You are currently viewing “नारळ लढवण्याची स्पर्धा” हे कोकणच्या सागरकिनारी पट्टीमधील मुख्य आकर्षण – विशाल परब

“नारळ लढवण्याची स्पर्धा” हे कोकणच्या सागरकिनारी पट्टीमधील मुख्य आकर्षण – विशाल परब

“नारळ लढवण्याची स्पर्धा” हे कोकणच्या सागरकिनारी पट्टीमधील मुख्य आकर्षण – विशाल परब

परूळेबाजार येथील नारळ लढवणे स्पर्धेचं जल्लोषात शुभारंभ…

वेंगुर्ला

श्रावणामध्ये सुरू होणारी “नारळ लढवण्याची स्पर्धा” हे कोकणच्या सागरकिनारी पट्टीमधील मुख्य आकर्षण असते. ठिकठिकाणी होणाऱ्या या नारळ लढवण्याच्या स्पर्धेत अक्षरशः सर्वच आबालवृद्ध, महिला सहभागी होत या स्पर्धेचा आनंद लुटतात. किनारपट्टीवर वेगळाच उत्साही माहोल तयार करणाऱ्या या स्पर्धांचा नारळी पौर्णिमेला समुद्रात नारळ अर्पण करत सांगता समारंभ होतो.

या सर्व स्पर्धांचा शुभारंभ करण्याचा मान परुळे गावाने पटकावत भारतीय जनता पार्टी, भाजयुमो वेंगुर्ले आणि शिवशाही ग्रुप यांच्या आयोजनातून ग्रामपंचायत इमारतीजवळ नारळ लढवण्याची भव्य स्पर्धा आयोजित केली. नारळ लढवण्यासाठी जिल्हाभरातून आलेले स्पर्धक आणि नागरिक यांच्या उत्साहाने या स्पर्धेला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झालेले दिसत होते. भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या शुभहस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.

यावेळी परुळे गावातील अनेक मान्यवरांचा त्यांच्या कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ग्रामसेवक श्री शिंदे, भजन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री संत बाळूमामा भजन मंडळ आदी अनेकांचा सत्कार यावेळी विशाल परब यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या समवेत ॲड.अनिल निरवडेकर, श्री वसंत तांडेल, संजू परब, भाजपाचे प्रसाद पाटकर, माजी सभापती वंदना किनळेकर, सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुधवडकर, निलेश सामंत, प्रदीप प्रभू, समीर कुडाळकर, पप्पू परब, प्रणव वायंगणकर, वसंत तांडेल आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची क्षणचित्रे

🔲 यावेळी उपस्थित असलेले सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री संजू परब आपल्या भाषणात म्हणाले की “आगामी निवडणुकीत भाजपातर्फे विशाल परब, स्वतः मी यासह अनेक उमेदवार आमदारकीचे दावेदार मानले जात आहेत. मात्र निवडणुकीत ज्या उमेदवाराला तिकीट मिळेल त्याच्या पाठीशी इतर सर्व इच्छुक उमेदवार ठामपणे उभे राहतील असे चित्र दिसेल.

🔲 भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी आपल्या भाषणात आपण आजचे हे सांस्कृतिक व्यासपीठ असल्याचे मानतो त्यामुळे कोणतीही राजकीय प्रतिक्रिया देणार नाही असे सांगितले. तर त्याचवेळी परुळेवासीय जनतेला संबोधित करत असताना “येत्या दिवाळीत तुम्ही सर्वांनी या ठिकाणी भव्य असा महोत्सव आयोजित करा, त्याच्या आयोजनाची सर्व जबाबदारी मी आजच उचलतो” असे सांगत अप्रत्यक्ष राजकीय सिक्सर हाणला आणि या सूचक संदेशाचे लोकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागतही केले.

🔲 परुळे गावातील एक शालेय विद्यार्थिनी खेळाच्या दरम्यान पडल्यामुळे तिच्या कानाच्या पडद्याला गंभीरपणे इजा झाली होती. तिच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीची व्यवस्था यापूर्वी विशाल परब यांनी केली होती. आज या कार्यक्रमात त्या विद्यार्थिनीचा सत्कार विशाल परब यांच्या हस्ते करण्यात येऊन ग्रामस्थांतर्फे तिला पुढील नव्या कारकीर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या, त्यावेळी पूर्ण व्यासपीठ काही क्षण भारावून गेले होते.

🔲 क्रिकेट मालवणी समालोचन फेम व्यक्तिमत्व श्री बादल चौधरी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत या कार्यक्रमाला चांगलीच रंगत आणली. पूर्ण परुळेवासीयांनी हा कार्यक्रम घरचा उत्सव असल्यासारखा साजरा केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा