You are currently viewing कॅथॉलिक पतसंस्थेला २ कोटी ५० लाख रुपयाचा नफा

कॅथॉलिक पतसंस्थेला २ कोटी ५० लाख रुपयाचा नफा

पुढील पाच वर्षात ५०० कोटी रुपये ठेवींचे उद्दिष्ट; आनमारी डिसोजा यांची माहिती

 

सावंतवाडी :

 

कॅथॉलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला यावर्षी २ कोटी ५० लाख रुपयाचा नफा झाला आहे. त्यामुळे संस्थेने सभासदांना १४% लाभांश मंजूर केला आहे. संस्थेकडे २२२ कोटी रुपये ठेवी असून, गुंतवणूक ७२ कोटी रुपये इतकी झाली आहे. संस्थेने पुढील पाच वर्षात ५०० कोटी रुपये ठेवींचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती कॅथॉलिक पतसंस्थेच्या अध्यक्ष श्रीमती आनमारी डिसोजा यांनी सभासदांना दिली.

कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी नवसरणी केंद्र, सावंतवाडी येथे संस्थेचे अध्यक्षा डिसोजा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या प्रसंगी त्या बोलत होत्या. सभेला मुख्य पाहुणे म्हणून सावंतवाडी चे पॅरिश पिस्ट, फादर मिलेट डिसोजा उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच प्रार्थना करून दीपप्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक सहकार रत्न खी. पी. एफ. डॉन्टस तसेच पंचतत्वात विलीन झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे सभासदांच्या पाल्यांचा शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य संपादन केल्याबद्दल त्यांच्या सत्कार करण्यात आला. त्यानंतर इतिवृत्त वाचन असिस्टंट जनरल मॅनेजर श्री एव्हरेस्ट मेंडीस यांनी केले. तर अहवाल वाचन सर व्यवस्थापक श्री जेम्स बॉर्जिस यांनी केले संस्थेची आर्थिक परिस्थिती मजबूत असून यावर्षीही संस्थेने आपला ऑडिट वर्ग ‘अ’ कायम ठेवला असल्याचे सरळ व्यवस्थापक जेम्स बॉर्जिस यांनी सांगितले.

त्यानंतर सावंतवाडी येथील ‘लिटल सिस्टर्स ऑफ पुअर’ ही संस्था करीत असलेल्या समाजसेवेची दखल घेऊन संस्थेच्या वतीने सुपीरियर सि. अनिता रोज यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व रोख रक्कम देऊन संस्थेच्या अध्यक्षा आनमारी डिसोजा फा. फीलेट डिसोजा व संचालकांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. ‘लिटल सिस्टर्स ऑफ पुअर’ कोणत्याही पैशाची अपेक्षा न करता, कुठल्याही जाती-धर्माचा विचार न करता, अनाथ गोरगरीब, ६० वर्षावरील वृद्ध माणसांची आपुलकीने व प्रेमाने सेवा करतात त्यांची काळजी घेतात. त्यांची काळजी घेतात व यासाठी त्या स्वतः गावोगावी, घरोघरी किंवा आठवडा बाजारात जाऊन लोकांकडे मदत मागतात व त्यातून आपला व या वृध्द माणसांचा उदरनिर्वाह करतात, अशी माहिती संस्थेची सरव्यवस्थापक यांनी सभासदांना दिली. तसेच त्यांच्या या कार्यास पैश्या रूपाने किंवा वस्तुरूपाने मदत करून या ईश्वर रुपी सेवेस हातभार लावण्याची विनंती त्यांनी सभासदांना केली. त्यानंतर सि. अनिता रोज यांनी आपल्या कार्याची दखल घेऊन आपल्या सत्कार केल्याबद्दल सर्व संचालक, सभासदांचे आभार मानले. वृद्धांची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा असून यातून आपण येशू ख्रिस्ताला पाहतो असे, त्या म्हणाल्या. यावेळी सभासदांना १४ टक्के लाभांश मंजूर करण्यात आला व सभा सुरू असतानाच सभासदांच्या सेविंग खात्यावरही जमा करण्यात आला. त्यामुळे सभासदांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी फा. मिलेट डिसोजा यांनी आपले मनोगत व्यक्त केले व संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन संस्थेचे व्हा. चेअरमन श्री पीटर दिया यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन श्री फॅंकी डॉन्टस यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा