*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*
*माझ्या आठवणीतील श्रावण*
आषाढाचा दिमाखदार पाऊस जसा हळूहळू स्थरावतो,आणि जराशी विश्रांती घेत घेत डोकावतो,त्याच वेळी श्रावणाची चाहूल लागते..
मन मंदिरात सुरेल घंटानाद घुमू लागतो…
बालकवींच्या ओळी मनामनावर उमटू लागतात….
“श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षणात येते सर सर शिरवे,
क्षणात फिरुनि ऊन पडे……”
या निमित्ताने श्रावणाची लगबग चालू होते घराघरात….तशी आमच्याकडे ही होत असे…. ‘असे’ एवढ्यासाठीच म्हणले, की आता ते पूर्वीचे दिवस, सणावारांचा साज शृंगार मागे पडला,आता राहिले ते फक्त कर्मकांड….
मला माझ्या लहानपणीचा श्रावण फार आवडत होता…
पहिला सोमवार, पहिला शुक्रवार, पहिली मंगळागौर, पहिला शनिवार …..हा ‘पहिला’ शब्द बहुदा बर्याच बायकांच्या तोंडून ऐकायला मिळे…
आमची शाळकरी मुलांची मात्र फुल चंगळ असायची..कारण या महिन्यात सणांची नुसती रेलचेल असते…
श्रावणी सोमवार आला, की त्या दिवशी मधल्यासुट्टीत शाळा सुटायची…कारण उपवास असायचा,आणि तो दुपारी 4/5 पर्यंत म्हणजे सूर्यास्ताच्या आधी सोडायचा असतो…मग घरी यायचे, तो पर्यंत घरी स्वयंपाकाची रेलचेल चालू झालेली असल्याने, विविध सुवासाने पोटातील भूक खवळायची….आता कळते,आयते खात असतो,ती मजा काहीऔरच होती….आता स्वतः राबावे लागते न!…..मग संध्याकाळी आई बरोबर किंवा मैत्रिणींबरोबर सिद्धेश्वरला जायचे…देवदर्शन झाले की,तिथल्या विविध स्टॉलवर विंडो शॉपिंग करत काहीतरी घ्यायचेच…मजा यायची छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा…एकदा आमच्या शेजारच्या एकाच घरातील पाच जणी आणि मी असे गेलो होतो…एकाच घरातील त्या बहिणींनी एकसारख्या रंगाचे कपडे घातले होते,आणि मी एकटी वेगळी..मग काय बँड पथक म्हणून आमच्यावर भरपूर कमेंट येत होत्या..आता आठवले की हसू येतंय…असो।
दर शुक्रवारी जिवती आई ची पूजा करून आई आम्हांला औक्षण करायची, ती प्रथा माझी आज ही चालू आहे..
दर शुक्रवारी तर धमाल असायची..शाळेत नवीन कपडे, आणि नटून थटून यायला मुभा असायची,शिवाय शाळा 11 ऐवजी 12.30ला भरायची….कारण घरोघरी जिवती आईची पूजा अर्चा, नैवेद्य,तो ही पुरणा वरणाचा….मग काय भरपेट जेवण झाल्याने आणि रंगबिरंगी फुलपाखरे नुसती इकडून तिकडे बागडत असत…त्यात आमची मुलींचीच शाळा..मग मजाच..
आमच्या शाळेत श्रावणाची सुरुवात होण्या आधी सहा ग्रुप केले जायचे अख्या शाळेचे हं! म्हणजे आता नाव आठवेल तशी सांगते…वरदा,शारदा,सुखदा….असे काही….त्यात विद्यार्थींनीची विभागणी होत असे..म्हणजे त्या प्रत्येक ग्रुपमध्ये पाचवी ते नववी पर्यंतच्या मुली विभागलेल्या असायच्या.आणि या प्रत्येक ग्रुपच्या मध्ये स्पर्धा असत…शाळा सजावट,स्वच्छता,बोर्डवरचे लिखाण सांस्कृतिक कार्यक्रम इ..विविध कलागुणांना वाव असे…आणि हे शुक्रवारी सहसा असे.महिनाभर ग्रुपचा सहभाग बघून विशेष बक्षिसे असत…मजा असायची राव! परत संध्याकाळी घरोघरी हळदीकुंकू म्हणून आई बरोबर जायचे, वाटीभर मस्त दूध आणि फुटाणे खायला…धमाल नुसती…..
नागपंचमीच्या आदल्या दिवशी दारावर मातीचे 2 नागोबा घेऊन त्यांची पूजा केली जाते…लांडया..पुंडया म्हणून त्यांची पूजा करून भावाच्या बहिणीचा उपवास असतो..
नागपंचमी आली की, आदल्या दिवशी घरी वाटलेली मेंदी असायची, ती रात्री काडेपेटीच्या किंवा उदबत्ती च्या काडीने हातावर काढणे हा खूप मोठा कार्यक्रम असे मुलींचा…मग बाबा,भाऊ किंवा रिकामा बसलेले कुणी ही मेंदी काढत आम्हांला..त्याकाळी कोन प्रकार नव्हते त्यामुळे किती ही जाड डिजाईन असली तरी हात रंगणे महत्वाचे असे…रात्री झोपताना कापड बांधायची आई…आणखी एक गंमत असे आमची…ती म्हणजे आम्ही मुली गुपचूप एक टिळा कपाळावर काढत.सकाळी जिच्या कपाळावरचा टिळा रंगे, ती आमच्या मते भाग्यवान असे….सकाळी तेल लावून मेंदी काढायची, एकमेकांना दाखवायची काय घाई आणि कौतुक असे, ते आजच्या पिढीला कळणारच नाही..आजच्या पिढीला कदाचित हा पोरकट पणा वाटेल…मग मस्त नवीन कपडे घालून परत बाहेर पळायला आम्ही मोकळे…
नागपंचमी जवळ आली की सगळी कडे मोठं मोठे झोके बांधलेले असत…कुठे ही कोणत्याही झोक्यावर जा, खेळायला हमखास मिळेच. तसेच नागपंचमीला आम्ही संध्याकाळी खूप सारे खेळ म्हणजे झिम्मा,फुगडी,गोफ विणणे,किस बाई किस,लवंग तोड,असे अनेक प्रकार खेळत असू.पाऊस असेल तर प्रत्येक देवळात खेळायला मुभा असायची त्यावेळी..जवळपास प्रत्येक देवळात गाणी,खेळ रंगत असे..त्याकाळी सणांना कुणी ही स्त्रिया घरात बसून रहात नसत..मंगळागौर म्हणजे तर आजूबाजूच्या आपलेच घरचे कार्य समजून जागवायला जात असू.आज आम्हांला निमंत्रण तेही रीतसर लागते,आणि तरी ही आम्हीं जातोच असे नाही.
श्रावणात घरी खाण्यापिण्याची चैन असे अगदी…. एकतर भरपूर उपवास म्हणून साबुदाणा खिचडी हमखास मिळेच.प्रत्येक सोमवार विविध गोडपदार्थांनी सजत असे. शुक्रवारी पुरणाच्यापोळ्या,कटाची आमटी,बटाटा भाजी,कुरडया पापड तळलेले असत.संध्याकाळी आजी स्वतःची नाहीतर, शेजारची कहाणी कुणी ही सांगत आणि खडीसाखर देत..पण त्या कहाणी सांगत असताना मध्ये आपण ‘हं’ ‘हं’ असे म्हणणे बंधनकारक असे….
श्रावणात प्रत्येक घरी एखादा दिवस सत्यनारायण पूजा असल्याने जवळ जवळ रोज मस्त प्रसादाचा लाभ बोकणा भरून खात असू..आणि खेळायला पळत असू…..
गोकुळाष्टमी हा एक मस्त दिवस असतो…प्राथमिक शाळेचे राधा-कृष्णांचा वेष करून असंख्य छोटे छोटे श्रीकृष्ण धोतर सावरत इकडून तिकडे करत असत……त्यात शेंबडे पोर तर या वेशात बघून,शेंबडा श्रीकृष्ण म्हणून आम्ही खूप हसायचो…
दुसऱ्या दिवशी दहीहंडी बघायला कोपर्यावर किंवा कुणाच्या तरी गच्चीवर जाऊन वरून पाणी मिश्रित रंग टाकायला मजा यायची…तसेच लाह्यांचा गोपाळकाला माझा खूप आवडता पदार्थ आई खूप छान करायची…
रक्षाबंधन हा एक मस्त सण या महिन्यातला…बहीण भावाचा पवित्र सण… मला दोन मोठे भाऊ त्यामुळे मस्त राखी खरेदी करणे आणि नटून औक्षण करणे खूप भारी वाटायचं…आमच्या लहानपणी रक्षाबंधन ला भावा कडून ओवाळणी मिळत नसे…ओवाळणी फक्त भाऊबीजेला मिळत असे…छोट्या छोट्या गोष्टी….पण खूप आनंद आणि समाधान मिळत असे…
श्रावण शनिवारी मुंज्या मुलांना मान असतो…श्रावणी केली जाते.गायत्री मंत्र म्हणले जातात…त्यांना जेवायला बोलावून दक्षिणा दिली जाते…एवढीशी मुले जेंव्हा धोतर नेसून येतात ,तेंव्हा फार गोड दिसतात….
या महिन्यात प्रत्येक घरातील आईने दुर्वा आणि आघाडा आणायची जबाबदारी आम्हा सर्व मुलांवर सोपवलेली असल्याने आमचा सर्व ग्रुपच सकाळी सकाळी शेजारच्या बागेत जाऊन खेळून घेऊन यायची..अगदी गौरी गणपतीत ही..
त्याकाळी आजच्या सारखे अभ्यासाचे टेन्शन नव्हते,क्लासेसचे फॅड नव्हते ,मार्कांची स्पर्धा नव्हती….आणि म्हणूनच असे श्रावणासारखे सुंदर सण साजरा करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले….आजची पिढी मात्र या सुंदर क्षणांना मुकत चाललीय, ही फॅक्ट आहे मात्र…..
आजकाल मुले लांब गेली, कुटुंब विभक्त झाली,आणि कुणासाठी गोड-धोड करा हा विचार होऊन घरात नैवेद्यासाठी म्हणून एवढंस काहीतरी केलं जातंय…कारण गोड दुखणी (डायबेटीस) घरोघरी विराजमान झाली आहे…
आता आमची पिढी असे सण आठवून जगत आहेत…मुलं घरी सुट्टीला आली, की तोच सणाचा दिवस म्हणून साजरा होतो आजकाल.
पण श्रावण मात्र सणांचा राजा आहे…
खूप आवडता महिना…
सगळी कडे उत्साहाचे वातावरण…
पावसाच्या हलक्या सरी….
हिरवळीचे गालिचे सभोवार…
नवीन रोपांची लागवण चालू…
विविध रंगांची,विविध सुवासाची फुले….
गोडाधोडाच्या पदार्थांची रेलचेल….
मस्त मौज मस्तीचा महिना..
माहेरवाशीणींचा आंनदाचा महिना…
सासुरवाशिणींचा कौतुकाचा महिना…
बालगोपाळांचा खेळण्याचा महिना….
असा हा सर्वोपरी ,सर्वव्याप्त प्रसन्न,
आनंद पसरविणारा महिना म्हणून मला अतिशय प्रिय आहे हा “श्रावण”.
–——————————————–
©पल्लवी उमेश
जयसिंगपूर