कुडाळ :
भारतातील संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) च्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेत कुडाळ – अभिनवनगर येथील सौरभ संदीप गवंडे याने घवघवीत यश संपादन केले. महाराष्ट्रात अव्वल येण्याचा बहुमान त्याने पटकावून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सौरभ याचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण कुडाळ येथील पडतेवाडी प्राथमिक शाळेत तर पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण येथीलच कुडाळ हायस्कूल येथे झाले. त्यानंतर व्हींजेटीआय (मुंबई) येथे बी – टेक (सिव्हिल इंजिनीअर्स) पूर्ण केले. सध्या तो चंदीगड येथे इंडीयन ऑईल कंपनीत ग्रेड – ए अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
युपीएससीच्या अभियांत्रिकी सेवा 2023 परीक्षेत देशात 17 वा तर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. सौरभने कोणतेही शिकवणी वर्ग न लावता स्वतःच्या बुद्धिमतेच्या व अभ्यासाच्या जोरावर हे यश प्राप्त केले. सिंधुदुर्गातील युवकांनी त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अशा कठीण परीक्षांमध्ये सहभागी होऊन यश कसे संपादन करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याने मिळविलेल्या या उज्वल यशाबद्दल सिंधुदुर्गसह राज्यभरातून त्याचे कौतुक होत आहे. कोकण रेल्वेचे सिग्नल इंजिनियर संदीप गवंडे व सेवानिवृत्त पोस्टल असिस्टंट सुषमा गवंडे यांचा सौरभ मुलगा होय.