You are currently viewing सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरित्रातील असामान्यत्व

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरित्रातील असामान्यत्व

 

सर्वज्ञ चक्रधर स्वामी हे नवधर्म प्रवर्तक तर होतेच परंतु ते १३व्या शतकातील समाजपरिवर्तन करणारे आद्य क्रांतिकारी समाज प्रबोधनकार होते. त्यांच्या असामान्य कार्याचा आढावा घेऊ या.

सर्वज्ञ चक्रधरस्वामींचे कार्य सुरू झाले ते शके ११४३ पासून. हरीपाळदेव नांवाचे गुजरातेथील सोळंकी राजकुळातील युवराज तरूण वयातच निधन पावले होते.त्या मृत शरीरात काया प्रवेश करून चक्रधर स्वामी अवतीर्ण झाले. आणि युवराज पुन:जीवीत झाले.त्यानंतर ते यादवांसोबत च्या लढाईत स्वतः नेतृत्व करीत जिंकले सुद्धा होते.परंतु युद्धभूमिवरील विनाश पाहून ते उदास झाले होते. औदासिन्य घालविण्यासाठी युवराजांचा देहस्वभाव सांभाळनुसार ते जुगार खेळले.व हरले.जुगारातील देणी चुकविण्यासाठी त्यांनी पत्नी कमळादेवीस दागीणे मागीतले असता त्यांनी नकार दिला.मग वडील राजे विशालदेवांनी ती देणी चुकविलीही.परंतु ‘हरीपाळदेव’ आणखी जास्त उदास झाले. व त्यांनी महाराष्ट्र देशी रामटेकला जाण्याचा हट्ट केला.त्यांना लवाजम्यासह जाऊ देण्याची परवानगी कशीबशी मिळाली.परंतु स्वामींनी मार्गातूनच आपले सैनिक एक एक करीत परत पाठविले.अखेरीस शेवटल्या २ निष्ठावान सैनिकांनाही चकमा देऊन ते सर्व आभूषणे,राजचिन्हे राजवस्त्रे,ई.तेथेच ठेऊन देऊरवाड्या (जि‌.अमरावती) च्या मंदिरातून निघाले ते थेट रिध्दपूरलाश्री गोविंद प्रभू बाबांच्या दर्शनासाठी.एका हलवायाचे दुकानात स्वामींची भेट झाली असता श्री गोविंद प्रभू बाबांनी आनंदाने स्वामींकडे शेंगुळबुड्डे फेकत “*माझा देव- चक्रेया आला.चक्रधर आला.* “येथूनच स्वामींनी शिष्यत्व स्विकारून व “चक्रधर” हे नांव धारण करीत असामान्य जीवनकार्य सुरू केले.

रिद्धपूरहून चक्रधर स्वामी ,अत्यंत विरक्त, निष्कांचन अवस्थेत चालत चालत सालबर्डीच्या जंगलात पोचले‌.तेथील आदिवासी जनांच्या सोबत ते तब्बल १२ वर्षे एक दिव्य पुरूष म्हणून राहिले.ह्याच दरम्यान स्वामींनी पारध्यांपासून सशाचे रक्षण केले.व त्यास अभय दिले.तसेच योगी, तपस्वीनी मुक्ताबाईंचा उद्धार केला.

स्वामीजी पुन्हा गोविंदप्रभूबाबांच्या दर्शनासाठी रिद्धपूरला आले व तेथून ऊर्जा घेऊन ते तत्कालीन समाजातील चीड आणणारी स्पृष्यास्पृष्यता, जातीभेद,समाजाची स्रियांविषयींची अक्षम्य असमानता उपेक्षा व हीनकस वागणुक,सती प्रथा आदि मनुस्मृती तून निपजलेल्या परंपरा, वेदांनीपुरस्कृत केलेले यज्ञ,त्यातील हिंसा,पशू बळी,ह्यावर स्वामी वैचारिक प्रहार करीत राज्यभर फिरले.ह्या सर्व अनिष्ट परंपरांच्या व आचार्यांच्या मागील फोलपणा, गैरसमजूती लोकांना विनयाने पटउन देऊ लागले.

त्यांनी आपल्या ब्राह्मण शिष्यांनाहीं जातीभेद व वर्णश्रेष्ठत्वाचा विकल्प त्यागण्याची शिकवण दिली.त्यासाठी सर्वप्रथम आपल्या शिखा-सूत्रांचा (शेंडी व जाणवे) यांना सोडण्यास सांगीतले होते.

हिंसा सर्वथा त्याज्य केली.

एकदा जोगेश्वरीस ३ मातंग शिष्य स्वामींच्या दर्शनास आलेव दर्शनाचा आग्रह करू लागले.स्वामी विनवणी ऐकून बाहेर आले व मातंगांनी स्वामींना अर्पण केलेला लाडू स्वामींनी आपल्या ब्राम्हण शिष्यांना त्यांनी सर्व विकल्प सोडून देऊन खायला दिला.व त्यांनी तो खाल्ला.त्या काळातील केवढे हे क्रांतिकारी परिवर्तन!

आपल्या दाकोबा ह्या चांभार असलेल्या एकनिष्ठ शिष्यास ते आत मंदिरात घेतात.एवढेच नव्हे तर आपल्या ब्राम्हण भक्तांकरवी त्याचे पाय धुवून दाकोबास पंक्तीत सर्वांसोबत भोजनास बसवितात.अन्य एके ठिकाणी,एक चर्मकार जोडपे स्वामींना भेटले असता त्या चर्मकारास भावावस्था झाली.तो स्वामींसोबत संसाराचा त्याग करून धर्मास लागला.लोकांनी त्यांचे हे अवस्थांतर पाहून त्याचीही हारतुरे घालून पूजा केली. अशा विविध प्रसंगी सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी चातूर्वर्ण्याची संकल्पना तर्कशुद्धपणे मोडीत काढली.व तत्कालीन तथाकथीत शुद्रांनाही उच्चवर्णीयांच्या बरोबरीने मंदीर प्रवेशाचा व मोक्ष मिळविण्याचा हक्क असल्याचा ठामपणे पुरस्कार केला.

दुसर्‍या एका प्रसंगी, पतिवियोगाने एका दु:खीकष्टी माळीणीच्या आर्त विलापास द्रवून स्वामींनी तिचा माळी पती जीवंत केला.त्यांनी संगत व पंगतीत कधीच भेदभाव केला नाही.व करू दिला नाही.

सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या अमोघ दर्शनाने अनेक मुक्याप्राण्यांनाही वेध लागत असे.अनेकप्रसंगात त्यांनी सर्प, व्याघ्र ई.प्राण्यांनाही मोहीत केले, खेळवीले.भविष्यातील घटना आधीच वर्तवणे,तसे सर्प, ईंगळीचे विष उतरविणे,मृत बालकास जिवंत करणे,ग्रंथातील पाहिजे असलेल्या माहितीचे नेमके पान दुरूनच सांगणे,लांबदुरून द्वारकेचे दर्शन घडविणे, त्यांच्या करवी शेकडो दैवी व दिव्य चमत्कार घडले. परंतु त्यांनी कधी त्या चमत्कारांना महत्व दिले नाही.गवगवा केला नाही.आपल्या शिष्यांनाही चमत्कारांना विशेष मानण्याचे कारण नाही असे सुचवले.त्यांनी चमत्कार करून लोकप्रियता मिळवणे निषिद्ध मानले होते.

*स्त्री पुरूष समानता*:-

समाजात स्त्रीचे स्थान पुरूषांच्या बरोबरीचे असले पाहिजे.व स्त्रियांना शिक्षणाचा व मोक्षप्राप्तीचाही अधिकार असलाच पाहिजे. त्याकाळी मनुस्मृतीच्या आज्ञेप्रमाणे समाजात स्त्रियांची स्थिती फार उपेक्षेची वअवहेलनेची, दयनीय अशी होती.स्वामींनी त्या विरूद्ध ‘बंड’ केले. व आपल्या सर्व स्त्री शिष्यांना सुशिक्षीत व ब्रह्मज्ञानी करून घेतले होते. ते वेदकाळातील वेदऋचा लिहणार्‍या तत्वज्ञानी गार्गी व मैत्रेयींचा हवाला देत असत. “पुरूषांचे जीव व स्त्रियांच्या काय जीवलीया”(?) असा रोकडा प्रश्न ते विचारीत. त्यांनी१५-१६ शिष्यांना मातब्बर ब्रम्हज्ञानी तपस्वीनी करुन घेतले होते.

