*निसर्ग हा आपला श्वास:दादासाहेब महाडीक*
*वृक्षसंवर्धन हे आपले आद्य कर्तव्य :प्रविण वरुणकर*
कणकवली :
निसर्ग हा आपला श्वास आहे, निसर्ग असेल वने असतील तरच आपले अस्तित्व टिकेल, म्हणून आपण त्यांचे अस्तित्व टिकवूया असे प्रतिपादन निसर्ग मित्र परिवाराचे माजी अध्यक्ष दादासाहेब महाडिक यांनी केले. ते वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळेरे, निसर्ग मित्र परिवार व सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग (परिक्षेत्र कणकवली) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात ‘चालली हो दिंडी झाड पालखीत’ या निसर्ग गीताच्या गजरात वृक्षदिंडी कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी तळरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर,वनपाल अनिल पाटील, तळेरे वनरक्षक तेजस चौगुले, माजी सरपंच व शाळा स.सदस्य प्रवीण वरुणकर,निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष व पत्रकार संजय खानविलकर,निर्धार न्यूज चॅनलचे परेश राऊत,श्रावणी कॉम्प्युटर्सचे सर्वेसर्वा तसेच निसर्ग मित्र परिवाराचे सदस्य सतीश मदभावे,प्राचार्य अविनाश मांजरेकर,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद,ग्रामस्थ दर्शन घाडी, विद्यार्थी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
विकासाच्या उंबरठ्यावर आपण जरी असलो तरी अजून वृक्ष लागवड करण्यात आपला देश कमी पडतो आहे,आणि आपण या देशाचा नागरिक या नात्याने आपले कर्तव्य आहे की आपण झाडे लावून त्यांना जगवले पाहिजे,असे मत शाळा स.सदस्य प्रवीण वरुणकर यांनी मांडले.
याप्रसंगी विद्यालयाच्या परीसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.वृक्ष आपले संरक्षण करतात म्हणून त्याला राखी बांधण्याचा अभिनव उपक्रमही यावेळी घेण्यात आला.प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी वारकरी वृक्षदिंडी रिंगण सोहळाअनुभवला.यावेळी वृक्षांवर आधारित गीते गाण्यात आली.सर्व मान्यवरांनी ‘झाड पालखी’ घेऊन प्रत्येक नागरिकांनी झाडांना जपलं पाहिजे,त्यांचे जगणे म्हणजे आपले अस्तित्व हा संदेश दिला.
ही वृक्षदिंडी यशस्वी होण्याकरीता प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर, प्राध्या.एन.पी.गावठे, जेष्ठ शिक्षक सी.व्ही.काटे, डी.सी.तळेकर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.