* जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्रावणमास (पादाकुलक)*
आला आला श्रावण महिना
सृष्टी सारी सजली धजली
लेवुनिया ती हिरवा शालू
सुंदर सुरेख प्रसन्न दिसली
भिजलेली ती राधा भोळी
कृष्णसखा तो मेघ सावळा
मीलन होता त्या दोघांचे
मयूर नाचे कसा जांभळा
गेंद फुलांचे पीत केशरी
पांघरलेले धरणीवरती
सुवर्णचंपक जुई सायली
गंध दरवळे अवनीवरती
तडाग सरिता तुडुंब भरले
शमली तृष्णा शिवार सजले
हासत नाचत डोलत कणसे
कृषीवलाचे जीवन फुलले
कडेकपारी अवखळ निर्झर
रांगत येई तो अंकावर
माय धरित्री कोड पुरविते
सृजनाला हो आला बहर
*अरूणा मुल्हेरकर*
*मिशिगन*