*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य आबासाहेब घावटे लिखित अप्रतिम कथा*
*गजरा*
निलू एका खेडेगावात रहात होती. तिला एक भाऊ व एक बहिण होती. तिचे वडील शेतमजूर होते. त्यांना स्वत:ची शेती नव्हती. त्यामुळं रोज दुसर्याच्या शेतावर जावं लागत होतं. त्या मजुरीच्या पैशावरच त्यांचं घर चालायचं. त्यामुळं सारख्या अडचणी यायच्या. त्यात आणखी भर म्हणजे निलूची आई सतत आजारी असायची. तिच्या औषधोपचाराचा खर्चही होताच. त्यामुळं त्यांची नेहमी ओढाताण असायची. पोटभर खायलासुध्दा वेळेवर मिळत नव्हतं.
निलू घरातली मोठी मुलगी. आई आजारी असल्यानं घरातलं सारं निलूलाच पहावं लागत होतं. तिची आई कसातरी स्वयंपाक तेवढा करायची. बाकी धुणं, भांडी, सडा रांगोळी, झाडलोट सारं निलू करायची. एवढसं वय पण कधी कंटाळा नाही की आदळआपट नाही. छोट्या भांवडांनाही ती छान सांभाळायची. घरातलं सगळं झालं की मग शाळा. शाळेतही ती मन लावून अभ्यास करायची.
तिच्या बाबांना तिचा खूप अभिमान वाटायचा. एवढ्याशा वयात किती काम करते. किती आधार आहे तिचा. किती माया लावते ती आपल्या भांवडांना. खूप मदत करते आपल्या आईला. आईला या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं. हसायचं, खेळायचं, इकडं तिकडं बागडायचं वय तिचं, पण आपल्या आजारपणामुळं तिला सारखं कामात रहावं लागतं. ती म्हणायची, “निलू, एवढ्याशा वयात किती गं काम पडतंय तुला? पण काय करू माझा इलाज नाही गं पोरी!”
“आई मी नाही तर कोण मदत करणार तुला? तू नको काळजी करू. तू फक्त लवकर बरी हो.”
“पोरी आता तर कुठे तू माझी मांडी सोडली आणि लगेच….”
“मी आता पाचवीत आहे. तरी अजून लहानच वाटते का तुला. घरातली अडचण मी नको का समजून घ्यायला?”
“अगं पण”
“आई तूच सांगते ना, जी मुलं अडचणी समजून घेतात, सांगेल तसं वागतात. घरच्यांना कामात मदत करतात. तीच गुणवान होतात. मोठी होतात, सर्वांची आवडती होतात”
“खरं आहे पोरी रूपापेक्षा, गुणाला व बोलण्यापेक्षा करण्याला अधिक महत्व असतं”
“आई, खूप कष्ट करणार आहे मी, मला खूप खूप शिकायचंय, बाबांना आणि तुला सुखात आनंदात ठेवणार आहे मी”
“माझी गुणाची बाळ गं….” पाणावलेल्या डोळ्यानं आईनं निलूला जवळ घेतलं. निलूचेही डोळे पाणावले.
निलूची शाळा खूप छान होती. शाळेत विविध उपक्रम राबवले जायचे. सगळी मुलं त्यात आनंदानं सहभागी व्हायची. तिच्या बाईही छान होत्या. त्या छान शिकवायच्या. त्यामुळं मुलांना खूप आवडायच्या. एकदा मुलांनी ठरवलं, बाईंचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करायचा. सगळ्यांनी मिळून कार्यक्रमाचं नियोजन केलं. केक कुणी आणायचा, भेटवस्तू काय काय आणायच्या, खाऊ काय आणायचा हे सारं ठरलं. कुणी काय, कुणी काय घेऊन येणार होतं.
संध्याकाळी घरी आल्यावर निलू आईला म्हणाली, “आई, उद्या आमच्या बाईंचा वाढदिवस आहे. प्रत्येकजण भेटवस्तू देणार आहे. मी काय देऊ गं?”
“पोरी, आपण गरीब आहोत, त्यात मी सारखी आजारी, बाबांच्या मजुरीवरच सारं भागवावं लागतं. त्यांनाही रोज काम मिळत नाही .काय करावं गं?”
“पण काहीतरी द्यायलाच हवं ना?”
“काय करावं पोरी? फाटलेल्या झोळीत काय असणार?”
“कसं गं आई, सार्या मैत्रिणी काय म्हणतील?”
“बरं बाई, पण मी सांगेन ती गोष्ट आवडेल का तुला?”
“पण काय द्यायचं ते सांग ना आधी”
“मोगर्याच्या फुलांचा छान गजरा करून देऊ तुझ्या बाईंना!”
“वा! मस्तच आई. आमच्या बाईंना गजरा खूप आवडतो. त्या रोज घालून येतात”
“मग तर छानच, आवडीची वस्तू मिळाली म्हणून खूप आनंद होईल त्यांना”
“हो ना, आत्ताच जाते, छान छान फुले घेऊन येते”
“मग तू दे हं छान गजरा करून”
“हो, बाळ”
“निलू छान छान फुले घेऊन आली. आईनं सुंदर गजरा तयार केला. एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून थंड जागी ठेवला.
शाळा भरली होती . आज मोठा आनंदाचा दिवस होता. मुलं स्वच्छ गणवेशात आली होती. बाईही नटून थटून आल्या होत्या. मुलांनी वर्ग छान सजवला होता. मुलींनी सुंदर रांगोळी काढली होती. वर्गाच्या प्रवेशद्वारावर पानाफुलांचे तोरण बांधले होते. वर्गात पताका लावल्या होत्या.
बाई वर्गात आल्या. टाळ्यांचा जोरात कडकडाट झाला. फुलांनी सजवलेल्या टेबलवर केक ठेवला होता. बाईंची खुर्चीही मुलांनी सजवली होती. रंगीत खडूने फलकलेखन केले होते. वर्ग प्रतिनिधीने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. बाई उभ्या राहिल्या. पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. बाईंनी केक कापला. सर्वांनी टाळ्या वाजवत त्यांना शुभेच्छा दिल्या. ओळीनं प्रत्येकजण येऊन बाईंना भेटवस्तू देऊ लागले. निलूचा नंबर आला. तिनं पिशवीतला पांढर्या शुभ्र मोगर्याच्या फुलांचा गजरा बाईंच्या हातात दिला. त्याच्या फुलांचा सुगंध सार्या वर्गात दरवळला.
“वा! काय सुंदर गजरा आणलास गं निलू? मला खूप खूप आवडला बघ. माझी अत्यंत आवडती वस्तू आणलीस बघ” असं म्हणून त्यांनी लगेच तो डोक्यात घातला.
बाईना भेटवस्तू देऊन झाल्या, सर्व मुलांचे आभार मनायला बाई उभ्या राहिल्या. आज एवढ्या मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा केल्याचं पाहून बाईंचं मन भरून आलं. त्यांनी सर्व मुलांचे कौतुक केलं.
बाई म्हणाल्या, “मुलांनो, आज आपण माझा भव्यदिव्य वाढदिवस साजरा केला. आपण एवढं काही कराल याची मला कल्पनाही नव्हती. टेबलावर ठेवायला जागा नाही एवढ्या भेटवस्तू तुम्ही मला दिल्यात. त्या सगळ्या वस्तू मला आवडल्या. पण त्यातली एक वस्तू मला अतिशय आवडली. ती म्हणजे, निलूनं आणलेला गजरा. फुलं म्हणजे निसर्गाची शोभा, सुगंधाचं भांडार, विविध रंगाने भरलेली पात्र, मायेचा कोमल नजराणा, हे सारं मला निलूनं या फुलांच्या रूपानं भेट म्हणून दिलं.
हे पहा मुलांनो, फुलांप्रमाणं मन सतत निर्मळ ठेवा. जे जे आपल्याजवळ चांगलं आहे. ते इतरांना देत रहा. सुखी व आनंदी जीवन जगा. निलू, तुझी ही भेट माझ्या कायम स्मरणात राहील. मुलांनी टाळयांचा कडकडाट केला. छोट्या निलूचा आनंद मात्र गगनात मावेनासा झाला.
आबासाहेब घावटे, बार्शी
मो.नं 9890829775