विद्यार्थ्यांनी ‘टेक्नो सॅव्ही’ बनावे – जिल्हाधिकारी किशोर तावडे
सिंधुदुर्गनगरी
आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. शिक्षण क्षेत्रात देखील तंत्रज्ञान रुजत आहे. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा अधिक वापर केल्यास माहिती सहजपणे उपलब्ध होऊ शकत असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांनी ‘टेक्नो सॅव्ही’ बनण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले.
संपर्क स्मार्ट शाळा स्मार्ट ब्लॉक कार्यक्रमांतर्गत आयोजित कार्यशाळेत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, संपर्क प्रकल्पाचे अध्यक्ष के. राजेश्वरराव, शिक्षणाधिकारी गणपती कमळकर, श्री कुडाळकर, श्रीमती शिंपी आणि जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी म्हणाले, संपर्क स्मार्ट शाळा हा प्रकल्प सध्या जिल्ह्यातील तीन तालुक्यात सुरू आहे. तंत्रज्ञानावार आधारीत शिक्षणावर भर असणारा हा प्रकल्प जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत राबविणे आवश्यक आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला आधुनिक ज्ञान मिळून तो विद्यार्थी तंत्र स्नेही म्हणजेच ‘टेक्नो सॅव्ही’ बनेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे तो म्हणजे अधिकाऱ्यांची शाळांना भेटी देणे. या उपक्रमांतर्गत अधिकारी जेव्हा शासकीय कामकाजानिमित्त दौऱ्यावर असेल तेव्हा तो अधिकारी जिल्हा परीषद तसेच खाजगी शाळांना भेट देऊन शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवी उमेद निर्माण होईल आणि त्यांना शिक्षण घेताना प्रेरणा मिळेल असेही ते म्हणाले.
श्री देशमुख म्हणाले आज प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य झाला आहे. त्याला शिक्षण क्षेत्र देखील अपवाद नाही. विद्यार्थ्यांना शिकवताना तंत्रज्ञान सहाय्यभुत ठरणार असल्याने प्रत्येक शिक्षकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानामुळे संकल्पना सोप्या भाषेत अधिक स्पष्ट होतात तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण होते त्यामुळे ‘संपर्क’ हा कार्यक्रम महत्वाचा आहे असेही ते म्हणाले.
‘संपर्क’ प्रकल्पाचे अध्यक्ष के. राजेश्वरराव यांनी या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. या प्रकल्पामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासात कसा बदल होणार, तो कशा प्रकारे शिकणार याविषयी सांगितले.
योवळी शालेय शिक्षण विभागाच्या महत्वाच्या शासन निर्णय आणि परीपत्रकाचे वाचर करण्यात आले तसेच या उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.