You are currently viewing शब्दांच्या पलीकडे..

शब्दांच्या पलीकडे..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*शब्दांच्या पलीकडे*

 

आमच्याकडे एकनाथ नावाचा एक गरीब मदतनीस होता. पहाटे सहा वाजता तो मागच्या दाराने यायचा आणि आल्याआल्याच अंगणातला पितळी बंब चकाचक घासून त्यात पाणी भरायचा आणि गोवऱ्या, काड्याकुड्या, एखादं लाकूड घालून तो बंब पेटवायचा. सगळ्यांच्या अंघोळी होईपर्यंत बंबात भर घालणे, खालच्या जाळीवरची राख झटकणे, या कामांबरोबरच गाई बैलांना चारा घालणे, पाणी पाजणे, शेण उचलणे, अंगण झाडणे अशी बरीच कामे तो करायचा. सकाळच्या कामाचा एक टप्पा उलटला की हळूच ओसरीवर येऊन बसायचा. माझ्या सासूबाई त्याच्यासाठी न्याहारी ठेवायच्या, पाण्याचा गडू भरून ठेवायच्या. गंमत म्हणजे हे सारं एक शब्द न बोलता मूकपणे रोजच्या रोज चालायचं. तो कुणाशी बोलायचा नाही आणि त्याच्याशी ही घरातले कुणी बोलायचे नाहीत.

“ एकनाथ! हे केलंस का?” असं विचारायची कधी वेळच यायची नाही. माझ्या सासूबाई घरातल्या इतर गडी माणसांना बोलून “सळो की पळो” करून सोडायच्या पण त्यांनी कधीच एकनाथला फटकारलं नाही कारण तशी कधी जरुरीच पडली नाही. मृदू, कठीण, कठोर कुठल्याच शब्दांचे तिथे काही कामच नसावे. एखादं यंत्र सुद्धा आवाज करतं पण एकनाथचा आवाज मी कधीच ऐकला नाही. तो मुका नव्हता म्हणून मी त्याला “गुपचूप एकनाथ” असे संबोधनही दिले होते.

 

एक दिवस तो असाच ओसरीवर बसला होता. कसलासा कागद हातात घेऊन वाचत होता. मला इतकंच माहीत होतं की इथे तो एकटाच राहतो जवळच्याच खेड्यात त्याचं कुटुंब राहत होतं. त्या दिवशी त्याला असं गुंग होऊन कागद वाचताना पाहून मी सहज त्याला विचारलं, “ काय वाचतोस?”

त्याने न बोलताच तो कागद माझ्या हातात दिला. ते एक पत्र होतं पण कोरं होतं. वर— खाली कुठेच काही लिहिलेलं नव्हतं पण एका कोपर्‍यात त्या कागदावर एक सुकलेल्या पाण्याचा छोटासा डाग होता ज्यानं शाईचा एक थेंब विस्कटला होता. त्या क्षणी मला माझ्याच हृदयातली कंपनं जाणवली. दोघंही निरक्षर. त्याच्या कारभारणीने कुणातर्फे पाठवलेला तो कागद होता आणि त्यातून एक सुकलेला अश्रू पाठवला होता. जणू तो विचारत होता, “धनी! कसे असा तुम्ही? आम्हासनी तुमची लय आठवण येते.”

त्या कोऱ्या कागदावरची अनेक अदृश्य अक्षरे वाचताना मी अक्षरशः कोसळून गेले.

त्या दिवशी जाणवले ते शब्दांच्या पलीकडचे शब्द. खरं म्हणजे शब्दांच्या पलीकडेच अव्यक्त शब्दांचा महासागर उसळलेला असतो. शब्दांच्या पलीकडच्या शब्दांना असतो तो भावनांचा सुगंध. “ मी तुझ्यावर प्रेम करते.” या श्रवणशब्दातली एक प्रकारची कृत्रिमता त्या कोऱ्या अव्यक्त, न उच्चारलेल्या शब्दात जाणवत नाही. नव्हे ती नसतेच. तिथे फक्त नजरेतला संवाद असतो, देहबोलीचा एक अगम्य अनुभव असतो, स्पर्शाची ती भाषा असते आणि त्या भाषेला शब्दांचं व्याकरण नसतं. ती अधिक व्यापक आणि समृद्ध असते. जिथे शब्दच गोठतात तिथे भावनांना सूर सापडतो. “या हृदयीचे त्या हृदयी” अलगद या अबोल सुरावटीतून पोहोचते. शब्दांची आवश्यकताच नसते हो तिथे! शब्द पोकळ असतात, यांत्रिक असतात, औपचारिक असतात, निर्विकारही असतात मात्र शब्दांच्या पलीकडले जे काही असते ते अधिक वास्तविक आणि अर्थपूर्ण असते. ते सजीव असते कारण त्यात ओलावा असतो, नैसर्गिकता असते.

 

अमेरिकेतील फॉल कलर्स बघताना मी नि:शब्द होते. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र मला एका अबोल अवस्थेत घेऊन जातो. नायगाराचा धबधबा बघताना मी शब्दांना विसरले. आकाशातून पडलेला तारा बघताना माझी दिङमूढ अवस्था होते. मेलबोर्नला पेनग्वीनची “खडी मार्च बघताना मी अशीच हरखून गेले होते आणि आयुष्यातला प्रत्येक सूर्यास्त —क्षितिजावरचा, डोंगरामागचा, समुद्रापलीकडचा पाहताना अंतर्मुख होते.

भावना जाणवतात त्यांना शब्दात मांडता येत नाहीत. ईश्वराशी झालेला खरा संवाद शब्दापलीकडचा असतो. ती आत्म्याची, अद्वैताची भाषा असते.आंतरिक भक्तीची भाषा असते.

अंतर्मुख अवस्था म्हणजेच शब्दांच्या पलीकडची अवस्था. अनंत सुखाचे, आनंदाचे, नवलाईचे, विस्मयकारी,भयावहही, प्रेमभरे क्षण आपल्याला नकळतच अंतर्मुख करतात.

पंडीत जसराजांचं गाणं आपल्याला स्तब्ध करतं. एखादी नृत्यांगना भान हरपवून टाकते. एव्हढंच कशाला? ऐन मोक्याच्या क्षणी खेळाडूने मारलेल्या सिक्सरनेही आपण आवाक् होतो.

 

आयुष्यात येणारे वियोगाचेही क्षण कधी असेच शब्दातीत वेदना देतात.

 

मी तिच्याजवळ नुसतीच बसले होते. तिच्याजवळ बसण्याची तिथल्या यंत्रणेने मला काही मिनिटांचीच परवानगी दिली होती. ती गादीवर शांत डोळे मिटून झोपली होती. तिच्या शांततेतली वेदना मला जाणवत होती. तिच्या तोंडावर मास्क होता. संपूर्ण शरीरभर नळ्या अडकवलेल्या होत्या. त्या नि:शब्द खोलीत फक्त मॉनिटरवरच्या सरकत्या प्रकाशबिंदूची एक अस्वस्थ करणारी टिकटिक होती. माझ्यावर सतत नाराज असलेली, माझ्याशी भांडणारी, माझ्यावर एक प्रकारचा हक्क गाजवणारी ती आता वेगळ्याच, लांबच्या प्रवासाला निघाली होती. गादीवर पडलेल्या तिच्या हातावर मी हळूच हात ठेवला आणि साऱ्या वेदनांना पार करून तिने माझा हात तिच्या मुठीत घट्ट धरला. शब्द नव्हते, बोल नव्हते, ध्वनी नव्हता, नाद नव्हता.. होता तो फक्त स्पर्श! मायेचा, ऊब देणारा म्हणून हवासा. गेल्या पासष्ट वर्षांच्या नात्यातल्या अनेकविध आठवणींना उजाळा देणारा फक्त तो एक स्पर्श. शब्दांच्या पलीकडचा तो स्पर्शच सांगत होता, तो स्पर्शच बोलत होता, “खऱ्या बहिणींची आपली जोडी ना? तुटणार ती आता. आनंदाने फक्त निरोप घेऊया..”

यंत्रणेचा बझर वाजला. तिच्या मुठीतून मी माझा हात हलकेच सोडवला आणि बाहेर आले. नि:शब्द होते मी! व्याकूळ होते.

तिच्या मुलाने मला हलकेच मिठीत घेतले, न बोलता. एक अव्यक्त, आश्वस्त, अबोल.. फक्त मिठी…

आणि याच क्षणी शब्दांच्या पलीकडे माझी लेखणी जाते..लेखणीतले शब्द विझून जातात.

 

*राधिका भांडारकर पुणे*.

प्रतिक्रिया व्यक्त करा