वारस तपास शिबिराचे २३ व २७ ऑगस्ट रोजी आयोजन
कुडाळ
महसूल कुडाळ विभागाच्या पिंगुळी मंडळातर्फे पिंगुळी, बिबवणे व माणकादेवी सजातील वारस तपासाच्या प्रलंबित नोंदीसंदर्भात २३ व २७ ऑगस्ट रोजी वारस तपास शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. २३ रोजी पिंगुळी व बिबवणे, तर २७ रोजी नेरुर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंगुळी महसूल मंडळांतर्गत सजातील ज्या गावांमधील खातेदारांचे वारस तपास नोंदीसाठी दिलेले अर्ज प्रलंबित आहेत, अशा खातेदारांनी अर्जासोबत दिलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून घेणे आणि वारस तपासाचे काम लवकर पूर्ण करण्याच्या उद्देशाने कुडाळच्या प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे व तहसीलदार वीरसिंग बसावे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. सातबारा हस्तलिखित नोंदी तसेच १५५ च्या नोंदीचे महसूल विभागाकडे अर्ज प्रलंबित असतील, अशा अर्जाचा निपटारा करण्याच्यादृष्टीने कार्यवाही करण्यात येणार आहे. पिंगुळी सजा अंतर्गत पिंगुळी, टेंबधुरीनगर, गुढीपूर, सांगिर्डे, देऊळवाडी, गोंधळपूर या महसुली गावांसाठी २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पिंगुळी ग्रा.पं. कार्यालय येथे, तर त्याच दिवशी बिबवणे सजातील बिबवणे व मांडकुली या गावांसाठी दुपारी २ ते सार्यकाळी ६ या वेळेत बिबवणे ग्रा.पं. कार्यालय येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. २७ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत माणकादेवी सजातील माणकादेवी, कविलगाव, कुटगाव या महसुली गावांसाठी नेरुर ग्रा.पं. कार्यालय येथे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. प्रलंबित अर्जदारांनी या शिबिरांना उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन पिंगुळी मंडळ अधिकारी गुरुनाथ गुरव यांनी केले आहे.