You are currently viewing रंग.. रंग… रंग..

रंग.. रंग… रंग..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*रंग.. रंग… रंग ….*

 

मेरा रंग दे बसंती चोला..

रंगभरी इस दुनिया मे..

रंग रंग के फुल खिले मुझे…

किती उदाहरणे द्यावीत जीवनात रंग भरणाऱ्या

गाण्यांची.. सकाळी उठल्याबरोबर ही विविध गाणी आपल्या जीवनात रंग भरतात नि सकाळ

कशी सुरिली होते..नि तेवढ्यात…

 

अंघोळ होताच अंगणात यावे तर आपल्या सहस्र सोनेरी किरणांचा रथ घेऊन, आपल्या

शुभ्र घोड्यांचे वेग हाती घेऊन सहस्ररश्मी पूर्वेला लाल, गुलाबी,केशरी, पिवळ्या, रंगात

न्हात तर कधी शुभ्र धुक्याच्या पटलातच

दंवाच्या पडद्याआडून प्रसन्न हासत आपल्या

समोर हजर होताच हिरव्यागार वेलीवरची शुभ्र , केशरी, पिवळी, निळी, गुलाबी,जांभळी फुले, कळ्या हासतच गंध उधळतात व आपली सकाळ ही हसरी फुले सुगंधित करून टाकतात.

 

झाडांवर नजर टाकताच इवला फिकट पिवळा

शिंपी चहच चहक गोड शिळ घालतो न घालतो

तोच काळा बुलबुल तुर्रा उडवत गोड गोड बोलू

लागतो. नारळाच्या हिरव्यागार वृक्षावरचा लाल गुंज डोळ्यांचा तपकिरी पंखांचा भारद्वाज

सहचरीला शेंड्यावरून घुटूर घुटूर साद घालू

लागतो न लागतो तोवर राखाडीपिवळ्या साळुंक्या बडबड करत तारेवर हिरव्या पोपटांच्या रांगेत स्थिरावतात नि हिरवे वेडे

राघू भुर्रकन झेप घेत उडून जातात. ही सगळी

गंमत पाहत बसलेले काळे कावळे काव काव

करत उगाच त्यांना ओरडतात व पिटुकल्या

गावरान चिमण्या त्यांना घाबरून दूर जाऊन बसतात.

 

मेनरोडला मी जाताच रंगबिरंगी कपड्यांची दुनियाच रस्त्यावर चालत पुढे पुढे सरकत होती. नाना रंगांचे संमेलनच जणू रस्त्यावर

भरले होते नि मी अनिमिष नेत्रांनी ती जत्रा पहात राहिले. परवा मी मुंबईला निघाले तर

घाटमाथ्यात भर उन्हात आम्हाला पावसाने

गाठताच .. अ हा हा…! क्षणात इंद्रधनूचा गोफ

उमलला नि आमच्या नेत्रांचे पारणे फिटले.

तेवढ्यात पाऊस थांबला नि दरडीआड दडलेला

शुभ्र बगळ्यांचा थवा आकाशात भर्रकन उडाला

नि दिवसा क्षणभर चांदणे पाहिल्याचा भास

होतो न होतो तोच पुन्हा ध्धुव्वादार पाऊस सुरू

होऊन पावसाच्या व दाट धुक्याच्या पडद्यात आम्ही सारे व रस्त्यातील वाहतूकही हरवून गेली. आम्ही सारेच हरवलो, गडप झालो, नाहिसे झालो. आमचे अस्तित्वच पावसाने,

धुक्याने मिटवून आम्ही सृष्टीत सामावून चराचराचा अंश झालो.

 

अनेक रंगांची चकती वेगात गोल फिरवताच

तबकडीवरचे सारे रंग एक होतात व सफेद रंग

दिसू लागतो. रंगांशिवाय दुनियाच काळी अंधारी होऊन जाईल. जीवनातील सारी गंमत,

आनंद म्हणजे रंग आहेत. त्यांच्याविना आपण

जीवनाचा क्षणभरही विचार करू शकत नाही

इतके आपण रंगात विरघळलो आहोत.

प्रत्येक रंगात आपण एक वैशिट्य शोधून त्याला त्याचे प्रतिकही मानले आहे. ते ही चांगलेच आहे.

 

राम राम मंडळी..

 

आपलीच,

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा