You are currently viewing विसर्जन

विसर्जन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*विसर्जन*

 

सजीव असो वा निर्जीव असो— कुणाचे विसर्जन करणे असो वा कुणाला निरोप देणे असो— नेहमीच उदास करणारे, हुरहूर निर्माण करणारे असते हेच खरे.

खरं म्हणजे आपले सगळेच सण हे रूपकात्मक असतात. सणांविषयीची जी पात्रे परंपरेतून येतात ती प्रतीकात्मक असतात. ही प्रतीके आपण कल्पनेने रंगवतो, सगुण करतो आणि त्यात गुंततो आणि असं हे श्रद्धायुक्त गुंतणं आपलं जगणं सकारात्मक आणि अर्थपूर्णही करत असतं. गौरी गणपतीच्या सणांचे महत्त्व हे याचसाठी आहे.

भाद्रपद शुद्ध सप्तमीच्या अनुराधा नक्षत्रावर हळद-कुंकवाच्या पावलांनी गौरी आपल्या घरी येतात. त्यांना आपण माहेरवाशिणी म्हणतो. ज्येष्ठा कनिष्ठा नावे देतो. प्रत्येकाच्या पारंपारिक रितीभातीनुसार त्या येतात. मुखवट्याच्या रूपात, खड्यांच्या रूपात, घागरींच्या रूपात नाहीतर तेरड्याच्या फांद्यांच्या रूपात.

गौरींना आपण सजवतो नटवतो आणि सुंदर स्त्रीरूप देतो. माहेरवाशिणी सारखे त्यांचे लाड कौतुक, सन्मान करतो. घरात चैतन्य, आनंद, सळसळतो. एक वेगळीच ऊर्जा जाणवते आणि जेव्हा त्यांच्या विसर्जनाचा दिवस उगवतो त्यादिवशी मात्र मन नकळतच उदास होते. उद्देश काल्पनिक असला तरी भावनांचा प्रपंच खरा असतो. त्या निर्जीव सगुणात्मकतेशी आपले नाते जडते.

आपण एखादी कलाकृती करायला घेतो तेव्हा त्यात पार गढूनन गेलेले असतो, देहभान विसरलेले असतो आणि जेव्हा ती कलाकृती पूर्ण होते त्या क्षणी नकळत एक रिकामपण जाणवतं, एक आनंददायी अॅक्टिव्हिटी संपल्यामुळे आलेलं ते रिकामपण असतं, पूर्णत्वात अनुभवलेलं ते रिकामपण असतं. गौरी विसर्जनाविषयी माझ्या मनात नेमके हेच विचार येतात. एक अगाध आनंदाचा सोहळा साजरा झालेला असतो. विसर्जन हा या सोहळ्यातला अंतिम टप्पा म्हणजे सोहळ्याचे संपूर्णत्व! विसर्जनाच्या वेळी येणारी उदासीनता ही सफल संपूर्णतेतील असते.

जे सुरू होतं ते संपणार असतं, जो येतो तो जाणार असतो, प्रत्येकाचं आपल्या आयुष्यातलं अस्तित्व हे ठराविक कालापर्यंतच असतं आणि ते तसंच असावं यातच सौख्य समाधान असते हा सृष्टीचाच नियम आहे. गौरी विसर्जनाच्या माध्यमातूनही हाच संदेश मिळतो. आगमन आणि निर्गमन या दोन्ही परस्परपूरक बाबी आहेत. म्हणूनच जो आनंद स्वागतात आहे तोच आनंद निरोप समयी असावा. *चूक भूल द्यावी घ्यावी* हा भाव मात्र त्या क्षणी मनात असावा आणि तो व्यक्त व्हावा हीच अपेक्षा.

 

*राधिका भांडारकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा