देवगड :
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवगड या संस्थेमध्ये स्थापन करण्यात आलेल्या संविधान मंदिराचे उद्घाटन नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॲड. अभिषेक गोगटे, संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य सत्यवान जोईल, सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाणे, पं. स. विस्तार अधिकारी नीलेश जगताप, देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, संस्थेचे प्राचार्य एस. एल. कुसगावकर, संस्थेतील कर्मचारी डिसिल्वा, श्री. सामंत, श्री. कांबळी, श्री. घडसे, श्री. ठाकरे, श्री. भिडे, श्री. मुळ्ये, श्री. गोरे, श्रीमती गरुड, श्री. कीर, श्री. चौघुले, श्री. पुजारे, श्री. चिंदरकर, श्री. अनभवने, श्री. तेली आदी उपस्थित होते.
सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातून प्राप्त होते. त्यामुळे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीना सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळावी. यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयात संविधान मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. देवगड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतही संविधान मंदिराची स्थापना करण्यात आली.