कणकवली / तळेरे:
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या आदेशान्वये सर्वत्र नुकताच शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य आणि महाविद्यालय येथे या शैक्षणिक सप्ताह निमित्त अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या शिक्षण सप्ताहामध्ये प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश असणारे विविध उपक्रम घेण्यात आले सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासून अध्ययन अध्यापन साहित्य दिवस,मूलभूत संख्याज्ञान,विज्ञान प्रयोग व साक्षरता दिवस,क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस,कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस,मिशन लाईक च्या दृष्टिक्षेपात इको क्लब, शालेय पोषण व स्नेहभोजन दिवस अशा मुख्य विषयांमध्ये बुद्धीला चांदना देणारे बुद्धिबळ,मनोरंजनात्मक सापशिडी,लुडो,गणितीय खेळ, गणिती क्लृप्त्या, गणित तज्ञांच्या गोष्टी,प्रयोगशाळेतील वस्तूंची ओळख, हाताळणी,वेशभूषा, भाषा ,कला,वाचनालयातील पुस्तक वाचन,कागदी व कापडी पिशव्या तयार करणे,शैक्षणिक डिजिटल उपक्रम सांस्कृतिक व ऐतिहासिक जागृती,प्रथमोपचार कार्यशाळा,निसर्गाचे संरक्षण, आधारित माहिती,समुहगीत गायन,नृत्य,तसेच खाद्यपदार्थ प्रदर्शन व विक्री या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी व्यवहार ज्ञानाचे धडे घेतले.
यावेळी शाळा समिती सदस्य शरद वांगणकर,प्रवीण वरूनणकर,उमेश कदम,संतोष जठार,निलेश सोरप ,आदींनी उपस्थिती दर्शवत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.प्रत्येक उपक्रम यशस्वी होण्यामागे प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर ,ज्येष्ठ शिक्षक सी.व्ही.काटे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी यांच्या सक्रिय सहभाग मोलाचा ठरला.