You are currently viewing बाप्पाचे दर्शन…! 

बाप्पाचे दर्शन…! 

 

काल संध्याकाळी मुलांचे बाबा घरी आले,तसा मुलांनी आग्रह धरला. “चला ना, बाबा गणपती बघायला”

दिवसभर ऑफिसचे काम, पुन्हा येताना दोन तासांची ट्रॅफिक सहन करून घरी आलेले ते खरोखर थकलेले दिसत होते.

मुलांचे बाबा आल्याबरोबर मी त्यांना चहा करू का? असं विचारलं त्यांनी ‘हो’ म्हटलं मी त्यांना चहा करून दिला. चहा पीत असतांनाच त्यांनी मुलांना जा तयारी करा असं सांगितलं तशी मुलांनी पटापट तयारी केली आणि अर्ध्या तासात आम्ही सर्व खाली उतरलो. गाडीवरून आमचं गणपती दर्शन सुरू झालं. गणपती बाप्पाचे एका मागे एक अशी दर्शनं सुरू झाली. प्रत्येक बाप्पाचं रुप सुंदर, अप्रतिम, खूपच प्रसन्न वाटणार हे दर्शन मनाला समाधान, उल्हास देऊन जात होतं.

एका ठिकाणी आम्हाला आरतीचा लाभ झाला. आरती घेऊन आम्ही लगेच मागे वळलो आणि मागून कोणीतरी आवाज दिला. थांबा… प्रसाद घेऊन जा….. पाय आपोआप थांबले प्रसाद घेतला आणि आम्ही पुढच्या बापाकडे निघालो पुढे आल्यानंतर रस्त्याच्या बाजूला एक सफेद मंदिर होतं गणपती बाप्पासाठी दहा दिवसाकरताच फक्त बनवलेलं पण ते खूपच सुंदर होतं. तिथलं भजन ऐकून लहानपणी गावाकडे जे भजन सतत ऐकायला मिळायचं त्याची आठवण झाली. लहानपणी खरोखर काही गोष्टी आयुष्यात येणं खूप गरजेचं असतं. त्याचा प्रभाव माणसाच्या जीवनात आयुष्यभर राहतोआणि तो चांगलं- वाईट यातील फरक त्याला समजवायला मदत करतो.

पुढे आम्ही एका नावाजलेल्या मंडळात गेलो पाहिलं तर तिथे खूप गर्दी, खूप मोठी रांग काही वेळ आम्हीही त्या रांगेत उभे राहिलो थोड्या थोड्या वेळाने मुलांचे बाबा मान वर करून पुढच्या गर्दीचा अंदाज घेत होते आणि मी त्यांची ही चलबिचल टिपत होते. हळूहळू आम्ही रांगेतून बाहेर पडलो आणि इतर एकेक गणपती चे दर्शन घेऊ लागलो इतके सुंदर, अप्रतिम रूप असलेले ते गणपती बाप्पा मात्र जणू काही हिरमुसून बसलेले आहेत असं वाटत होतं कारण त्यांच्या पुढे कुठलीही गर्दी किंवा रांग नव्हती. सहज व्यक्ती जाऊन आपलं मस्तक बापा पुढे टेकुन दर्शन घेऊ शकत होतो. कुठेतरी मनात असं आलं की इतके सुंदर, अप्रतिम असलेले हे बाप्पा पण केवळ जास्त प्रसिद्धी नसल्यामुळे तिकडे मंडळातील काही कार्यकर्त्यांपलीकडे इतर कोणीही दिसत नव्हतं. याला काय म्हणता येईल? असा प्रश्न माझ्या डोक्यात घोळत होता. जर गणपती बाप्पा आपली इच्छा पूर्ण करतो तर या सर्वांपैकी कुठलाही असू शकतो परंतु काही गणपती समोरच हा जनसागर लोटांगण घेतो आणि काही गणपतीसमोर हात जोडून पुढचा प्रवास सुरू करतो.

उसळलेला जनसागर पाहून अनेक प्रश्न डोक्यात काहूर करतात की ही गर्दी कशासाठी आहे?

सेल्फी काढण्यासाठी, देवाच्या दर्शनासाठी, केलेल्या कलाकृती बघण्यासाठी, विविध प्रकारच्या दुकानातील खरेदीसाठी, की पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी? नेमकं काय?

-ज्योती नारायण कडू, घोटी – नाशिक.

9529328126

प्रतिक्रिया व्यक्त करा