You are currently viewing जिल्हा प्रशासनातर्फे किशोर तावडे यांच्या निरोप समारंभाचे आयोजन

जिल्हा प्रशासनातर्फे किशोर तावडे यांच्या निरोप समारंभाचे आयोजन

जिल्हा प्रशासनातर्फे किशोर तावडे यांच्या निरोप समारंभाचे आयोजन

सर्वांच्या सहकार्यामुळे यशस्वीरीत्या काम करू शकलो- किशोर तावडे

नागरिकांच्या समस्या वेळेत सोडवून जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य – अनिल पाटील

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून काम करताना आलेले अनुभव मला समृद्ध करणारे आहेत. माझ्या कार्यकाळात मी केलेल्या कामाचे सर्व श्रेय हे येथील नागरिक, अधिकारी आणि  कर्मचाऱ्यांचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने दिलेले प्रेम माझ्या आयुष्यात संस्मरणीय राहील, अशी हृद्य भावना सिंधुदुर्गचे माजी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी व्यक्त केली. त्यांच्या निरोप समारंभानिमित्त आणि नूतन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या स्वागत समारंभानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी  नुतन जिल्हाधिकारी अनिल पाटील,  मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, प्रभारी अपर जिल्हाधिकारी श्रीमती पद्मश्री बैनाडे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे,  उप‍ जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, श्रीमती श्रध्दा पोवार, आरती देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत तसेच सर्व तहसिलदार आणि विभाग प्रमुख उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनामध्ये काम करताना खुप काही शिकायला मिळाले. सर्व विभाग समन्वयातून काम करत असल्यामुळे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविता आले. जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी माझ्यासाठी माझे कुटूंब होते, आणि कुटूंबातील प्रत्येक घटकाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी होती. राज्य शासनाचे अनेकविध पथदर्शी कार्यक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे  राबवून जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न मनापासून केला. सन २०२३-२४ या कालावधीमध्ये सर्वांच्या सहकार्यामुळेच निवडणूक विषयासंदर्भात केलेल्या उल्लेखनीय व नावीण्यपूर्ण कामगिरीच्या आधारे जिल्ह्याचा गौरव झाला असल्याची बाब यावेळी किशोर तावडे यांनी अधोरेखित केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करु. माझी काम करतानाची भूमिका पालकाची आहे. काम करणाऱ्यांना प्रोत्साहन, न काम करणाऱ्याचे कान ओढून काम करायला लावणारी असेल.  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य द्यायचे आहे. प्रशासनात काम करत असताना फाईल प्रलंबित ठेवू नका, कमीत कमी वेळेत प्रकरणे निकाली काढा. जनतेची कामे वेळेत पूर्ण करुन जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचेही जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री देशमुख यांनी माजी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा परिचय करून दिला. तावडे साहेबांनी काम करत असताना प्रत्येक क्षणी सर्वांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा नक्कीच भविष्यकाळात सर्वांनाच होणार असल्याचेही ते म्हणाले.

प्रशासनातील विविध अधिकारी-कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या सोबत काम करतांना आलेले अनुभव सांगितले.

श्रीमती बैनाडे म्हणाल्या, तावडे साहेबांसोबत काम करताना सुक्ष्म नियोजन कसे असावे हे शिकता आले. कोणताही उपक्रम यशस्वी करताना काय काय केले पाहिजे हे सरांनी शिकवले असेही त्या म्हणाल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे म्हणाले, तावडे सरांसोबत काम करताना प्रशासनात यशस्वीरित्या कसे काम करायचे हे शिकता आले. तावडे साहेबांच्या मार्गदर्शनामुळेच जिल्ह्यात ई-फेरफारमध्ये चांगले काम झाले. नौसेना दिनाचे यशस्वी आयेाजन, लोकसभा निवडणूक, विकसित भारत, माझी माती माझा देश असे उपक्रम तावडे सरांच्या मार्गदर्शनामुळेच यशस्वी झाले असेही ते म्हणाले.

श्रीमती पवार म्हणाल्या, तावडे साहेब प्रत्येक सामान्य नागरिकांना भेटत आणि त्यांच्या समस्या जाणून घेत. निवडणूक काळात देखील तावडे साहेबांनी अत्यंत सूक्ष्म बाबींवर देखील लक्ष दिल्याने निवडणूक यशस्वीरित्या पार पाडता आल्या असेही त्या म्हणाल्या.

श्री शेवाळे यांनी तावडे सरांनी निवडणूक काळात केलेले नियोजन, वॉर रुम, प्रत्यक्ष भेटी याव्दारे केलेले मार्गदर्शन याविषयी भावना व्यक्त केल्या.

यावेळी कार्यक्रमास जिल्हा प्रशासनातील अधिकारी – कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी प्रशासनातर्फे किशोर तावडे यांचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले. तर सुत्रसंचलन उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा