*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*श्रावणातला शृंगार…*
अरे बा श्रावणा, आलास तू. स्वागत आहे तुझे.
तसा तू आम्हा साऱ्यांचा लाडकाच, नाही का?
खरं तर दर वर्षीच तू येतो. तरी किती ओढ लावतोस रे! पूर्वीच्या कवींचा तर तू केवढा लाडका. “श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ
दाटे चोहिकडे॥ क्षणात सरसर सरसर शिरवे
क्षणात फिरूनी ऊन पडे॥” वा.! साक्षात तुझी
प्रतिमाच उभी केली त्यांनी नि तू अजरामर झालास. बालकवींचा तू जरा जास्तच लाडका
होतास. म्हणून श्रावणात फुललेल्या निसर्गावर
कितीतरी कविता केल्या त्यांनी.
मला मी लहान असतांनाचा खेड्यातला श्रावण
आठवतो. खेड्यात रस्ते मातीचे. जिकडे तिकडे
चिखल पण रस्त्याच्या कडेने श्रावणात गवताला भाले फुटावेत तशा त्या दुर्वा नि गवतात उगवलेला तो आघाडा, ती चिमुकली
हिरवट पिवळी टणटणची फुले, नि काटेरी
झुडुपांना लागून ती गोकर्णी व आवळीला आलेले दाट फुलांचे पिवळे गुच्छ! अजून ते दृश्य डोळ्यांसमोर दिसते रे.आणि सणवार..
ते सोबत घेऊन तू येतोस ना? म्हणून तर तुझे
कौतुक जास्तच. हरतालिका पूजा, नाग पंचमी,
श्रावणी सोमवार, त्या मंगळागौरी.. चैन रे बाबा
चैन. मी तर आईची भली मोठी नऊवार नेसून
दिवसभर ह्या घरी त्या घरी मिरवत असे.
रानातून मेंदीची हिरवीगार पाने काट्यातून
ओरबाडून आणून पाट्यावर वाटायची व ती पेस्ट आई हाताला चोपडून आई दोन्ही मुठी घट्ट फडक्याने आवळून बांधून देत असे. हो नाही तर सगळ्या अंथरूणावर मेंदी. मग सकाळी हात सोडताच त्यांना पाण्याच्या सुरकुत्या. मग हातांना खोबरेल तेल लावून
चोळायचे. मग त्या मेंदीला काय रंग चढायचा!
वाह रे वा! लाल भडक रंगलेली ती मेंदी पाहून
स्वर्ग दोन बोटेच रहात असे. मग ती मेंदी लवकर निघणार कशी नाही याची काळजी
करत फिरायचे.
आमचा सालदार घरातच तुळईला दोर अडकवून झोका बांधून द्यायचा. घरोघर झोका
असे. मग बायका नटून थटून घरातच पिंडीची
स्थापना करून भटजी बोलावून फूल पत्री नारळ आणून पूजा करत. साऱ्यांचाच उपवास
असे.मग खेळ. गप्पा जागरणं गमती जमती
चालत.नागपंचमीला पांढरीत नागोबाला वारूळात दूध द्यायला जायचे. सुना, म्हाताऱ्या
पोरी सोरी साऱ्याच पुजेला बसत.चहापाणी होई.सारा कसा आनंद फुललेला असायचा.
मंदिरात तर सप्ता बसत असे. अखंड पूजा व भजन कीर्तन चालत असे. देव कसे प्रसन्न दिसत असत. दिवसभर मंदिरात गावकऱ्यांची
वर्दळ असे. अजून खेड्यातले मरीआईची पूजा
वगेरे सण असतच ते वेगळे. एकूणच खरोखर
तू आनंद घेऊन येतोसच पण उत्साह किती वाढ वतोस. गावागावात जणू चैतन्य फुललेले असते. गरीबातला गरीबही आपल्यापरीने सण
साजरा करतोच. पूजा करतांनाची बायकांची
ती तयारी अजून मला डोळ्यासमोर दिसते. सुनांच्या त्या चापूनचोपून नेसलेल्या ठेवणीतल्या साड्या, गजरे, नाकात नथ, पायात
पैंजणे, जोडवे, मासोळ्या, हातभरून हिरवीगार काकणे व डोक्यावरून पदर.
साक्षात लक्ष्मी अवतरल्याचा भास होत असे
सर्वांना.अशा त्या पूजे भोवती बसल्यावर साक्षात पृथ्वीवर स्वर्ग अवतरल्याचा जणू देवदेवता नटून थटून आल्या की काय असे
वाटत असे. श्रावण अधिकच सुंदर दिसत असे.
म्हणजे बघ, तू अंगोपांगी नटतोसच. शेत शिवार कसं हिरवकंच वाऱ्यावर डोलत असतं.
फुलोऱ्याला आलेल्या बाजऱ्या, ज्वाऱ्या, मूग,
चवळी, तूर, मका सारे कसे हवेवर गिरक्या घेत
डोलत असतात. पक्ष्यांच्या चादरी त्यावर झेपावत असतात. मोठे देखणे दृश्य असते ते.
एकूणच मनामनात तुझेच राज्य असते बाबा असा तू लडिवाळ आहेस. तू म्हणजे फुललेला
निसर्ग, फुले, फुलपांखरे हिरवाईचा कहर नि
सृष्टीला आलेला बहर, होय ना? नदीनाले तुडुंब
असतात,शेतकरी तृप्त असतात. तू म्हणजे शिगोशिग भरलेला अमृताचा कलश! तुझ्या विषयी लिहावे तेवढे थोडेच! बाय बाय..
येते आता…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)