपली होती पण देश व ग्रामसुधारणेची चळवळ अप्पांनी हाती घेतलेली होती. त्यात कौटुंबिक आर्थिक समस्या होत्याच व अप्पा सर्व आघाड्यांवर लढत होते. कुठेच त्यांचे दुर्लक्ष होणे शक्य

नव्हते. गावासाठी काय नि किती करू असे त्यांना होऊन जाई.त्यात दोनही भावांच्या कुटुंबाची जबाबदारी अप्पांवर होती. मोठ्या

भावाच्या चार मुली व दोन मुले. दोन्ही मुलांच्या

नोकऱ्या, स्थळे बघणे, मुलींची लग्ने व जावयांच्या नोकऱ्या, त्यांच्या बदल्या, त्यांची

दुखणीखुपणी सारे अप्पा बघत होते. मोठे काका फार शांत होते. फक्त शेतात जात असत. मी खूप लहान होते तरी डोळ्यांनी पाहिले आहे. बदली झाली की आले जावई

कापडण्याला. मी रात्रीबेरात्री ह्या पाहुण्यांना

जेवायला वाढत असे. तो ही पाहुणचार. हो ते

जावई ना? अक्का भलत्यावेळीही ते आलेत तरी गरम गरम भजी दूध शेवया साखर असा पाहुणचार करायची व मी वाढायची.

 

अप्पांना तीन सख्या व दोन दत्तक बहिणी. आमच्याकडे बहिणी, भाचे पुतणे, पुतण्या, जावई यांचा सतत राबता असे. (आत्या तर बैलगाडी नातवंडे घेऊनच यायच्या,( विशेष म्हणजे फक्त याच भावाकडे ), इतरांनी एक दिवस चहाला बोलावले की झाले त्यांचे काम.एक मोठे काका तर दुसऱ्या गावाला आमची शेती कसून त्यांचे कुटुंब पोसत होते. आमच्या कडे आत्या आल्या की,१५ दिवस दररोज पक्वांन्ने. अक्का, बाईसाहेब, बायजा म्हणत रोज नवे पदार्थ बनवायची. अप्पा

राजकारणातील पुढारी. सर्वच लग्ने, सोयरिकी

, कौटुंबिक गुंते, भांडणे त्यांनीच सोडवायचे.( वरून पटले नाही तर पाठीमागे शिव्याही खायच्या, लक्षात ठेवा लोक कामापुरतेच असतात, कामे करवून शिव्याही देतात.) हो, तोंडावर बोलण्याची व समोर उभे राहण्याचीही कुणाची टाप नव्हती असे करारी व्यक्तिमत्व त्यांचे होते. सगळा गावही टरार घाबरायचा. कार्यकर्तृत्वच त्यांचे तसे होते हे सगळा जिल्हा जाणून होता.ते हत्ती सारखे चालत राहिले. कितीही श्वान मागून भुंकले तरी त्यांनी कधीच

वळून पाहिले नाही व महत्वही दिले नाही.

 

सगळ्या नातलगांचे काय? गावाचे ही त्यांच्या शिवाय पान हलत नव्हते. गावातली एकूणएक

कामे व विकास त्यांनी केला आहे. आपले एवढे कुटुंब सांभाळून वरून पूर्ण गावाचा, शाळा, हायस्कूल, गावातील एकूणएक विकासकामे,स्वत:ची खादी भांडाराची नोकरी,गावात व गावोगावी सुरू केलेली चरखाकेंद्रे, व दररोज एस टी ने कामावर धुळ्याला जाणे, त्यात बरोबर गावातल्या लोकांची कामे, कुणाची नोकरी तर कुणाचे काय? हे सारे बघणे.. अबबबबबबब.. विचार करा केवढा आवाका होता त्यांचा!

 

गावातल्या शाळा, हायस्कूलचे व्यवस्थापन

बघणे, शिक्षकांची निवड व नेमणूका करणे,

शाळांना अचानक व्हिजिट देणे राम राम ..

केवढी ती कामे. त्यात मग शेतीकडे दुर्लक्ष व्हायचे नि अक्का कुरकुर करायची.एव्हढे

करून गावाच्या लोकांची आर्थिक स्थिती

मजबुत होण्यासाठी गावात विविध योजना

राबवणे. उदा. विमा उतरवून घेणे, लोकांसाठी

दूध डेअरी सुरू करणे, त्याकाळी देवीची साथ

फार भयंकर स्वरूपाची असे मग आरोग्यपथक

गावात आणून लस टोचवून घेणे अशा सर्व

कल्याणकारी योजना ते गावासाठी राबवत.

 

माझी भावंडे मामाकडे शिकत होती, धुळ्याला सहाव्या गल्लीत. मी लहान, फक्त कापडण्याला होते. खूप लाडकी होते अप्पांची.

अप्पा रोजच धुळ्याला जात असत. मामांकडे

काही पाहिजे असेल तर लगेच आणून देत. मामांच्या

घरासमोर निमसे नावाचे कुटुंब रहात होते. ते विम्याचे काम बघत.लगेच अप्पांच्या मनात आले की आपल्या गावातील लोकांचा विमा

करायचा. झाले… मनात आले की काम सुरू.

मी खूपच लहान होते, ८/९ वर्षांची असेन. मला

सारे डोळ्यांसमोर दिसते. निमसे त्यांची टीम

घेऊन आले नि आमच्या दारात चौठ्यात काम

सुरूही झाले. आधी छोटीसी सभा झाली. निमसेंनी लोकांना विम्याचे महत्व पटवून दिले.

रोज दारात लोकांची गर्दी जमू लागली. निमसे

दिवसभर थांबत. रात्री धुळ्याला परत जात.

असे बरेच दिवस चालले. अप्पांनी ही काढला

विमा पण नियमीत हप्ता काही ते भरू शकले

नाही. थोडे का व्याप होते त्यांच्यामागे. अक्का दिवसभर चहापाणी करण्यात दंग. किती लोकांनी विमा काढला हे कळण्याइतकी मी

मोठी नव्हते पण निमसेंचा मात्र चांगला फायदा

झाला होता. निमसे नाशिकला आले नंतर रहायला. मी नोकरीला लागल्यावर त्यांना भेटायला जात असे. तेही माझ्याकडे २/३ वेळा

येऊन गेले होते. भरपूर आयुष्य जगले ते.

अधून मधून विम्याचा थोडासा चेक अप्पांना

यायचा व अक्का पुन्हा नीट हप्ते भरले नाही

म्हणून कुरकुर करायची.

 

नंतर आले मग देवी टोचण्यासाठी आरोग्यपथक. लोक देवी आल्यावर जितके

घाबरत तेवढेच लस टाचून घ्यायलाही घाबरत

होते. आमच्या ओट्यावरच टेबलखुर्च्या मांडून

काम सुरू झाले. कुणीच लस घ्यायला पुढे येईना. मग अप्पांनी शिपाई पाठवून माणसे

घराबाहेर काढायला सुरूवात केली. हळूहळू

मग त्याचे महत्व पटून लोक स्वखुशीने यायला

लागले. मला तर धरलं नि टेबलावर बसवलं नि

एकाने हात पकडून डाव्या मनगटावर व डाव्या

दंडावर ती लशीची फिरकी फिरवली.थोडे दुखले पण करणार काय? शास्र तेव्हा एवढे प्रगत नव्हते. माझ्या डाव्या दंडावर दोन मोठ्या

खुणा अजून आहेत. नंतर गावभर माळीवाडा, झेंडागल्ली असे हे पथक रोज काम करत होते व देवीच्या लसीकरणाचे काम पूर्ण झाले.देवी हा रोगच इतका भयंकर होता की त्याचे उच्चाटन व्हायला फार काळ जावा लागला. ह्या संसर्गजन्य रोगात फार माणसे दगावली तेव्हा. रोग्याला एका बंदिस्त खोलीत ठेवावे लागे.प्रसार होऊ नये म्हणून. नंतर सरकारने धडक मोहिमच उघडली. तेव्हा कुठे तो रोग हद्दपार झाला.

 

आता अप्पांनी ठरवले गावकऱ्यांना पूरक व्यवसाय द्यायचा.आले मनात की केले असा अप्पांचा खाक्या होता.

आमच्याच घरात दूध डेअरीचे ॲाफिस सुरू

झाले. रोज शेतकऱ्यांची लोनसाठी गर्दी होऊ

लागली. खूप जणांनी म्हशी घेतल्या नि नदीत

दुधाचे संकलन होऊन विक्री व्यवस्था निर्माण केली. मंडळी जवळ जवळ दहा वर्षे आमच्याच

देवडीत ॲाफिस राहिले नि मग आलेल्या नफ्यातून अप्पांनी झेंडागल्लीत डेअरीची स्वतंत्र वास्तू उभारून डेअरी तिथे शिफ्ट झाली.

मी तरी माझ्या आयुष्यात अप्पांसारखा गावासाठी झटणारा व अत्यंत प्रामाणिक माणूस दुसरा पाहिला नाही. लोक आधी खिसे

भरतात मग थोडेफार काम देखाव्यासाठी करतात.इथे साराच कारभार पारदर्शक होता.

खाणार नाही व खाऊही देणार नाही असा.

 

असो, बऱ्याच झाल्या गप्पागोष्टी,

मंडळी, राम राम …

 

आपलीच,

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा