(एक ऑगस्ट ते 15 ऑगस्ट संपूर्ण महाराष्ट्रात महसूल पंधरवडा म्हणून संपन्न केला जात आहे .यानिमित्त काही सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांचा परिचय करून देण्याचा हा अल्पसा प्रयत्न)
बुलढाणा जिल्ह्यातील धाड तालुक्यातील सावळी या लहानशा गावातून विशाल नरवाडे हे आयएएसची परीक्षा पास झालेले आहेत. सध्या ते धुळे येथे जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. भाड्याच्या घरात राहणारे सार्वजनिक नळावरून पाणी भरणारे आणि खेडेगावात राहून अभ्यास करणारे विशाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत केवळ आयएएस होत नाही तर आयएएस च्या परीक्षेमध्ये संपूर्ण भारतातून 81 बी रँक मिळवितात ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आय ए एस होणे हे कठीणच गोष्ट आहे. पण त्याही परीक्षेमध्ये पहिल्या शंभरामध्ये येऊन विशालने बुलढाण्याचा नव्हे तर विदर्भाचा पर्यायी महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला तर मुले कुठल्याही क्षेत्रात गेली तर यशस्वी होऊ शकतात हे सिद्ध करून दाखविले आहे. विशालचे शिक्षण धाड आणि बुलढाणा येथे झाले. एक वर्षासाठी ते शेगावच्या जवाहर नवोदय विद्यालय मध्ये होते. पदवी परीक्षा संपल्यानंतर विशाल खाजगी कंपनीमध्ये मुलाखत देण्यास गेले. मुलगा चपळ चंचल तत्पर तेजस्वी तपस्वी असल्यामुळे त्यांचे सिलेक्शन होणे साहजिकच होते. कंपनीने त्यांना ऑर्डर दिली. ती ऑर्डर घेऊन ते घरी आले. विशाल आनंदात होते. नोकरी मिळाली होती. पुढची आठवड्यात नोकरीवर रुजू व्हायचे होते. ती ऑर्डर त्यांनी बाबांना दाखविली. त्याचे बाबा बुलढाणा जिल्हा परिषद मध्ये पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत तेव्हा होते. घरची परिस्थिती जेम तेम. भाड्याच्या घरात राहणे. सार्वजनिक नळातून पाणी भरणे. घर कौलारू. घरात वाकून जावे लागते. अशी परिस्थिती. या परिस्थितीत संघर्ष करून विशालने पदवी परीक्षा पास केली होती. आणि आता तर त्यांच्या हातात नोकरीचे पत्र होते. त्यांना अपेक्षा होती की बाबा आनंदित होतील. शाबासकी देतील. पण त्यांचे बाबा दूरदृष्टीचा विचार करणारे होते. त्यांनी ती ऑर्डर पाहिली आणि बाजूला ठेवली आणि माझे मी आय ए एस अधिकारी होणारच हे पुस्तक विशालच्या हाती दिले आणि सांगितले विशाल इतक्या लवकर नोकरी करण्याची काही गरज नाही. आणि म्हणाले प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे सरांचे मी आय ए एस अधिकारी होणारच हे पुस्तक वाच आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात कर. तुझं वय कमी आहे. इतक्या कोवळ्या वयात तू नोकरी करावीस आणि तीही खाजगी कंपनीमध्ये हे मला मान्य नाही. तू आयएएससाठी प्रयत्न कर. आणि यश आलं तर ठीक नाही आलं तर अपयशाला दोनच माणसे जबाबदार असतील. एक तू आणि दुसरा मी. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. खाजगी क्षेत्रातील नोकरी जर या कंपनीने तुला स्वीकारले आहे. तर तू आय ए एस ची तयारी करीत असताना तुझ्या ठिकाणी जे ज्ञान येईल जी परिपक्वता येईल त्यामुळे तू कुठल्याही क्षेत्रात गेलास तरी यशस्वी होऊ शकतो. असे म्हणून त्यांनी विशाल सरांच्या हातात मी आयएएस अधिकारी होणारच हे पुस्तक थोपविले. बाबांनी दिलेला हा कानमंत्र विशाल यांना पटला. आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही. हे त्यांना बरोबर पटले. त्यांनी त्या आलेल्या नोकरीला बाजूला ठेवले आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला प्रारंभ केला. तोपर्यंत विशालला आय ए एस या परीक्षेला किती पेपर्स असतात. परीक्षा कशी असते. याबद्दल काहीही माहिती नव्हती. पण ती माहिती त्यांनी मिळवली. नियोजन तयार केले. यापूर्वी आयएएस झालेल्या लोकांना भेटले आणि तयारीनिशी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयएएस या परीक्षेच्या तयारीला लागले. सातत्य कष्ट करण्याची जिद्द प्रामाणिकपणा यामुळे विशाल यशाच्या पायरीवर चढले. केंद्रीय लोकसेवा आयोगाची पहिली परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही मुळे ते आयपीएस झाले. त्या नंतर ते पश्चिम बंगालला रुजू झाले. अंगावर आय पी एस ची खाकी वर्दी चढली. पण आयएएस हा शब्द त्यांना काही स्वस्थ बसू देत नव्हता. पश्चिम बंगालच्या निवडणुका आल्या. पोलीस अधिकारी आणि निवडणुका म्हणजे 24 तास तारेवरची कसरत. पण आपली पोलीस खात्यातली आयपीएस पोस्ट सांभाळून त्यांनी परत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयएएस परीक्षेची तयारी सुरू केली. आपल्या हातून काय चुका झाल्या. त्या शोधून काढल्या. त्या परत होणार नाहीत याची काळजी घेतली आणि विशाल परत परीक्षेला बसले. अतिशय काळजीपूर्वक जाणीवपूर्वक सातत्याने नियोजनबद्ध अभ्यास केल्यामुळे विशाल यशस्वी झाले आणि पहिल्या शंभरमध्ये ते समजा मेरिटमध्येच आले. पहिल्या शंभरामध्ये येणे म्हणजे आयएएस मिळणे हे समीकरण आहे आणि त्यांना आयएएस कॅडर मिळाले. योगायोगाने पोस्टिंग देखील महाराष्ट्रात मिळाले. मसुरीचे ट्रेनिंग संपल्याबरोबर भारत भ्रमण झाल्यानंतर पहिले पोस्टिंग मिळाले ते सांगली जिल्ह्यात. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणून आणि कळवण चा उपविभागीय अधिकारी म्हणून. आदिवासी मुलांच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी विशाल सरांनी सातत्याने धडपड सुरू ठेवली. एक दिवस त्यांनी मला कळवणला बोलावले. आदिवासींच्या आणि त्यांच्या मुलांच्या विकासासाठी काय करता येईल यावर आम्ही चर्चा केली. त्याचे नियोजन केले आणि अंमलबजावणीला सुरुवात केली. आज विशाल नरवाडे धुळे येथे कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी पद म्हणजे मोठा व्याप. पण दूरदृष्टी असल्यामुळे विशाल धुळ्यासारख्या मागासवर्गीय आदिवासी बहुल जिल्ह्याला विकासाकडे नेण्यासाठी प्रामाणिकपणे धडपडत आहे मी आहे चालू एवढ्यावरच विशाल नरवाडे थांबले नाहीत तर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत जागे करण्यासाठी ते सतत धडपडत असतात. कुठल्याही गावाला काही कामानिमित्त लग्नानिमित्त जायचे असेल ते मला फोन करतात त्या गावात एखादी संस्था एखादे महाविद्यालय परिचयाचे आहेत काय ते विचारतात. आणि तिथे मला त्यांचा कार्यक्रम ठेवायला सांगतात. त्यांची स्पर्धा परीक्षेची माहिती सांगण्याची पद्धत अतिशय चांगली आहे..आवाज ठणठणीत आहे आणि व्यक्तिमत्व तर एकदम आकर्षक आणि प्रभावी आहे. त्यामुळे त्यांचे भाषण सुरू झाले की विद्यार्थी मंत्रमुग्ध व्हायला वेळ लागत नाही. परवा ते नांदेडला एका आयएएस मित्राच्या लग्नाला जाणार होते. मला त्यांचा फोन आला. त्यांनी मला ओळखीचे कॉलेज आहे काय म्हणून विचारले. योगायोगाने माझे मित्र श्री कामाजी पवार यांचे तेथे मातोश्री प्रतिष्ठानतर्फे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. मी कामाजी पवार यांना विशाल नरवाडे सरांबद्दल सांगितले. त्यांनी ताबडतोब कार्यक्रम ठेवला. लग्नाचा कार्यक्रम आटोपला विशाल सर मातोश्री महाविद्यालयकडे निघाले. रस्त्याचे काम सुरू होते. चार चाकी गाडी नेण अवघड वाटत होते. त्यांनी चार चाकी गाडी सोडली आणि चक्क दुचाकीवर बसून महाविद्यालयामध्ये दाखल झाले. प्राचार्य आणि संचालक मंडळ पाहतच राहिले. एक आयएएस अधिकारी चार चाकी गाडी सोडून मोटरसायकलवर येतो ही त्यांच्यासाठी आश्चयर्जनक बाब होती. भाषण झाले आणि कामाजी पवारांचा मला फोन आला. म्हणाले सर आमच्याकडे खूप कार्यक्रम झाले.. पण विशाल सरांनी आमच्या मुलांना जे प्रबोधन केले असा कार्यक्रम आमच्या कॉलेजच्या इतिहासात पहिला झाला. मानधन नाही. प्रवास खर्च नाही. जेवण नाही. असा विशाल सरांचा हा प्रबोधनाचा सामाजिक बांधिलकीचा कार्यक्रम सुरू होता आहे आणि राहणारही आहे. कोरोनाच्या काळात आम्ही श्री विशाल नरवाडे यांचे भरपूर कार्यक्रम आयोजित केले. त्यांनी आनंदाने ऑनलाइन असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले. त्यांना प्रोत्साहन दिले. आजही धुळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना ते आपल्या शासकीय कामाबरोबरच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत जागृती करण्यासाठी सातत्याने उपक्रम राबवीत आहेत..अशा या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अधिकारी मित्राला महसूल पंधरवाडा निमित्त हार्दिक शुभेच्छा…
प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आयएएस
अमरावती
9890967003