You are currently viewing संदीप गावडे यांचा प्रत्येक कार्यक्रम देखणा व वैविध्यपूर्ण : प्रभाकर सावंत 

संदीप गावडे यांचा प्रत्येक कार्यक्रम देखणा व वैविध्यपूर्ण : प्रभाकर सावंत 

आरपीडीच्या मैदानावर संदीप गावडे आयोजित दहीहंडी महोत्सवाचे शानदार उद्घाटन

 

अभिनेत्री दिव्या फुगावकर यांच्या उपस्थितीने आणली अनोखी रंगत

 

सावंतवाडी । प्रतिनिधी :

संदीप गावडे यांनी आयोजित केलेला प्रत्येक कार्यक्रम हा देखणा व वैविध्यपूर्ण असतो. या सर्व सोहळ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचा शतप्रतिशतपणा ओथंबून दिसतो. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधींची संदीप गावडे यांना नेहमीच साथ लाभली आहे. स्थानिक पातळीवरील मुलभुत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ते नेहमी करत आले आहेत. या माध्यमातून या मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व म्हणून ते विकसित होत आहेत. आरपीडीच्या या मैदानावर आज होत असलेला हा सोहळा यापुढेही दरवर्षी अधिकाधिक रंगतदार व भव्य होत जाईल यात शंका नाही. या सर्व कार्यात भारतीय जनता पार्टी त्यांच्या नियमित सोबत राहील, अशी ग्वाही भाजपचे अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.

सावंतवाडीतील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या पटांगणावर भाजप नेते संदीप गावडे मित्र मंडळ आयोजित भव्य दहीहंडी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी सभापती पंकज पेडणेकर, प्रमोद सावंत, माजी नगरसेवक मनोज नाईक, भाजप नेते संदीप गावडे, एकनाथ गावडे, संदीप यांच्या मातोश्री सौ. सुनिता गावडे, सौरभ गावडे, चंदन धुरी, जितेंद्र गांवकर, बंटी पुरोहित, गेळे सरपंच सागर ढोकरे, उमेश पेडणेकर, देवसू सरपंच रुपेश सावंत, म. ल. देसाई, दीनानाथ कशाळीकर, एकनाथ परब,  अनिकेत आसोलकर, अशोक परब, माडखोल माजी सरपंच बाळू शिरसाट, भाऊ कोळंबेकर, प्रकाश दळवी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते दहीहंडीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तर संदीप गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी उपस्थित मान्यवरांचा संदीप गावडे मित्रमंडळाच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. यानंतर वेतोरे येथील सिंधुरत्न ढोलपथकाने आपल्या बहारदार वादनाने कार्यक्रमात अनोखी रंगत आणली. यावेळी राजन तेली, संजू परब यांच्यासह अन्य मान्यवरांनीही कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी ‘मुलगी झाली हो ‘ व ‘धागा धागा जोडते नवा ‘ फेम दिव्या फुगावकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात अनोखी रंगत आणली. ढोल ताशांच्या गजरात तिने प्रेक्षकांमधून धमाल एन्ट्री घेत व नमस्कार सावंतवाडीकर ‘ अशा शब्दांत हाक देत चाहत्यांना अभिवादन केले. विशेष म्हणजे तिने मालवणीतून संवाद साधत कार्यक्रमात वेगळा उत्साह आणला. मी देखील कोकणातीलच असून कोकणात आल्याचा वेगळा आनंद आहे, असे ती म्हणाली.

तिच्या व्यासपीठावरील आगमनानंतर युवाईने एकच जल्लोष केला. या अभिनेत्रींनीही उपस्थितांशी संवाद साधताना संदीप गावडे यांच्या आयोजनाचे विशेष कौतुक केले. यावेळी संदीप गावडे यांच्या माध्यमातून शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

मुख्य कार्यक्रमात रंगत आणली ती विविध दहीहंडी मंडळांच्या उपस्थितीने. सावंतवाडी शहरासह तालुक्यातील दहीहंडी मंडळांनी यावेळी उपस्थित राहत थरांवर थर रचत सलामी दिली. यावेळी उपस्थित दहिहंडी प्रेमींनी टाळ्यांच्या गजरात उपस्थित गोविंदांना प्रोत्साहीत केले.

दरम्यान, दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांसाठी  बेस्ट इन्स्टा स्टोरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे प्रेक्षक आपल्या मोबाईल मध्ये दहीहंडी फोडणाऱ्या पथकांचे फोटो टिपण्यात दंग होते. रात्री उशिरापर्यंत या दही हंडी महोत्सवाचा थरार सुरु होता. कार्यक्रमाचे निवेदन नागेश नेमळेकर व प्रा. रुपेश पाटील यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा