कोरोनाविरुद्ध लढाईत नवीन वर्षात भारताला मोठे यश मिळाले. सिरमच्या आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन लसींना आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळाली. यानंतर ही लस देशातील सर्व नागरिकांपर्यंत3 पोहोचवण्यासाठी विविध राज्यांमध्ये ड्रायरन घेण्यात आला. हा ड्रायरन यशस्वी झाल्यानंतर आता देशातील दुर्गम भागातही लस पोहोचवण्यासाठी भारताचे वायूदल सज्ज झाले आहे.
ग्रामिण आणि शहरी भागांसह देशातील दुर्गम भागात लस कोरोनावरील लस पोहोचवण्यासाठी सरकारी पातळीवर काम सुरू आहे. यासाठी वायूदलाचाही मदत घेतली जाईल अशी शक्यता आहे. दुर्गम भागात लस पोहोचवण्यासाठी वायूदलाच्या सी -१३० आणि एंटोनोव-३२ या मालवाहू विमानांचा वापर केला जाईल.
याबाबत सरकारी अधिका-याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, अरुणाचल प्रदेश आणि लडाखसारख्या दुर्गम भागात लस पोहोचवण्यासाठी भारतीय वायूदलाच्या विमानांचा वापर केला जाईल. यासाठी कोरोना लस निर्माता कंपन्यांनी आणि पुरवठादारांनी विशिष्ट तापमानात लसीची वाहतूक करण्यासाठी खास कंटेनर (फ्रिजर) तयार केले आहेत. याचा वापर येथे केला जाईल.
लसीच्या वाहतुकीसाठी व्यावसायिक विमानांचाही वापर केला जाईल आणि त्यांच्यासाठी लँडिंगचीही व्यवस्था केली जाईल, असेही अधिका-याने सांगितले. वायूदलाच्या प्रवासी विमानांचा वापर अरुणाचल प्रदेश, लडाख, उत्तराखंड यासारख्या दुर्गम राज्यांत लस पोहोचवण्यासाठी केला जाईल. तसेच आवश्यकता भासल्यास वायूदलाच्या हेलिकॉप्टरचाही वापर केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. याबाबत चर्चा सुरू असून, लवकरच त्यास अंतिम स्वरूप प्राप्त होईल, असेही ते म्हणाले.