स्त्रियांच्या विटाळाच्या विटंबणास्पद वागणुकी विरूद्ध ते अत्यंत विज्ञाना धारीत तर्कशुद्ध युक्तिवाद करीत होते.”…..शिंदीचा वृक्ष सदा पाणी वाहे:अमंगळ द्वारे असती,” तयाचा विटाळ न मानी.” प्रत्येक क्रांतिकारी परिवर्तनास त्यांनी कृतीची जोड दिली होती‌.त्यांची स्त्रियांविषयीची वागणुक अत्यंत आपुलकीची, समान तेची व माणुसकीला जपणारी मुक्ततेची होती. ते शिकवीत की “आचरे तयाचा धर्म.*”

त्यांनी आपल्या अवतार कार्यात महाराष्ट्रभर रिद्धपूर, मेहकर,लोणार,वेरूळ,पैठण,नासिक,भंडारा,रामटेक असे भ्रमण करून धर्मप्रवर्तनाचे कार्य केले.फिरत असतांनाच संपुर्णअहिंसा व्रताचे पालन केले.भिक्षा मागून निर्वाह केला.परंतु भिक्षा मागतांनाही “*घर निवडोनी भिक्षा न की जे*”अशी समानता पाळण्याची आज्ञा शिष्यांना केली.

जरी सर्वज्ञ चक्रधरस्वामी गुजरातेतून महाराष्ट्रात आले असले तरी त्यांचेठायी मराठीचे ज्ञान व वाक्चातूर्य कमालीचे होते.त्यांना स्वत:ला संस्कृतचे उत्कृष्ठ ज्ञान असूनही त्यांनी नेहमी कटाक्षाने मराठीतच निरूपण केले व संस्कृत ज्ञानी शिष्यांना सुद्धा आवर्जून जनसामान्यांच्या बोलीभाषे तूनच लेखन व धर्मप्रसार करण्यास सांगीतले.

सर्वज्ञ चक्रधर स्वामी सर्व-ज्ञानी होते.त्यांना भगवद्गीता, तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान यांचे प्रचंड ज्ञान तर होतेच, परंतु ते अश्वपरीक्षा, घोड्यांची वैशिष्ठ्ये, जाती, किंमती, जाणत होते.त्यांना चूना तयार करण्याच्या पद्धती,पाषाणांचे व वनस्पतींचे प्रकार,औषधी ज्ञान,दूर्मीळ फळांची ओळख होती. त्यानी एकदा तर नर्तिकेच्या नृत्यातील व एकदा पखवाज वादकाच्या चुका निदर्शनास आणून दिल्या होत्या.व विषय निघाला असता स्वामींनी गोपाळ पंडीतांना भाषाशास्त्रातील९(+१) रस, ३६ प्रकारचे अलंकार विदीत केले.त्यांचे हे असे अगाध ज्ञान पाहून गोपाळ पंडीतांनी स्वामींजवळ शरणागती पत्करली.व त्यांना (प्रथम) आदराने ‘सर्वज्ञ’ संबोधने सुरू केले.

महींद्रभट्ट नावाचा प्रकांड पंडीत ब्राम्हण तेलंगणातून प्रभाकरशास्त्रही शिकून आल्याने अहंकारी झाला होता. त्याच्या पैठणच्या मामाने त्याची चक्रधर स्वामींसोबत चर्चा घडऊन आणली.तो स्वामींच्या अगाध ज्ञानाने, मोक्षप्राप्तीच्या द्वैतवादी, एकनिष्ठ, परमेश्वरभक्तीच्या महानुभाव धर्माच्या तत्त्वज्ञानाने दीपून गेला.व स्वामींचा विद्वानअसा शिष्योत्तम झाला.त्यांनीच पुढे मराठीतील आद्य ग्रंथ- ‘ *लीळाचरीत्रा*’चे लेखन केले.

*असामान्यत्व*:– तसे तर,चक्रधर स्वामींचे संपुर्ण कार्य अलौकिक, दैवी स्वरूपाचे चे आहे.पण तरीसुद्धा सर्वसामान्य लोकांनी स्वामींच्या चरीत्राचा अभ्यास केल्यास काही असामान्य गोष्टी प्रकर्षाने आढळतात. चक्रधर स्वामींचा हरीपाळदेव युवराजांच्या देहात प्रवेश, राजवैभव,द्रव्ये यांचा संपुर्ण त्याग, श्री गोविंद प्रभू बाबांचा अनुनय,१२वर्षांचे सालबर्डीतील वास्तव्य, समाजातील चातूर्वण,जाती प्रथा, सती प्रथा,व स्त्रियां- विषयींच्या अपमानास्पद वर्तणुकीचा प्रखर विरोध, तसेच वैदिक कर्मकांडे, धर्माधिष्ठीत हिंसा, कूप्रथा, परंपरा, ह्यावर प्रहार करीत,अद्वैती तत्वज्ञानाशी फारकत घेऊन भगवद्गीता प्रतिपादीत ‘मामेकं शरणं व्रज’,पद्धतीने अशा महानुभाव धर्माचा “यदायदाहीधर्मस्य ग्लानीर्भवती.. “*एथ जीवोद्धारण हेचि व्यसन*” ह्या प्रवृत्तीने सर्वत्र प्रसार केला.

त्यासाठी तत्कालीन ऊच्चवर्णीय धर्ममार्तंड यांचा प्रखर विरोध, अत्याचार सहन केला.

तत्कालीन चातुर्वण,कर्मकांडाचे पुरस्कर्ते यादवांचे प्रधान हेमाद्री पंडीत,राजगुरू महदाश्रम,व पुरोहीत ब्रह्मसानू यांच्या तर्फे २ वेळा स्वामींवर विषप्रयोग,एकदा सशस्त्र मारेकर्‍यांचा हल्ला,सततची हेतूपुरस्सर विषारी प्रचार प्रचंड निंदानालस्ती,ई. आपल्या दिव्य सामर्थ्याने स्वामींनी पचविल्या. तरी अखेरीस बलाढ्य सैनिकांना पकडण्यासाठी पाठविले असता स्वामी स्वतः हजर झाले .व आपले तत्वज्ञान व आचारीत असलेला धर्म पटऊन देण्याचा प्रयत्न केला. परंतु “*हे आमचा धर्म ऊच्छेदिती*” म्हणत प्रस्थापीतांनी त्यांना राज्याबाहेर काढून दिले.चक्रधर स्वामींनी मात्र अत्यंत विनयाने समतेचा महामंत्र लोकांना ममतेने पुरस्कारीला.आणि अखेरीस सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी शके ११९६मधे उत्तरा पंथे गमन केले.

आजही त्यांनी प्रतिपादन केलेल्या समता व अहिंसेच्या,परमेश्वर प्राप्तीच्या ज्ञान,वैराग्य, भक्ती पुरस्कर्त्या महानुभाव पंथाचे हजारो-लाखो तपस्वी व गृहस्थी अनुयायी सर्वदूर तत्वज्ञान, ब्रम्हज्ञानाचा प्रसार व अनुपालन करीत आहेत. सुरवातीच्या काही ब्राम्हण विद्वान शिष्यांसहीत पंथाच्या महंत परंपरेने मराठीत सुमारे ५०००ते ६०००ग्रंथाची विपूल साहित्य निर्मिती केली.व तिचे प्राणपणाने जतनही केले. त्यामुळे चरीत्रे, काव्ये, व्याकरण,शब्दकोष, संहिता, टीपा, स्थळदर्शन, ईतिहास ई.नानाविध प्रकारचे समृद्ध वाङमय मराठीस लाभले आहे.

 

मेजर प्रा.शरद पुसदकर

सहसंचालक

मिशन आय ए एस. अमरावती कॅम्प.

9423608651

प्रतिक्रिया व्यक्त करा