You are currently viewing “किंगमेकर…”

“किंगमेकर…”

*”किंगमेकर…”*

*बुद्धिबळाच्या पटलावरील राजा आणि किंगमेकर….*

*राजकीय विशेष..*

सिंधुदुर्ग जिल्हा आणि राजकारण याच्या आजपर्यंतच्या प्रवासाचा विचार केल्यास बॅ.नाथ पई पासून मधू दंडवते, ब्रिगे.सुधीर सावंत, सुरेश प्रभू अशा ज्ञानी विचारवंतांनी संसदेत आपला ठसा उमटविलेला मतदारसंघ म्हणून पूर्वीचा राजापूर मतदारसंघ पर्यायाने सिंधुदुर्ग ओळखला जातो. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जेव्हा राजकीय विषय येतो आणि अलीकडच्या पंचवीस वर्षांच्या काळाचा विचार करतो तेव्हा खास.नारायण राणे हे नाव राजकारणात सर्वात आघाडीवर असल्याचे दिसून येते. जिल्ह्यावर तब्बल पंचवीस वर्षे त्यांनी आपली सत्ता अबाधित राखली आहे मग ते शिवसेनेचे नेते असो, काँग्रेस किंवा मग स्वाभिमान या त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे नेतृत्व करू देत त्यांनी जिल्ह्यावरील आपली पकड मजबूत राखली होती. नारायण राणे पाठीशी असणारे स्वायत्त संस्थांचे सदस्य असो वा विधानसभा, विधानपरिषद सदस्य ते निवडून येणारच.. असा होरा होता. नारायण राणे काँग्रेस मध्ये गेले तेव्हा जिल्ह्यात तिसऱ्या नंबरवर फेकला गेलेला काँग्रेस पक्ष पहिल्या नंबरवर आला होता. परंतु काँग्रेस सोडून राणेंनी स्वाभिमान पक्ष काढला तेव्हा काँग्रेस पक्ष पुन्हा जिल्ह्यात शोधावा लागला..अशी अवस्था झाली. नारायण राणे भाजपा मध्ये येण्यापूर्वी भाजपा देवगड आणि बांदा एवढीच मर्यादित होती. शिवसेना पक्षाची साथ असल्याने भाजपाचे जिल्हा परिषद, पंचायत समिती मध्ये सदस्य निवडून यायचे. परंतु राणेंचा भाजप प्रवेश झाला आणि जिल्हा भाजपामय झाला. राणे जिथे जातील त्या पक्षाची भरभराट झाली. नारायण राणेंनी अनेकांना लोकप्रतिनिधी, नेते, आमदार केले..त्यामुळे नारायण राणे यांची ओळख अवघ्या महाराष्ट्राला *”किंगमेकर”* अशीच झाली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा वाढली, पसरली ती केवळ नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशानंतर… आणि शतप्रतिशत भाजप हा नारा देखील दिला गेला तो सुद्धा राणेंच्या प्रवेशानंतरच… अन्यथा शिवसेनेची साथ सोडल्यानंतर भाजपा जिल्ह्यात कितव्या क्रमांकावर राहिली असती हे सांगायला ज्योतिषाची गरज भासली नसती. नारायण राणेंच्या पक्षात येण्यापूर्वी देखील भाजपचे डोंबिवली येथील आमदार असलेले रवींद्र चव्हाण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ देत होते, जिल्हा परिषद, पंचायत समितीची एखाद दुसरी जागा, एखादी ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात येत होती..परंतु जिल्ह्यात शिवसेनेचा दबदबा असताना भाजपा मर्यादित स्वरूपात वाढत होती. त्यावेळी आज जिल्हा भाजपचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण जिल्ह्यात सक्रिय असतानाही किंगमेकरच्या भूमिकेत दिसून आले नव्हते. परंतु आज मुंबई गोवा महामार्गावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सासरवाड असलेल्या नेमळे येथील एका बांधकामाच्या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांचे हात जोडून उभे असलेले छायाचित्र सोबत बुद्धिबळाच्या पटावरील राजा आणि “किंगमेकर” असे कॅप्शन… पोश्टर लक्ष वेधून घेत आहे.
जिल्ह्यात खास.नारायण राणे जातील तिथे जिल्ह्याची सत्ता अशीच आजपर्यंतची राजकारणाची दिशा राहिली आहे. राणेंनी जिल्ह्याचा गड कधीच खाली केला नाही की दुसऱ्या कुणाच्या हाती लागू दिला. मागील दहा बारा वर्षात सावंतवाडीचे नाम. दिपक केसरकर यांनी मात्र नारायण राणे यांना मुलाच्या खासदारकी आणि स्वतःच्या आमदारकीच्या निवडणुकीत पराभव चाखायला लावून राजकारणात बॅक फुटवर नेलं आणि तिथूनच राणेंची राजकारणातील दादागिरी काहीशी कमी झाली. परंतु राणेंनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपा आणि शिवसेना शिंदे गट सत्तेत एकत्र असल्याने दिपक केसरकर यांना राणेंशी जुळवून घ्यावे लागले. त्यामुळे अलीकडेच झालेल्या खासदारकीच्या निवडणुकीत युती धर्माचे पालन करत केसरकरांनी नारायण राणे यांना पूर्ण पाठिंबा देत त्यांचा जोरदार प्रचार करून राणेंच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळे गेली काही वर्ष राजकीय वैमनस्य असलेले नामदार दीपक केसरकर आणि खासदार नारायण राणे यांच्यामध्ये जवळीक वाढली आणि काही वेळा खासदार नारायण राणे यांनी दीपक केसरकर यांची पाठराखण करत आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना त्यांच्या विरोधात बोलल्यावर कानपिचक्या देखील दिल्या होत्या. त्यामुळे आजपर्यंत दिपक केसरकर आणि राणे यांना वैरी म्हणून जाणणारी जिल्ह्यातील जनता आता त्यांच्यात असलेली मैत्री पाहत आहे. परंतु राणे केसरकर एकत्र आल्यानंतर मात्र जिल्ह्यात भाजपा मध्येच दोन गट पहायला मिळत आहेत. रवींद्र चव्हाण आणि केसरकर यांच्यात जमत नसल्याने केसरकर विरोधक असणारे काही भाजपा कार्यकर्ते रवींद्र चव्हाण यांच्याशी जवळीक साधून राजकारणात कार्यरत आहेत तर राणेंचे कट्टर कार्यकर्ते मात्र राणेंच्या सोबतच वावरताना दिसतात. परंतु महायुतीचे घटक असलेल्या दोन्ही पक्षातील नेत्यांचे एकमेकांशी जमत नसल्याने राणे आणि चव्हाण यांच्याशी निष्ठा राखताना मात्र कार्यकर्त्यांची गळचेपी होत असून “इकडे आड तिकडे विहीर” अशीच परिस्थिती प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्त्यांची झाली आहे.
येत्या नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, महायुतीकडून नामदार दीपक केसरकर यांना उमेदवारी दिल्यास नारायण राणे काय भूमिका घेतात हे पाहणे औसुक्याचे ठरेल. अलीकडेच किंगमेकरच्या भूमिकेत दिसणारे जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भूमिका काय असेल..? महायुतीचा धर्म पाळून ते दीपक केसरकर यांच्या पाठीशी राहतील की भाजपमध्ये बंडखोरी झाल्यास बंडखोर भाजपा कार्यकर्त्याला छुपा पाठिंबा देतील..? असे प्रश्न साहजिकच केसरकर आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये असलेल्या दुराव्यामुळे उपस्थित होत आहेत. सावंतवाडी तालुक्यामध्ये किंवा मतदार संघामध्ये दीपक केसरकर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने इतर कोणीही त्यांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नये अशा प्रकारची त्यांची मनीषा आहे. परंतु काहीही समज गैरसमजातून दीपक केसरकर व रवींद्र चव्हाण समर्थक कार्यकर्ते यांच्यामध्ये बऱ्याचदा शाब्दिक लढाया होत असतात. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये जमत नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. परंतु त्यावेळी रवींद्र चव्हाण अगदी शांतपणे आपली भूमिका वठवताना दिसतात ते कोणत्याही वादंगात स्वतः समोर येत नाहीत किंवा प्रतिक्रिया देखील देत नाहीत. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे हे दीपक केसरकर यांच्या पाठीशी राहून किंगमेकर बनतात की भाजपाचा किंगमेकर असा चेहरा असलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे कुणाचे किंगमेकर म्हणून पुढे येणार हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा