You are currently viewing “पाऊस मनामनातला”

“पाऊस मनामनातला”

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*“पाऊस मनामनातला “*

 

वैशाख वणव्याची झळ टिपेला पोचलेली असते.

आंब्याचा शेवटचा ‘तोड ‘ पेट्यांतून बाजारात पसार झालेला असतो.काल परवापर्यंत लेकूरवाळी असलेली आंबा, जांब, जांभुळ चिंच अशी झाडे ओकीबोकी केविलवाणी दिसू लागतात.

फूलांची बहर आटोपत येतात एकूणच वसुंधरा शूष्क, ओसाड,भकास दिसू लागते.

मृगनक्षत्र लागतं आणि डोळे आभाळाकडे बघू लागतात.

आकाशात निरनिराळ्या चकचकीत, शुभ्र निरभ्र,काळसर मळभ, संध्याकाळी अधिकच गुलाबी, अबोली,पिवळसर गडद होऊ लागते.

खिडकीतून दिसणाऱ्या आभाळाच्या तुकड्याकडे बघितलं तर वाफेचे धवल कापूस मेघ पूढे पुढे सरकायला लागले.

आज अचानक एक क्रिष्ण मेघ क्षितीजावर ओथंबलेल्या दिसला.मनातल्या मोलाने पिसारा फुलवलाच.

थोड्याच वेळात नभांगणात अनेक जलौघ …कूणी कृष्णमेघ..कूणी घननीळ .. कोणी चंदेरी कूणी सोनेरी धवल कूणी लाजरे जांभळे कूणी ….असे उन्मत्त हत्ती सारखे एकेक मस्ती करत धुसमुसळत गोळा होऊन मेघडंबरी सजलेली दिसली.

मेघांची मस्ती पाहून द्वाड वारा चेकाळलो व बेभान वाहू लागला.

सौदामिनी चकाकत नाचत हजर झाली.

गडगडाट, कडकडाट वादळ वारा ,झाडांची झोंबी सगळ्यांनीच आसमंत दणाणून सोडले.

इतक्यात प्रचंड कडकडाट झाला आणि घाबरलेले कृष्णमेघ ओथंबून खाली येऊन जलकुंभ सहस्त्र जलधारांनी धर्तीवर मृगनक्षत्र जोरदार बरसले.हवाहवासा वेडावणारा मृदगंध सगळीकडे पसरत नाकापर्यंत पोचला आणि मन आनंद विभोर झाले.

जंगलात मोर आनंदाचा केकारव करत जुई जुई नाचू लागले.

पावसाबरोबर मनमोरही नाचू लागले.

का कोणास ठाऊक पण बाहेर पाउस कोसळू लागला की, ‘मनातला आठवांचा ‘,पाऊसही बरसून लागतो.

पाऊस आणि मन यांचे आठवणींशी चिरंतन नाते आहे.मुद्दाम आठवायला. सांगायला लागतो नाही. जसा जसा पाऊस पूढे सरकतो तशा आठवणी सुद्धा फेर धरून आवेशात पिंगा घालू लागतात.

मनात पहिल्या पावसात भिजणारी, घाबरू नकोस सांगणारी आजी पहिल्यांदा मनात भिजत ऊभी राहाते…..पावसाची तिने गायलेली गाणी पावसाच्या तालावर ताल धरतात.

पावसात भिजत… एका छत्रीतुन जाणार्या आमचा मैत्रिणींचा व्रात्य घोळका पावसात हंसू खेळू लागतो.मनातला पाऊस त्यांना शोधतो.. कूठे गेल्या मैत्रिणी,?

आज परत मनातला पाऊस धावणार्या छोट्या पाण्याच्या ओहोळात दादाने हाताने केलेल्या रंगीत होड्यांचा गोंगाटात केलेला जल्लोष पावसात चिंब भिजून जातो.

मन मला त्या जल्लोषात पुन्हा खेळवून आणते.

जेष्ठ आषाढ असे पावसाच्या घिंगाण्यात पूरे न्हाऊन निघतात

कधी संध्याकाळी पावसाची जड लागून रहाते आणि मन कातर ,उदास, रडवेले होते.का कूणआस ठाउक कूठे कूठे मनातला पाऊस हमसुन हमसुन कोसळत राहातो कुठल्या गल्लीत..बोळात … इमारतीत .मन व मनातला पाऊस सचऐल भिजवून आणतात.सगळ्या आठवणी पुन्हा ऊसवतआत व मनातला पाऊस थांबल्यावर वरच मन शांत होते.

बळीराजा च्या मनातला पाऊस किती उमेद.. नव्या आशा… किती स्वप्ने .मुलांची शिक्षणे.मुलींची लग्ने या सगळ्या आशा अपेक्षांचा मनोरथ उभा रहात असेल नाही का. ?

आषाढात मनातल्या पावसात कविमन धुमशान घालत असतं पावसाचा जोर आणि कवी मनाचा कल्पना रंग यांचा मेळ खात मांडून बसतो.

आषाढ महिन्यात महाकवी कालिदासाने सृष्टीचे .. रामगिरी पर्वत सहज विहरणारे कृष्णमेघ.. प्रियेच्या विरहवेदनांनी व्याकूळ झालेला शापित यक्ष…विरहात होरपळून कृश झालेला तो यक्ष, गळून पडलेले सुवर्ण कडे.

रम्य अलकानगरी… तिथपर्यंत पोचणारा कैलास पर्वतावरचा रस्ता.. त्यांची त्याच्या सारखीच अवस्था , दशा झालेली प्रिया .. ह्या सगळ्या चे अप्रतिम वर्णन, मेघाबरोबर प्रेमसंदेश पाठवण्याची कल्पना सगळं च मनाला भूरळ पाडणारे..आषाढात मनातल्या पावसात हळूवार मन यक्षाच्या विरहात कासावीस नाही झाले तरच नवल.

पुढे शेतीची कामे, पहिली धांदल संपते व वआरकर्यआंबरओबरच मनातल्या पावसात मानाच्या पालख्यांबरोबर मन पंढरपूर घ्या वाटेवरून चंद्रभागेतिरी मायमाऊलीसाठी धावत सुटते.

आता श्रावणझड सुरू होते. श्रावण म्हणजे फक्त ती आणि तिच आठवांच्या पावसात डोळ्यातून घळघळा कोसळू लागते.ती घर देवघर चकचकीत स्वच्छ करणारी… पावसात फूलं तुळस आघाडा दुर्वा पाने गोळा करणारी..देऊळ, पूजा, शुक्रवार जिवती औक्षण सवाष्ण यात बुडालेली तरीही.. नटून सजून मंगळागौर मुक्तपणे खेळणारी ती मायमाऊली मनाच्या पावसात छातीशी घट्ट घरुन स्वतः भिजत असलेली दिसते.

तिच्या बरोबर तिनेच लावलेला बहरलेला प्राजक्त पांढरी धवल पुष्पांच्या पायघड्या घालून झाडाखाली बसवूनच ठेवतो.पूरा भिजवतो रडवतो.

सख्या माहेर भावंडे नागपंचमी झोपाळे आठवांच्या पावसात हुंदडून आणतात.

आता ऊन पाऊस गुंज व्हायला लागतो.मनात म्हातारीची मुंज ऊरकतो.

गौराई, गणपती यांच्या गडबडीत मनातला पाऊस व भिजणार्या आठवणी दूर पळतात. पाठोपाठ घट बसतात.

दसरा दिवाळी ची धामधूम तयारी खरेदी चालू होते.पाऊस पण परतीच्या वाटेला लागतो.

अवखळच तो परत मनात खेळायची लहर येते पुन्हा … ‘ऐलमा पैलमा म्हणत हस्त नक्षत्रातल्या हत्ती ला भिजवतो. मनाला गोंजारत खिरापत खाऊनच माघारी फिरतो.

पावसाच्या प्रत्येक लहरी बरोबर मनातला पाऊसही कमी जास्त . कधी घनघोर पण कोसळत असतो.आठवणींबरोबर झिम्माड झिम्मा खेळत आपल्याला सूद्धआ भिजवत रहातो.

परत परत दरवर्षी पाऊस तितक्याच नव्याने येतो धुमदार बरसतो आणि मनातला पाऊस पण कितीदा नव्याने आठवणींनू कधी हंसत कधी रडत कधी कातरवेळी कधी व्याकूळ होऊन पण मनात कोसळत असतोच.

 

अनुराधा जोशी

अंधेरी, मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा