*येत्या १५ दिवसात प्रमुख रेल्वे गाडयांना कुडाळ रेल्वे स्थानकात थांबा द्यावा*
*अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीने २३ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन*
*महाविकास आघाडीच्या नेत्यांचा इशारा*
कोंकण रेल्वे मार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ रेल्वे स्थानक हे मध्यवर्ती व प्रवाश्यांच्या दृष्ठीने अत्यंत महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. परंतु कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अनेक गाड्या कुडाळ रेल्वे स्थानकावर थांबविल्या जात नाहीत. परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंख्य प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनचे चेअरमन संतोष कुमार झा यांच्याशी पत्रव्यवहार करत बांद्रा टर्मिनस, गरीब रथ, दुरांतो एक्सप्रेस, मडगाव एलटीटी एक्सप्रेस, मँगलोर सीएसएमटी एक्सप्रेस या प्रमुख गाडयांना येत्या १५ दिवसात कुडाळ रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी पत्रात केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास कुडाळ वासीय नागरिक व महाविकास आघाडीच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली दि २३ सप्टेंबर २०२४ रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, काँग्रेस कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांनी दिला आहे. गणेशोत्सवा अगोदरच हे आंदोलन करण्यात येणार होते मात्र चाकरमानी व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी गणेशोत्सवानंतर २३ सप्टेंबर २०२४ रोजी आंदोलन करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.