You are currently viewing राऊळीची दीपमाळ

राऊळीची दीपमाळ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणेचे ज्येष्ठ साहित्यिक, भावकवी विगसा यांच्या भावपुर्ण कवितेचे श्रीकांत दिवशीकर यांनी केलेले रसग्रहण .*

 

*राऊळीची दीपमाळ*

********************

भेटलीस गं तू मज नदीकिनारी जेंव्हा ।

संथ मंजुळमंजुळ सरिता नादत होती ।

तीरावरच्या त्या रम्य राऊळ गाभारी ।

निरांजनी मंदमंद फुलवात उजळत होती ।।१।।

 

पारावरी त्या झुळझुळला होता पिंपळ ।

वाळवंटी त्या सांजवेळ थबकली होती ।

लेवुनी अलगदी गडदकेशरी रंगली संध्या ।

उपसत वाळु झऱ्यातुनि तू कुंभ भरित होती ।।२।।

 

तव नाजुक कटीवरुनी झरझरता तो कुंभ ।

पाहता तुज मन तृप्त अधीर पापणी बंद ।

छुमछुम छंनछंन छुमछुम घुमता पैंजण ।

त्या नादात घुंगरांच्या प्रीत गुंतली होती ।।३।।

 

नकळत हळुच वळुनी सहजच पाहिलेस तूं ।

झाले धुंद श्वास अन स्पर्श भास अनामिक ।

झणी, अवचित भावली, तव गालीची खळी ।

साक्षी लोचनी दीपमाळ राऊळीची होती ।।४।।

…….भेटलीस गं तू मज …..

*रचना :- भावकवी वि.ग. सातपुते .*

 

 

*रसग्रहण*

*श्रीकांत. दिवशीकर* ( सातारा )

————————–

खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावे, असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमी येतात. कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते.

पण स्वप्नात सुध्दा न पाहिलेले सत्य समोर उभे ठाकते तेव्हा त्याचा स्वीकार करताना मनाची घालमेल होते. आणि हेच ह्या कवितेचे सौंदर्य आहे. असे मला वाटते.

मुग्ध प्रीतीची एक अबोल भावना , अनपेक्षित भेटीत उमटलेल्या साऱ्या हळुवार भावनांचे अचूक शब्दात व्यक्त होणे ही *विगसा,* यांची खासियत . नदी काठावरील विस्तीर्ण घाटावरील राऊळ , पारावरचा पिंपळ ती नयनरम्य सांज सगळे वातावरण प्रेममय भक्ती रसाचेअन अशावेळी तिचे दिसणे आणि मनाची झालेली भावुकता , अगदी अचूकपणे व्यक्त झाली आहे .

 

प्रेमाला भाषा नसते , असतो फक्त अबोल मौनीहोकार , मनाच्या गाभाऱ्यातील राऊळात हळुवार निनादणारे मंद आणि मंजुळ स्वर, आणि आसमंतात होणारा अनाहूत कल्लोळ , मनाची द्विधा अवस्था पण भेटीचा सुखद क्षण आणि आनंद साऱ्या मनोभावना अलगदपणे उतरलेल्या आहेत .

 

नकळत वळूनपाहून प्रेमाचा मिळालेला अनाहूत होकार ,अन त्यानंतर मनाची अतृप्तता असून देखील तृप्त प्रसन्नतेचा झालेला साक्षात्कार , श्वास स्पर्श आणि भास याची जाणीव साऱ्या निरागस प्रेमाचे हळुवार पदर अचानक समोर उभे ठाकावेत आणि त्याची अनुभूती यावी सारे अचूक मोत्याच्या माळेत गुंफल्या सारखे .

एक सुंदर , सुमधुर काव्य रचना . प्रेम काव्य रचनेत कवीचा हातखंडा आहेच यातही ते कुठे कमी जाणवत नाहीत . खरे तर ही कविता माझ्या चोपडीत मला कधीच सापडली होती बहुधा ती २००० पुर्वीचीच असावी पण व्हॉटअप्सवर मात्र आली २०१६ साली .आली.

अश्या रम्य संध्याकाळी पण इतिहास जमा झालेल्या , त्यावेळची प्रत्यक्ष स्थळावरील दर्शना नंतर सुचणाऱ्या कवितांचे ते दिवस गेले खरे हे आठवते. या आठवणी आता फक्त गतस्मृतीतून पुन्हा पुन्हा आठवत जायच्या . अतृप्तता तर मनाचा स्थाहीभाव , तो तर कवीच्या मनाला विवश करत राहतो .कधीही न घडणारे पण एकदा तरी घडावे अशी मनाची लालसा काव्यातून किती समर्पक मांडली आहे . हीच लालसा आणि हीच अश्यक्तेची जाणीव असून सुधा तिच्या तृप्तीची मनीषा बाळगणे हीच मनाची हुरहूरआणि अधीरता सुंदर शब्दात मांडणे ही कवीची खरी खासाईत अश्या काव्यातून सुरेखपणे अवतरली आहे .

*जगणे मरणे काय बरे..! सुख खरे की दुःख खरे !!! असे प्रश्न स्वहस्ते भाळी कोरून घेतलेला अश्वथामा !! त्याला वरवरचे जगता .येत नाही*

तसे भावकवी आपले जगणेच लिहीत असेलमुळे ” *जे येते ते खोल अंतरातून येते*” असा कवी जेव्हा आपल्याला भेटतो तेव्हा तो आपले जगणे टीप कागदा सारखे शोषून घेत असतो असे वाटते.

*मित्रवर्य विगसा प्रतिभेच्या सौन्दर्या बद्दल काय लिहावे , सरस्वतीचा हात आपल्या पाठीवर पडलाय* , *तिचे कृपावंती शब्ददातृत्व आपण विनम्रपणे जपून काव्याशी प्रामाणिक राहता आणि ती सारस्वती बांधिलकी आपण आजवर जपत आलात , शब्द, सौदर्य, निसर्ग, प्रेम आणि विरह वेदना यांच्याशी आपले जडलेले नाते आपण आजवर जीवापाड सांभाळले ही कृतज्ञता जपणे हेच आपल्या काव्याशी आपले इमान आहे असे मला वाटते.*

 

एक संस्कृत श्लोक आठवला मुद्दाम अर्थासहित सांगतो

 

*सुशिलो मातृपुण्येंन*

*पितृपुण्येंन चतुर: ।*

*औदार्य वंशपुण्येंन*

*आत्मपुण्येंन भाग्यवान ।।*

 

मातेच्या पुण्याईने व्यक्ती चारित्रवान बनते

वडिलांच्या पुण्याईने चातुर्य मिळते

वंशपरंपरेने ( पुण्याईने ) औदार्य प्राप्त होते

तर स्वतःच्या पुण्याईने ( कर्तवूत्वाने ) यश ( भाग्य ) प्राप्त होते

 

मला वाटते हि सारी पूर्वसुकृतची पुण्याईच असावी , सर्व सामान्य यशस्वी होतातच.

*परंतु यश कीर्ती आणि प्रतिभा सन्मान हि काहीशी अलौकिक देणगी प्रसाद रुपाने फार थोड्या जणांच्या नशिबी असते .*

असो काव्याबद्दल लिहिताना थोडे बाजूला झालो पण व्यक्त झाल्यावीण चैन पडत नाही म्हणून हा प्रपंच .

ही कविता.नव्याने आज पुन्हा पुन्हा वाचली आणि त्यानंतर आत्ता या क्षणापर्यंत कवीची अस्वस्थता , अधीरता ,त्याची हुरहूर ,शब्दातून दाटून येणे, बरसणे सगळ सगळ मला आज पुन्हा नव्याने भासते आहे .

कधी कधी निवांतपणे आपल्या या गावातून फिरत असताना पूर्वीची संकेतस्थळे नव्याने भेटतात , तसेच काही काही जुन्या कवितेच्या ओळीतून सावकाश फेरफटका मारताना तोच अनुभव येतो. अश्या रचना आपल्याच जुन्या कवितांचे नवे रूप तात्पर्य सांगत असतात.

*काळाच्या वेगात हात सुटलेल्या जगण्याला पुन्हा भेटायचे असेल तर अश्या दर्जेदार कलाकृती सारखे दुसरे वळण नाही..!!*

 

 

*श्रीकांत. दिवशीकर*

*सातारा*

प्रतिक्रिया व्यक्त करा