करुळ येथील बंद बंगला अज्ञात चोरट्यांनी पुन्हा फोडला
वैभववाडी
करूळ जामदारवाडी येथील तो बंद बंगला अज्ञात चोरट्यांनी पुन्हा एकदा फोडला आहे. मात्र या वेळी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. घरमालक अशोक गणपत सरफरे वय ४८ यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात धाव घेत चोरीबाबत माहिती पोलिसांना दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल व पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. याच बंगल्यात एक वर्षांपूर्वी १२ लाख रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. या चोरीचा तपास सुरूच असताना चोरट्याने तोच बंगला पुन्हा टार्गेट केला आहे.
करूळ जामदारवाडी येथील अशोक गणपत सरफरे यांनी दिड वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गालगत नवीन बंगला बांधला. अशोक सरफरे यांचे कुटुंब कामानिमित्त मुंबईला असते. मे २०२३ मध्ये बंगल्याचे उद्घाटन करून सरफरे कुटुंब मुंबईला गेले होते. जून २०२३ मध्ये अज्ञात चोरट्यांनी बंगल्यातील १२ लाखचे दागिने लंपास केले होते. या चोरीचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
मालक अशोक सरफरे यांच्या मातोश्री या गावी राहतात. चार दिवसापूर्वी या बंगल्याची साफसफाई करून त्या जुन्या घरात राहायला गेल्या. आज सकाळी मुंबईवरून अशोक सरफरे हे कुटुंबासमवेत गावी आले. बंगल्यात जात असताना त्यांना बंगल्याचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी आत घरात प्रवेश केला तर बेडरूम मध्ये दोन्ही कपाटांच्या तिजोऱ्या या तुटलेल्या स्थितीत त्यांना आढळून आल्या. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. उशिरापर्यंत वैभववाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.