*सवंग लोकप्रियतेसाठी बॅनर*
*ऐतिहासिक मोती तलावाचे विद्रूपीकरण*
*तलावाच्या काठावरील विज दिव्याचे खांब बॅनर मुळे पडले कोसळून*
*सावंतवाडी शहर म्हणजे येरागबाळ्या सर्वांचीच मालमत्ता..*
मोती तलावाच्या काठावरून…..
शैक्षणिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेले सावंतवाडी म्हणजे पूर्वीचे सुंदरवाडी शहर, आज सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर लागलेल्या बॅनरमुळे विद्रूपीकरणाच्या खाईत लोटले गेले आहे. राजकीय नेत्यांची सवंग लोकप्रियतेसाठी चाललेली स्पर्धा ही सावंतवाडी शहराच्या विद्रूपीकरणास कारणीभूत ठरत आहे. सावंतवाडीत असे पहिल्यांदाच घडले की शहराच्या काठाने असलेल्या विद्युत खांबांवर प्रत्येकी एक दोन असे भले मोठे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी लावलेले बॅनर जागोजागी दिसले आणि सुरू असलेल्या पावसाळी वाऱ्यामुळे भले मोठे बॅनर सावंतवाडी शहराच्या तलावाला शोभा आणण्यासाठी लावलेल्या आकर्षक विजेच्या दिव्यांच्या खांबासहित जमिनीवर कोसळले. त्यामुळे सावंतवाडी वासियांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या बॅनरबाजी मध्ये सावंतवाडी शहरातील आणि शहराच्या बाहेरीलही लोकप्रतिनिधी नेतेमंडळी याच बरोबर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे ना.दीपक केसरकर यांचेही बॅनर लागल्याने जनतेमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसे पाहता ज्यांना कोणी ओळखत नाही किंवा प्रसिद्धीची हाव असते असेच लोक प्रत्येक वेळी बॅनरबाजी करतात.परंतु या बॅनरबाजी मध्ये यावर्षी मात्र जनमानसात ज्यांची स्वच्छ प्रतिमा आहे त्यांचेही बॅनर लागल्याने जनतेमध्ये खरोखरच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आणि सावंतवाडी सारख्या शहरात हे असे का घडले..? असा प्रश्नही उभा केला जात आहे.
सावंतवाडी शहरावर गेली दोन अडीच वर्ष प्रशासक म्हणून सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचीच सत्ता आहे. या प्रशासकीय राजवटीत लोकप्रतिनिधींचा कुठेही अडथळा नसताना सावंतवाडीच्या मुख्याधिकाऱ्यांनी घेतलेल्या मवाळ किंवा बेजबाबदार भूमिकेमुळे संपूर्ण सावंतवाडी शहराच्या तलावाकाठी बॅनर लागलेले असून या बॅनरबाजीमुळे प्रसिद्धी वॉरला सुरुवात झाली असून शहर विद्रूप दिसत आहे. अलौकिक सौंदर्य लाभलेले सावंतवाडीचे ऐतिहासिक मोती शहर आज बॅनरच्या मधून शोधावे लागते. अशी परिस्थिती सावंतवाडी शहराची झाली, आणि याला संपूर्णपणे सावंतवाडीचे मुख्याधिकारी साळुंखे हेच जबाबदार आहेत. शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सावंतवाडीतील नागरिक सावंतवाडी शहरात सुरू असलेले या बॅनर स्पर्धेमुळे पेटून का उठत नाहीत..? असा सवाल उभा राहत आहे. सावंतवाडी नगरपालिकेवर ज्यावेळी नगराध्यक्ष म्हणून बबन साळगावकर कार्यरत होते. त्यावेळी सावंतवाडी शहरात बॅनर लावण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेकडून परवानगी घ्यावी लागत होती, आणि त्यासाठी योग्य ती रक्कम सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाकडे भरून घेतली जात होती. त्याचप्रमाणे घेतलेल्या मुदतीत बॅनर काढला नसल्यास त्यावर दंड आकारणी आणि बॅनर जप्ती करणे अशी कारवाई केली जात होती. परंतु सावंतवाडी शहरावर मुख्याधिकाऱ्यांची प्रशासकीय सत्ता आल्यानंतर या सर्व गोष्टींना हरताळ फासला गेला आणि सावंतवाडी शहर म्हणजे येरागबाळ्या सर्वांचीच मालमत्ता असल्यासारखं वापरलं जाऊ लागलं. त्यामुळे सावंतवाडी शहराला असलेले सौंदर्य नष्ट होऊन आज शहर विद्रूप दिसू लागले. एकीकडे आजपर्यंत कधीही सावंतवाडी शहराच्या बाजारपेठेतील रस्ते एवढे खड्डेमय झाले नव्हते,इतके खड्डे यावर्षी सावंतवाडी शहरातील बाजारपेठेत दिसून आले. प्रशासकानी त्यावर मलमपट्टी केली तरी सावंतवाडी शहराची अशी दुर्दशा होण्यासाठी प्रशासक म्हणून सावंतवाडी शहराचे मुख्याधिकारी साळुंखे जबाबदार आहेत. सावंतवाडी शहरातील झालेल्या विद्रुपीकरणासाठी सावंतवाडीकर जनतेने पेटून उठले पाहिजे, तरच शहरात चाललेली ही तानाशाही बंद होऊन शहर पुन्हा एकदा सौंदर्याचा मुकुट धारण करून मानाने उभे राहू शकेल.