आता ती हिंसेच्या रुपात पाहायला मिळत आहे – ओबामा
आज वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घडलेल्या हिंसेची इतिहासात नोंद घेतली जाईल. हा हिंसा सध्या राष्ट्राध्यक्ष पदावर असणा-या व्यक्तीने भडवल्याने झाली असून ही व्यक्ती कायदेशीर मार्गाने पार पडलेल्या निवडणुकांबद्दल सातत्याने खोटे आरोप करत आहे. ही घटना आपल्या देशासाठी लज्जास्पद आणि अपमानजनक आहे, अशा शब्दांमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी कॅपिटॉलमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनाचा निषेध केला. मात्र ही हिंसा अचानक घडलेली नसून ही चीड अनेक वर्षांपासून खदखदत होती आणि आता ती हिंसेच्या रुपात पाहायला मिळत असल्याचेही ओबामा म्हणाले आहेत.
आज कॅपिटॉलमध्ये जे घडले ते अगदी अनपेक्षितपणे घडले आहे असे आपण म्हणत असू तर आपण स्वत:चे हसे करुन घेण्यासारखा प्रकार ठरेल, अशा शब्दांमध्ये ओबामांनी अमेरिकन जनतेला मागील काही महिन्यांपासून सुरु असणा-या राजकीय परिस्थितीचा हवाला देत आरसा दाखवला. आज राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्याने त्यांच्या समर्थकांनी धुडगूस घालत हिंसाचार केला. याच पार्श्वभूमीवर ओबामा यांनी फेसबुकवरुन या घटनेचा निषेध करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.