बांदा शहरात डेंग्यूचे दोन रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क…
आरोग्य विभागाने शहरात सुरू केले सर्वेक्षण:डास प्रतिबंधक फवारणी देखील सुरु..
बांदा
बांदा शहरात डेंग्यूचे दोन रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. एका रुग्णाच्या रक्तातील पेशी कमी झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर दुसऱ्या रुग्णावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोग्य विभागाने शहरात सर्वेक्षण सुरु केले असून ताप, सर्दी आदी लक्षणे आढळल्यास तात्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात डास प्रतिबंधक फवारणी देखील सुरु करण्यात आली आहे.
शहरात दोन डेंग्यूचे रुग्ण मिळाले आहेत. त्याच्या रक्ताची तपासणी केली असता ते डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले. त्यांनी सुरुवातीला खासगी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले. त्यानंतर एका रुग्णाला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर एका रुग्णाच्या रक्तातील पेशी (प्लेटलेट) कमी झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. शहरात डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
चौकट
आरोग्य यंत्रणा सतर्क
बांदा शहरात डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. शहरात ज्याठिकाणी हे रुग्ण सापडले त्याठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन याबाबत जागृती करत आहेत. आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण करुन शहरात डासांची उप्तत्ती व वाढ रोखण्याकरीता मार्गदर्शन करण्यात येत आहे. घराशेजारी पाणीसाठे, हौद, डबकी, टायर यामध्ये पावसाळयात पाणी साचून डासांची वाढ होते, यामुळे या पाणी साठयांची योग्य विल्हेवाट लावून परीसर स्वच्छता राखून डासांची उत्पत्ती थांबविता येणे शक्य आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ. पटवर्धन यांनी सांगितले कि, शहरात सापडलेले डेंग्यूच्या रुग्णांची तब्बेत ही स्थिर असून उपचार सुरु आहेत. आरोग्य कर्मचारी शहरात सर्वेक्षणचे काम करत आहेत. पाण्याची डबकी, किंवा पाणी साठवण टाकीमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. डासांची उत्पत्ती व वाढ रोखण्यासाठी नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करून नागरिकांनी परिसराची स्वच्छता राखावी तसेच ताप, सर्दी असल्यास तात्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधून उपचार करून घ्यावेत.
बांदा शहरात डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने शहरात ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून डास प्रतिबंधक फवारणी सुरु करण्यात आली आहे. सुरुवातीला देऊळवाडी, मुस्लिमवाडी, आळवाडी परिसरात फवारणी करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राने फवारणी करण्यासाठी लिक्विड उपलब्ध करून दिले आहे. शहराचा विस्तार हा मोठा असल्याने भाडेतत्वावर अतिरिक्त फवारणी मशीन मागविण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेसोबत बोलणे झाले असून ही मशीन मिळाल्यास फवारणीचे काम हे वेगवान व गतिशील होणार असल्याचे सरपंच प्रियांका नाईक यांनी सांगितले.