*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्रावण*
श्रावणाची सर मज भिजवी
रातराणी रात्र नयनी जागवी
गूज मनीचे मौनात ऐकवी
प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलवी ….
भुरुभुरु वारा लता डोलवी
कळ्या कुसुमांना गात जोजवी
दूऽरदूऽर सुगंधा पोहचवी
पाखरांसी खुणावून बोलवी ….
ऊन-पावसाचे चक्र फिरवी
वाळकी कुरणे झाली हिरवी
गवतांची पाती तुरे मिरवी
प्रत्येक पादपे कित्ता गिरवी ….
लक्ष त्रिदलेचि शिवा तोषवी
संधीप्रकाश सांजेस खुलवी
उधाणल्या सागरा शांतवी
किती वर्णू श्रावणाची थोरवी
विजया केळकर________
नागपूर ( हैद्राबाद )