You are currently viewing नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन

नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन

*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका, निवेदिका, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम लेख*

 

*नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन*

 

श्रावण महिन्यात पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण येतो.भाऊ बहिणीच्या या पवित्र प्रेमाला राखी पौर्णिमेच्या दिवशी जणू उधाणचं येते.या दिवशी बहिण सुंदर पाट मांडते.पाटाभोवती विविध कलाकुसरतेने रांगोळी काढते.व भावाला ओवाळण्यासाठी ताटाची आकर्षक सजावट करते.भावाच्या कपाळावर कुंकू, अक्षदा लावते.व त्याला ओवाळते, राखी बांधते.मिठाई भरवते. भावाचे तोंड गोड करते.मग भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणीच्या ताटात पैसे, भेट वस्तू देतो.त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार तो आपल्या बहिणीला ओवाळणी देऊन खूष ठेवतो.

आपल्या भावाची प्रगती व्हावी आणि त्याचबरोबर त्याने बहिणीचे रक्षण करावे.ही त्यामागची भावना असते.आपला भाऊ सुखी, समाधानी, आनंदी असावा.त्याने आपल्या आई वडिलांचा ,परीवाराचा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा असे प्रत्येक बहिणीला वाटत असते. तसेच आपल्या बहिणीला ही कोणत्याही प्रकारची उणिव भासू नये यासाठी भाऊ तिला एखाद्या फुलाप्रमाणे जपत असतो.एवढं राखीच्या धाग्याचं महत्त्व आहे.

आपल्या भारत देशात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.श्रावण महिन्यात विविध दुकानातल्या राख्या ह्या बहिणींचं लक्ष वेधून घेत असतात.सोन, चांदीच्या राख्यांपासून ते विविध धातू पर्यंत , रेशमी रंग बेरंगी विविध प्रकारच्या, विविध आकाराच्या वेगवेगळ्या रंगांच्या राख्या दुकानात बघायला मिळतात.त्यावेळी राखी घेणारी बहिण गोंधळते. माझ्या भावाच्या हातावर, मनगटावर कुठली राखी शोभून दिसेल, असेच तिला वाटत असणार नाही का?

 

बहिण देखील आपल्या परिस्थिती नुसार राख्या खरेदी करते.कारण बाजारात, स्वस्त व महागड्या देखील राख्या असतात.त्यामुळे असे वाटते की, राखी कुठलीही असो त्यामागचा उद्देश महत्वाचा आहे.त्यातलं वात्सल्य, प्रेमभावना, यांना मोलाचं स्थान देणे महत्त्वाचे आहे.

 

आपल्याकडे राखी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा देखील म्हणतात.या दिवशी आपले कोळी बांधव दर्याला चला आता दर्याला चला.. नारळी पुनवेच्या मुहूर्ताला चला… अशा प्रकारची अनेक कोळीगीत गात समुद्रावर जातात.

सण आलायं गो नारली पुनवेचा… गीत गात, नृत्य करतात.सुमुद्राची पूजा.. अर्चा करतात.त्याच प्रमाणे समुद्राला नारळ अर्पण करतात.कोळी स्त्रीला तर अगदी मनोभावे सागर राजाची पूजा करतात.त्याच बरोबर समुद्राला नारळ अर्पण करतात.हे दयासागरा! तूच आमचा अन्नदाता आहेस.तूच आमचा रक्षणकर्ता आहेस.

माझा धनी तुझ्या अथांग सागरात प्रवेश करणार आहे. म्हणून त्याचे बेभान वाऱ्यापासून रक्षण कर.त्याला विपूल सागर संपत्ती मिळू दे. त्याची बोट सुखरुप सागर किनाऱ्यावर येऊ दे!

या दिवशी अनेक लोक नवीन वस्त्रे परिधान करतात.विशेष करुन कोळी बांधव व भगिनी पारंपरिक कोळी वेष परिधान करतात.सुंदर वस्त्र, विविध प्रकारचे अलंकार, सुंदर गीत, ओठांवर गात,हासत नाचत सर्व मिळून अत्यानंदाने या सणाचा आस्वाद घेतात.

 

कोळी बांधव या दिवशी जेवणात नारळ,भात खातात.तर काही जण नारळ करंज्या करतात.करंज्या सारखे गोड पदार्थ तयार करुन खातात. सागर पुत्रांच्या आनंदाला जणू भरतीचं आलेली असते.त्यामुळे लहान थोर, गरीब श्रीमंत, जात.. पात धर्म भेद विसरुन आपण सर्व एक आहोत या भावनेने हा सण साजरा करतांना दिसतात.

 

नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याकडे समुद्रावर जणू यात्रेचे स्वरुप आलेले दिसते.रंगबेरंगी पोशाखातील स्त्री, पुरुष,मुले,मुली, बालगोपाल तर वयोवृद्धा पर्यंत लोक समुद्र दर्शनास येत असतात.त्यावेळी येथे अनेक खाद्यपदार्थ विक्री साठी उपलब्ध असतात.विविध खेळणी,फुगेवाले तर सर्वांचेच लक्ष वेधून घेतात.अशा प्रकारच्या वस्तू खरेदी विक्रीचा आनंद बालगोपाळांसाठी असतो.सर्व च त्या आनंदात सहभागी होतात.त्यामुळे खूप मजा वाटते.

तसेच सागरावर निस्सिम प्रेम करणारा कोळी बांधव जेव्हा आपली सजवलेली,पाना फुलांनी बहरलेली, रंगबेरंगी पताका लावलेली बोट ती एखाद्या नववधू प्रमाणे दिसते.तेव्हा त्याच्याही आनंदालाही भरती येते.म्हणून काही हौशी बोटीवाले हौशी लोकांना, समुद्रात बोटीवरुन फेरफटका मारुन आणतात तेव्हा अंगावर जसे जलाशयाचे कारंजे पसरावे तसे आनंदतिशयाने भिजून निघतात.

 

‌ सागराच्या उधाणा बरोबरचं माणुसकीचे, जिव्हाळ्याचे उधाण जणू आल्यासारखे वाटते!हे अगदी खरेचं हं..!

नारळी पौर्णिमेला पाऊस जरी पडत असला तरी देखील लोकांची गर्दी होते.पावसात ओलेचिंब भिजणं, थंडगार वाऱ्यावर डुलत, सृष्टी सौंदर्य बघत, पावसाच्या सरीत न्हाऊन जाण्याची मजा काही औरच…!

नारळी पौर्णिमेनंतर खवळलेला समुद्र शांत होतो.त्यामुळे पावसाळ्यात बंद असलेली मासेमारी पुन्हा सुरु होते.त्यामुळे अन्नदात्याची पूजा केली जाते.

 

‌ या दिवशी बहुतेकांना सुट्टी असल्यामुळे अनेक व्यक्तींच्या भेटी गाठी होतात.आणि भूतकाळातील आठवणींना उजाळा मिळतो. अनेकांची मने भरुन येतात.व भूतकाळातील आठवणींनी डोळेही ओलावतात.

 

रक्षाबंधनात अनेक ऐतिहासिक कथांची, धार्मिक कथांची माहिती मिळते.कथा…एकदा एक हिंदू स्त्री झेलम नदीची पूजा करीत होती.व त्या पाण्यात ती राखी अर्पण करीत करु लागते त्याचवेळी त्या झेलम नदीच्या किनारी सिकंदर राजा आला.त्याने त्या स्त्रीकडून पूजा विधिचे कारण विचारले.त्याला देखील तिने या पवित्र धाग्याची माहिती सांगितली.राजाला सर्व महत्त्व पटले.व त्याने त्या स्त्रीकडून राखी बांधून घेतली.

 

फार वर्षांपूर्वी राजे लोक युद्धासाठी निघत.तेव्हा त्यांच्या हाताला राखी बांधण्याचे काम पुरोहित करत.राखी पुनवेच्या सणामुळे बहिण भावाला राखी बांधते.आपला भाऊ सुखरुप परत यावा.म्हणून रजपूत बहिणी देखील आपल्या भावाला युद्धाला जाण्यापूर्वी राखी बांधत असतं.

 

संत ज्ञानेश्वरांनी देखील आपली बहिण मुक्ताबाईला आईच्या मायेने सांभाळल्याचे आपण ऐकतो.असे हे भाऊ बहिणीचे नि: स्वार्थी प्रेम..!

 

तसेच श्रीकृष्णाने देखील द्रौपदीसाठी वेळोवेळी मदत केली होती. म्हणून बंधू व भगीनींनो आपले जर आपआपसातील वाद विवाद असतील तर ते विसरुन आपल्या बहिणीच्या हाताने राखी बांधून घ्या.व पुन्हा नव्या दिवसाचं स्वागत करु या…!

 

बहिण..भाऊ यांच्यातील नाते, सख्खे,चुलत,मानलेले,असे न मानता ,माझा भाऊ,माझी बहिण असे जर मानले तर त्यातील माया, ममता , स्नेह, एकमेकांवरील विश्वास त्या धाग्याने अधिक घट्ट होईल.

 

 

आपल्यातील सर्व भाऊराया आज देखील बहिणीच्या हातून राखी बांधू शकत नाहीत.कारण काही देशसेवा करत आहेत.तर काही आपल्या बहिणी पासून दूर खूप लांब अंतरावर शिक्षणासाठी, नोकरी साठी, व्यवसायासाठी, समाजकार्यासाठी गेलेआहेत.त्यामुळे त्यांच्या मनात इच्छा असूनही रक्षाबंधन हा सण साजरा करता येत नाही.म्हणून आपण देखील अशा भाऊरायांना राखी बांधू या!जे आधी आपलं कर्तव्य पार पाडत आहेत.अशा भाऊरायांना आपली ही राखी नक्कीच पोहचू शकेल.यासाठी आपण सर्व भगिनी प्रयत्न करु या!

 

आज रक्षाबंधन

भाऊ करी देशसेवेचं रक्षण

भाऊ तुझा अभिमान

कसं फेडू रे हे ऋण

काव्याच्या माध्यमानं

की, रेशमी धाग्यानं

आठवण क्षणोक्षण!

तुझ्या प्रयत्नानं

झालयं नंदनवनं

असा राखी पुनवेचा सण

दरवर्षी या सणाची

प्रतिक्षा करते रे

तुझी बहिण!

 

*रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!*

प्रतिक्रिया व्यक्त करा