शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरणासाठी 18 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या आधार प्रमाणिकरणासाठी 18 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका ग्रामिण बँका, व्यापारी बँकांचे २२७ सभासद शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणिकरण केलेले नाही. तरी या योजनेसाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक प्राप्त झालेल्या) परंतु आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या महा ई सेवा केंद्रातुन आधार प्रमाणिकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एम.बी. सांगळे यांनी केले आहे.
सहकार विभागाकडील दि.२९ जुलै २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार सन २०१७-१८, सन २०१८-१९ व सन २०१९-२० या कालावधीतील कोणत्याही दोन आर्थिक वर्षात अल्पमुदत शेती पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यासांठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सुरु करण्यात आलेली होती. सद्यस्थितीत ही योजनेतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक प्राप्त झालेल्या) परंतु आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाआयटी यांनी दि.१२ ऑगस्ट २०२४ ते दि.०७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत संबंधीत शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणिकरण करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. तथापी अद्यापही आधार प्रमाणिकरण करणे शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे आधार प्रमाणिकरण सुविधा दि. १८ सप्टेंबर २०२४ रोजी पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.