*ज्येष्ठ साहित्यिका मानसी जामसंडेकर लिखित अप्रतिम मुक्तछंद काव्य लेखन*
*हळवे नाते इवल्याशा रोपाशी*
फांदी मिळाली एकदा
गुलाबाची , रोवली
काळ्या मातीच्या गर्भी
रोज पाणी शिंपणात
करी गुज तिच्या गाभी…..
जराशी तरारता…
आली तिला पल्लवी
हर्ष मावेना अंतरी
कोवळ्या लुसलुशीत
हिरव्या पोपटी पर्णात
दडलेला स्वैर स्वानंद
गिरक्या घेउनी लागला
नाचायला…. सैराभैरा
प्रतिदिनी सुप्रभाती
कोवळ्या कवडशात
लालसर नाजुक साजुक
पालवी गुलाबाची
लागली डोलू हर्षभरे….
अचानकशी पडली दृष्टी
ईवल्याश्या कळीवरी
अंतरी बरसल्या
हर्षानंदाच्या सरी….
आणि हृदयी उचंबळलेल्या
जोष उत्साहाच्या वृष्टी….
इवल्याशा रोपाचे
झाले गुलाबाचे रोपटे
जीव लावला त्याने जीवाला
जरी ते, नाजुक धाकटे…….
अंतरीचे अंतरीशी
नाते जोडलेले हळवे
नवनिर्मितीत, सृजनतेत
क्षण भावुक बरवे……….!
*मानसी जामसंडेकर, गोवा*