You are currently viewing व्यसनमुक्‍तीला पोषक व्यवस्था राबविण्यासाठी नियोजन करा…

व्यसनमुक्‍तीला पोषक व्यवस्था राबविण्यासाठी नियोजन करा…

व्यसनमुक्‍तीला पोषक व्यवस्था राबविण्यासाठी नियोजन करा…

नशाबंदी मंडळाची मागणी; जिल्‍हाधिकाऱ्यांना दिले निवेदन…

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यसनमुक्‍तीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी पोषक व्यवस्था निर्माण करा, अशी मागणी सिंधुदुर्ग नशाबंदी मंडळाने केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्‍हाधिकारी किशोर तावडे यांना देण्यात आले. तर नशाबंदी मंडळा कडून आलेल्या निवेदनाची आपण पूर्तता करू असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले. त्‍यानंतर जिल्हाधिकारी यांच्यासह उपस्थित सर्वांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.
“करू व्यसनमुक्तीचे खंडन, हेच स्वातंत्र्याचे रक्षाबंधन” हे धेय्य घेऊन नशाबंदी मंडळ सिंधुदुर्गच्यावतीने अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा प्रारंभ जिल्‍हाधिकारी किशोर तावडे यांना व्यसनमुक्तीची राखी बांधून करण्यात आला. यावेळी नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पितां मुंबरकर, नशाबंदी मंडळ जिल्हा संयोजन समितीचे अध्यक्ष श्रावणी मदभावे, पदाधिकारी स्मिता नलावडे, मेघा गांगण, सुप्रिया पाटील, श्रध्दा कदम, रिमा भोसले, राजेंद्र कदम, महेश सरनाईक, सतीश मदभावे आदी उपस्थित होते. यासर्वांनी जिल्‍हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
या निवेदनात म्‍हटले की, संविधान कलम ४७ नुसार वाढत्या व्यसनांना प्रतिबंध घालून, जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, सार्वजनिक ठिकाणे व्यसनमुक्त घोषित कारावीत. त्या ठिकाणी व्यसनमुक्त भाग दर्शविणारे फलक लावले जावेत. केंद्र शासनाची ‘नशा मुक्त भारत’ चळवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयातील दहा दहा विद्यार्थी निवडून त्यांचे व्यसनमुक्ती दूत स्थापन करून त्यांच्या माध्यमातून नशा मुक्त भारत अभियानाची मोहीम घराघरात राबवावी. व्यसनमुक्तीला पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. यासाठी सिंधुदुर्गातील प्रशासनाच्या विविध विभागाचे सहकार्य घेऊन योग्य पद्धतीने नियोजनपूर्वक आखणी करावी.
दरम्‍यान व्यसन विरोधी उपक्रम राबविण्याकरिता जनजागृती करण्यासाठी प्रशासनाच्या विविध विभागाकडून सहकार्य केले जाईल तसेच नशाबंदी मंडळा कडून आलेल्या निवेदनाची आपण पूर्तता करू असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासह सर्वांनी मिळून व्यसनमुक्तीची शपथ घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा