*आमचे नेते स्तुती करत असतील, जनहिताच्या दृष्टीने स्पष्टच बोलणार*
*भाजपा जिल्हा प्रवक्ते सच्चिदानंद उर्फ संजू परब*
सावंतवाडी :
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जनता दरबाराला उपस्थित राहण्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाणीवपूर्वक टाळले, आयत्यावेळी मुंबईत गेले कबूलायतदार गावकर बैठक बोलावून जिल्हाधिकारी यांचीही अनुपस्थिती दर्शविली. असा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा प्रवक्ते सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी आज केला. दीपक केसरकर यांनी नौटंकी बंद करावी, आमचे नेते नारायण राणे त्यांची स्तुती करत असतील, पण मतदार संघाच्या हिताच्यादृष्टीने मी स्पष्टच बोलणार असेही प्रश्नोत्तरा दाखल संजू परब म्हणाले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा जनता दरबार आज झाला. या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी सायंकाळी सावंतवाडीतील शिल्पग्राम येथे पत्रकार परिषद घेतली. आपण महायुतीत आहात, आमच्या शिवाय तुमचं काही होणार नाही, तुम्हाला जनतेचे सोयरसुतक काही नाही. आता नाटक बंद करा अशा शब्दात संजू परब यांनी केसरकर यांना सुनावले.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा जनता दरबार दीपक केसरकर यांना रुचला नाही. असा आरोपही त्यांनी केला. जाणीवपूर्वक त्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह कबुलायतदार गावकरप्रश्र्नि मुंबईत बैठक बोलाविली. मुख्यमंत्री असल्यासारखे दीपक केसरकर घोषणा करतात. तुम्ही जिल्ह्याचे पालक नाही आहात हे भान ठेवा असेही संजू परब म्हणाले.