*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सावळबाधा…*
ही रूणझुणली पैंजणे
खचित गवसली राधा
यमुनेच्या जलात काळ्या
अवतरली सावळबाधा।।
फांदीवर नटली पर्णे
पुष्पांनी वेल बहरली
कुंजवनात सारी आभा
अवघ्या भवताली सजली।।
हळवी राधा उमजेना
का कुणास माहित नाही?
शोधते कुठवरी कान्हा
दशदिशा व्यापूनी राही।।
व्याकुळ नको गं होऊ
बघ ह्रदयातच वसलेला
घनश्याम कुठे वेगळा
तो राधेतच भिनलेला।।
खचितच ही सावळबाधा
एकत्व जाण प्रणयाचे
राधेतच विलीन झाले
ते गूढ तत्त्व प्रेमाचे।।
………❤️❤️❤️❤️…….
अरूणा दुद्दलवार@✒️