You are currently viewing रोहित सेना सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सर्वबाद

रोहित सेना सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सर्वबाद

*श्रीलंकेचा ३२ धावांनी विजय*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी कोलंबोमध्ये खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ५० षटकात ९ गडी गमावून २४० धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ ४२.२ षटकांत केवळ २०८ धावा करू शकला आणि सर्वबाद झाला. श्रीलंकेने हा सामना ३२ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. यापूर्वी २ ऑगस्टला खेळवण्यात आलेला पहिला सामना बरोबरीत सुटला होता. आता भारताची नजर मालिका बरोबरीत सोडवण्याकडे असेल. तिसरा सामना ७ ऑगस्ट रोजी होणार आहे.

 

आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला काही विशेष दाखवता आले नाही. श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर भारताची फलंदाजी पत्त्याच्या घरासारखी कोसळली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची मोठी भागीदारी झाली. ४४ चेंडूत ६४ धावा करून कर्णधार बाद झाला. त्याने २९ चेंडूत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ५७ वे अर्धशतक झळकावले. तर गिल ३५ धावा करून तंबूमध्ये परतला. या सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा निराशा केली. केवळ १४ धावा काढून तो बाद झाला. त्यानंतर अक्षर पटेलने ४४ धावांची खेळी खेळली. मात्र, असलंकाने त्याला ३४व्या षटकात बाद केले. या सामन्यात शिवम दुबेने शून्य, श्रेयस अय्यरने ७, केएल राहुलने शून्य, वॉशिंग्टन सुंदरने १५, सिराजने ४, अर्शदीप सिंगने ३ आणि कुलदीप यादवने नाबाद ७ धावा केल्या. त्याचवेळी, श्रीलंकेसाठी जेफ्री वँडरसेने ६ आणि चरिथ असलंकाने ३ बळी घेतले.

 

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने भारताला २४१ धावांचे लक्ष्य दिले आहे. अविष्का फर्नांडो आणि कामिंदू मेंडिस यांच्या शानदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेने ५० षटकांत ९ गडी गमावून २४० धावा केल्या. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरने १० षटकांत ३० धावांत सर्वाधिक ३ बळी घेतले, तर मनगटाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने २ बळी घेतले. तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र मोहम्मद सिराजने पहिल्याच चेंडूवर पथुम निसांकाला बाद करून भारताला सुरुवातीचे यश मिळवून दिले. मात्र, श्रीलंकेची काळजी अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिस यांनी घेतली आणि दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. मात्र, मधल्या षटकांमध्ये विकेट घेण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. शेवटी ड्युनिथ वेलालगे आणि कामिंडू मेंडिस यांनी चांगली खेळी खेळून श्रीलंकेला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले.

 

जेफ्री वँडरसेने १० षटकांमध्ये केवळ ३३ धावा देऊन ६ गडी बाद केल्याबद्दल त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा