You are currently viewing सावली न मा जोशींची

सावली न मा जोशींची

*काव्य निनाद साहित्य पुणे समूहाच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*

 

*सावली न मा जोशींची*

*सौ चंदन न जोशी*

 

मंडळी, आपल्या परिचयाचे नेहमीचे एक वाक्य — “एका यशस्वी पुरुषाच्या मागे त्याची पत्नी असते”,आणि हे शंभर टक्के खरं आहे हेही आपल्याला माहीत आहे. आज या विधानाची आठवण येण्याचे कारण अशाच पडद्यामागे राहून आपल्या पतीच्या आनंदात आपला आनंद मानणाऱ्या चंदनासारखे आपले अख्खे आयुष्य झिजविणाऱ्या एक सरळ,निष्पाप ,

अल्पसंतुष्ट असणाऱ्या स्त्री बद्दल लिहिण्याचा माझा प्रयत्न वाचकांना नक्कीच आवडेल अशी खात्री आहे ती

स्त्री दुसरी – तिसरी कोणी नसून आपल्या अतिशय परिचयाची आहे. तिचे आतिथ्य आपण अनुभवलेले आहे.

 

राहण्याची व जेवण्याची फुकट व्यवस्था असलेल्या अमरावतीच्या सिकची वस्तीगृहात राहून शिक्षण पूर्ण केलेल्या आणि यवतमाळच्या दाते कॉलेजमध्ये प्राध्यापक तसेच

मानाचा “दर्पण पुरस्कार” मिळविणारे व ज्यांच्या पत्रकारितेचा डंका संपूर्ण महाराष्ट्राभर गाजतो आहे असे यवतमाळचे जेष्ठ पत्रकार न.मा.( जोशी) यांच्या पत्नी सौ.चंदन जोशी! हो! आज चंदन वहिनीविषयी लिहितांना मला अतिशय आनंद होत आहे,त्या मूळच्या धामणगावच्या! माहेरचे नाव चंद्रकला! वडील गावात पौरोहित्य करायचे ! जेमतेम उत्पन्नात 8-10 जणांचे कुटुंब चालवितांना वडिलांना अतिशय कष्ट पडत! त्यांचे कष्ट पाहून आपण लवकर शिकून मोठे झाले पाहिजे चांगली नोकरी मिळविली पाहिजे असे लहानग्या चंद्रकलेला नेहमी वाटायचे. त्यातच लग्नानंतर मोठ्या बहिणीचे शिक्षणाअभावी कसे हाल झाले ते प्रत्यक्ष दिसत होते. मोठ्या भावाच्या प्रोत्साहनाने व अभ्यासात हुशार असल्याने चंद्रकला BA झाली. त्याआधी मॅट्रिक झाल्याबरोबर तिने D.Ed केले. एक वर्ष नोकरीही केली.

आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने आपण काहीतरी केलेच पाहिजे ही तिच्या मनात जिद्द होती.हुशार,मनमिळावू चंद्रकला सगळ्यांची आवडती होती. लग्नाचे वय झालेच होते. वडील म्हणतील तिथे होकार द्यायचा अशी पद्धत असल्याने प्राध्यापक न मा चे स्थळ सांगून आल्यावर नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. त्यांच्याच रामराव- सुधाकर पोकळे मित्राकडे पहाण्याचा कार्यक्रम झाला लग्न ठरले .होणारा जावई यवतमाळच्या बाबाजी दाते महाविद्यालयात प्राध्यापक आहे असे कळल्यामुळे सगळे खुश होते व लवकरच मुहूर्त पाहून दोघांचे धामणगावातच शुभमंगल झाले ! माहेरची आर्थिक स्थिती खूप नाजूक असल्याने लग्न साध्या पद्धतीने झाले

नमा जरी प्राध्यापक असले तरी त्यांना मिळणारे वेतन अतिशय कमी व त्यांच्याही घरची आर्थिक स्थिती साधारणच! सामाजिक चळवळीतील एक भाग म्हणून नवीन कपड्यांऐवजी रोजच्याच बंगाली सदरा पायजमा कपड्यातला नवरदेव पाहून चंद्रकलेच्या एका आजीला खूप राग आला.असा कसा हा नवरदेव?जणू वैरागी शंकरच!पोरगी फसली बापा! असाही शेरा त्यांनी दिला !त्या आजीला काय माहीत की, हाच जावई पुढे किती कीर्तीमान होणार आहे? पूर्वाश्रमीच्या चंद्रकला व्यास आता सौ चंदन न .जोशी झाल्या त्या वेळी या नवीन नावाप्रमाणे आपल्याला चंदनाप्रमाणे झिजायचे आहे याची पुसटशी ही कल्पना वहिनींना नसेल. वहिनी यवतमाळला सासरी आल्या. दुसऱ्या मजल्यावर दहा बाय सातच्या एका भाड्याच्या खोलीत संसाराला सुरवात झाली. घरात वस्तू कामापुरत्या! एक स्टोव्ह आणि जेमतेम गरजा पूर्ण होतील इतकी भांडी! पाण्यासाठी खाली विहिरीवर जावे लागत होते. पाणी खालून आणायचं! हे अनपेक्षित अनोखे वैभव पाहून चकित झालेल्या वहिनी च्या डोळ्यात गंगा यमुना वाहिल्या नसतील तरच नवल!त्यांना वाटल होत आपला नवरा कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे, खूप पगार असेल ! आताअगदी सुखात राणीसारखे राहायला मिळेल ! पण इथे तर सगळं वेगळंच चित्र! सगळा दिवस काम करण्यात जायचा! परंतु वहिनी डगमगल्या नाहीत.आहे त्या परिस्थिती ला सामोरे जाण्याशिवाय पर्यायही नव्हता.*कभी तो छटेगा फिजासे अंधेरा ,कभी तो मधुर चांदनी रात होगी* असा सकारात्मक विचार करीत एक वर्ष संपले व ते घर बदलून दोघे तीन खोल्यांच्या भाड्याच्या घरात राहायला आले .सुगरण असणाऱ्या वहिनींनी संसाराला हातभार लावण्यासाठी पापड लोणची कुरड्या करून विकण्याचा घरगुती उद्योग सुरू केला. त्यात दिवसभर प्रचंड कष्ट, अंग मेहनत.करावी लागत असून आपण हार न मानता काही तरी करतो आहे याचा जास्त आनंद होता. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहताना नमाच्या काळजाचे पाणी पाणी होई! आपल्या सुशील गुणी पत्नीला होणारा त्रास पाहून त्यांचेही मन दुःखी होई पण नशिबी असेल ते तर भोगावेच लागते !

संसारवेलीवर मुलींच्या रूपाने तीन फुले उमलली. त्यांच्या बाललीलांनी घरात चैतन्य आले, व भाग्यलक्ष्मी प्रसन्न झाली.आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली ,, 74 साली न मा नोकरीला लागल्यानंतर 78 पासून तरुण भारतचे पत्रकारही झाले होते. त्यांच्या लेखणी आणि पत्रकारितेचा नावलौकिक वाढू लागला. पगारात ही वाढ झाली.लंकेची पार्वती असणाऱ्या वहिनींच्या अंगावर एखादा दागिनादिसू लागला. असतील शिते तर जमतील भुते ह्या म्हणीचा प्रत्यय येऊ लागला . नातेवाईकांच्या अपेक्षा वाढल्या कुरकुर न करता वहीनी सगळ्यांना मदत करीत, न मा एक पत्रकार! बाळासाहेब मराठें मा.गो.वैद्यच्या तालमीत तयार झालेले! त्यांच्या लेखणीची धार खूप बोचक! त्यामुळे त्यांचे हितशत्रू सुद्धा खूप! एकदा तर त्यांना ‘तू उद्याचा सूर्य पाहणार नाही’ अशी धमकीच जमवंतराव धोटे यांनी जाहीर सभेतून दिली होती. घरी येणारे जाणारे खूप ! या सगळ्यांचे हसत मुखाने स्वागत करणे त्यांना प्रेमाने खाऊपिऊ घालणे यात चंदन वहिनी रमल्या, न मा चे सत्कार, कौतुक त्यांची भगवान श्री सत्यसाई बाबावरील निष्ठा यात त्या पूर्णपणे समरस झाल्या. स्वतःचे अस्तित्व विसरून त्या पूर्णपणे नमा मय झाल्या. नमा नी गावाच्या बाहेर कमी किमतीत स्वतःचे मोठे घर बांधले .येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता वाढला. आर्थिक परिस्थिती बरी झाली. मुली आपल्या संसारात रमल्या. जावई कर्तृत्ववान मिळाले. नमा ना प्रतिष्ठेच्या ‘दर्पण’सह अनेक पुरस्कार मिळाले. सत्कार झाले.पतीच्या सुखात सुख मानणाऱ्या वहिनींना आणखी काय हवे असणार? मज काय हवे हो संसारी .. सुख आले माझ्या दारी अशा मनाच्या अवस्थेत वहिनी आनंदी आहेत. परंतु कधीतरी मागचे दिवस आठवतात !भोगलेले सारे क्षण मनात पिंगा घालतात ! लहानपणापासून आर्थिक चणचणीत राहावे लागले ,मन मारावे लागले अगदी क्षुल्लक इच्छा सुद्धा पूर्ण न होण्याचे ते दिवस आठवले तरी त्या अस्वस्थ होतात. क्लेशदायक आठवणींच्या जखमा उघड्या होतात. पण क्षणभरच! ये जीवन है इस जीवनका यही है यही है रंगरूप ,हो थोडी खुशीया थोडा गम ! हे दोघांनाही चांगलेच माहीत आहे ! मला वहिनींबद्दल प्रकर्षाने जाणवते की कुरकुर त्यांच्या स्वभावात अजिबात नाही! आहे त्यात आनंद मानण्याची त्यांची प्रवृत्ती असल्याने न मा आपले कार्य चांगले करू शकले याची कृतार्थ जाणीव व पत्नीबद्दल सार्थ अभिमान त्यांना नक्कीच आहे पत्नीबद्दल बोलतांना ते अतिशय भावुक होतात कोणत्या परिस्थितीत तिने घर सांभाळले हे व्यक्त करतात घरातील समस्याकडे त्यांना बिलकुल लक्ष द्यावे लागले नाही त्यामुळे ते प्राध्यापकी आणि पत्रकारितेला न्याय देऊ शकले. तेरा साथ है तो मुझे क्या कमी है हीच वहिनींबद्दल त्यांची निरंतर भावना असते अशा या एक दुजे के लिये जगणाऱ्या जोडप्याबद्दल कितीही लिहिले तरी कमीच पडणार

शेवटी या आदर्श जोडप्याबद्दल आदर व्यक्त करतांना म्हणावेसे वाटते *इस पॉंवसे ये पॉंव अच्छे*

 

प्रतिभा पिटके

अमरावती

9421828413

प्रतिक्रिया व्यक्त करा