You are currently viewing जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन – बाबा मोंडकर 

जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन – बाबा मोंडकर 

जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन – बाबा मोंडकर

रील्स, पुरुषांच्या पाककला स्पर्धेचे आयोजन, रिक्षा ॲपचेही होणार अनावरण…

मालवण

पर्यटन व्यावसायिक महासंघाच्यावतीने २७ सप्टेंबरचा जागतिक पर्यटन दिन देवबाग येथील मत्स्यगंधा थिएटर याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार असून पर्यटन पॉलिसी यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच अपरिचित सिंधुदुर्ग हि रिल्स स्पर्धा व पुरूषांच्या पाककलेचेही आयोजन यानिमित्ताने करण्यात आले आहे. सिंधुदुर्गातील रिक्षा व्यावसायिकांना एकत्रित करण्यासाठी बनविण्यात आलेल्या रिक्षा राईड अॅपचेही अनावरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

येथील हॉटेल महाराजा येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे सहदेव साळगावकर, रविंद्र खानविलकर, मंगेश जावकर, मिलींद झाड, बाबु पडवळ, रामा चोपडेकर, दर्शन वेंगुर्लेकर, एस. के. वायंगणकर, तुळशिदास कोयंडे, केदार झाड, मिथीलेश मिठबावकर आदी अपस्थित होते.

पर्यटन महासंघ आणि तारकर्ली पर्यटन विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी जागतिक पर्यटन दिनाची थिम पर्यटन आणि शांतता असून त्याअनुषंगाने इतरही कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचेही श्री. मोंडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

पर्यटन व्यावसायिक महासंघाच्यावतीने अपरिचित सिंधुदुर्ग रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपरिचित पर्यटन स्थळे जगासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात बनविण्यात येणारा व्हिडीओ १.३० मिनीटांचा असावा. लोकेशन आणि स्पर्धक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असावा. रिलसाठी मराठी आणि मालवणी भाषा असावी. रील पोस्ट करताना @paryatanvyavsaik माया अकाऊंटवर २५ सप्टेंबर रात्री १२ पर्यंत करावी. स्पर्धेचा पारितोषिक वितरण २७ रोजी करण्यात येणार आहे. तसेच रील व्हिडीओ पोस्ट केल्यावर ८२७५१०६३७५ या नंबरवर माहिती सादर करावी, असेही श्री. मोंडकर यांनी स्पष्ट केले. यात विजेत्यांना अनुक्रमे १० हजार रुपये , ७ हजार रुपये, ५ हजार रूपये देण्यात येणार आहेत. तसेच पुरूषांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यातील विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार रुपये, ३ हजार रुपये, २ हजार रूपये देण्यात येणार आहेत. यात मालवणी खाद्यपदार्थ बनविण्यात येणार आहेत.

सिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या पर्यटकांना रात्रीच्यावेळी सिंधुदुर्गातील संस्कृतीचे दर्शन होण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम कोणत्याही पर्यटन स्थळी सादर केले जात नाहीत. यामुळे अनेक कलाकारांना प्रोत्साहन मिळत नाही. यामुळे पर्यटन महासंघाच्यावतीने पर्यटन दिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यातून हा कार्यक्रम मालवणमध्ये दिवाळीच्या निमित्ताने ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच सादर केला जाणार आहे. यात स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्याबरोबर त्यांचा आर्थिक फायदाही होणार आहे, असेही श्री. मोंडकर यांनी सांगितले.

देशभरात कुठेही गेल्यानंतर त्याठिकाणी गाड्यांची व्यवस्था करण्यासाठी काही कंपन्यांनी आपली व्यवस्था निर्माण केली आहे. मात्र सिंधुदुर्गात अशाप्रकारे कोणतीही व्यवस्था नसल्याने पर्यटन महासंघाच्यावतीने परवानाधारक रिक्षा आणि पर्यटन व्यवसाय करणाऱ्या गाड्यांची माहिती एकत्रित करून रिक्षा राईड अॅपचे उद्घाटनही यावेळी करण्यात येणार आहे. यामुळे रिक्षा व्यावसायिकांना पर्यटकांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. आणि पर्यटकांनाही सिंधुदुर्गात फिरण्यासाठी एका अपवर रिक्षा भाड्यांचे दर आणि संपर्क क्रमांक उपलब्ध होणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी, परिवहन अधिकारी यांनी महत्वपूर्ण सहकार्य केल्याचेही श्री. मोंडकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा