*बांदा भाजपा शिष्टमंडळाची प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट*
*रुग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा घेतला आढावा, ग्रामिण रुग्णालयासाठी करणार प्रयत्न*
बांदा
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधा व इतर सेवा यांचा आढावा घेण्याकरीता आज बांदा भाजपाच्या शिष्टमंडळाने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गजानन सारंग व मयुरेश पटवर्धन यांची भेट घेत चर्चा केली.
बांदा दशक्रोशीच्या लोकसंख्येचा व दररोज दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येचा विचार करता आवश्यक सोईसुविधा नसल्याने रुग्णांना गोवा राज्यात पाठवावे लागते. ज्यात योग्य वेळी उपचार न मिळाल्याने अनेकदा रुग्णांचा मृत्यू देखील होतो.त्यामुळे याचा गांभीर्याने विचार होऊन येथे कीमान ३० कॉटचे ग्रामीण रुग्णालय मंजूर होणे अत्यंत गरजेचे आहे, असे यावेळी शिष्टमंडळार्फे सांगण्यात आले. तसेच त्याकरीता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. महिला परिचारिकेची नेमणूक नसल्याने शहर व ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला रुग्णांना त्याचा प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो हे देखील यावेळी गुरु कल्याणकर यांनी निदर्शनास आणून दिले. व महिला परिचारिकेची मागणी केली.त्याचप्रमाणे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शिपाई व सफाई कर्मचारी यांची नियुक्ती करण्याची देखील मागणी करण्यात आली. दैनंदिन आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक अशा ज्येष्ठ नागरिकांकरिता च्या रक्तदाबाच्या गोळ्या, रेबीज व सर्पदंशावरील इंजेक्शन्सची कमतरता, गरोदर माता यांना आयरन व कॅल्शियमच्या गोळ्या अशा अनेक औषधांची कमतरता असल्याचे निदर्शनास आणून दिले.यावर वैद्यकीय अधिकारी यांना त्वरीत मा.पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांचे नावाने मागणीपत्र तयार करण्यास सांगितले. सदर मागणीपत्र पालकमंत्री यांना सादर करून सर्व अडचणी दूर करण्याबाबत मागणी करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी दाखल झालेल्या रुग्णांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रुग्णांनी देखील विचारपूस केली गेल्याने त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक,उपसरपंच राजाराम सावंत, माजी पंचायत समिती सभापती शितल राऊळ, माजी उपसरपंच जावेद खतीब, गुरु कल्याणकर, निलेश उर्फ पापु कदम, बाबा काणेकर, रत्नाकर आगलावे, शामसुंदर मांजरेकर, गुरुनाथ सावंत,शैलेश केसरकर, व्यंकटेश उरुमकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
======================
जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री रवींद्रजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेली टेलीमेडिसीन सारखी व्यवस्था बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे.ज्याद्वारे हृदयरोग, किडनी व इतर गंभीर रोगांवरील रुग्णांची इसीजी व इतर महत्त्वाची तपासणी करून त्वरित मुंबई,पुणे येथील तज्ञ डॉक्टरांकडून ऑनलाइन तपासणी करून लगेचच औषधे दिली जातात.परंतु याची माहिती नागरिकांना न मिळाल्यामुळे त्याचा फायदा होत नाही. तरी बांदा दशक्रोशीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी या व्यवस्थेचा उपयोग करावा – प्रियांका नाईक, सरपंच, बांदा
========================