फिट येवून विहीरीत कोसळल्याने नेतर्डेत तरुणाचा मृत्यू…
बांदा
नेतर्डे येथील तरुणाचा फिट येऊन विहिरीत पडल्यामुळे मृत्यू झाला. अनिल मधुकर गवस (वय ३६, रा.खैराटवाडी) असे त्या तरुणाचे नाव आहे. याबाबत बांदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेतर्डे-खैराटवाडी येथील अनिल मधुकर यांना गेली दहा वर्षे अधुनमधून फिट येण्याची सवय होती. सोमवारी सायंकाळी तो गावात शेजा-यांकडे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेला होते यावेळी खैराटवाडी येथील सार्वजनिक विहिरीकडे आला असता त्याला फिट आल्याने त्याचा तोल जाऊन विहिरीत पडला. तेथील स्थानिकांच्या ही बाब निदर्शनास येताच त्याची माहिती त्याचे बंधू सुनील गवस यांनी बांदा पोलिसांत दिली.
बांदा पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करून रात्री उशिरा मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याबाबतचा अधिक तपास बांदा पोलीस कॉन्स्टेबल डी. बी. पालकर करत आहेत.