*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*शक्ति…*
शक्ति म्हटल्या बरोबर किती प्रकारची शक्ति
डोळ्यांसमोर आली.दृश्यमान शक्ति व अदृश्य
शक्ति. अदृश्य शक्तित सर्वात महान जिची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही अशी परमेश्वरी शक्ति म्हणाल तर दृश्यमान आहे,
म्हणाल तर अदृश्य आहे. अहो, माणसाचा जन्म हे तिचे केवढे महान कार्य आहे. त्याला
कुणीच चॅलेंज देऊ शकत नाही. माणसाचे शरीर बनणे, ते व्यवस्थित चालणे, हृदय स्पंदंनांपासून ते दृष्टी, ही सृष्टी.. दिसणे, प्रत्येक अवयवाची निर्मिती, हृदयाचे कार्य..
अबबबबबबबब … केवढे अफाट कार्य आहे या
अदृश्य शक्तिचे! माणूस हेच एक उदा. म्हणून
पुरेसे आहे, म्हणजे ही शक्ति कमाल आहे.
तिची सृष्टी निर्मिती हा तर चमत्कारच आहे. बिया, झाडे, त्यांचे वाढणे फुलणे फळणे हा केवढा मोठा चमत्कार या शक्तिचा आहे. झाडे
वाढतांना दिसतात पण प्रत्यक्ष आत जे काम चालते, ते कसे चालते हे कुठे आपण पाहू शकतो. आपण विज्ञानाने फक्त त्याचा अन्वयार्थ लावतो. ते आतले कार्य दृश्यमान नाही. बाहेर फक्त दिसते.आणि विविधता किती! पूर्ण विश्वात काहीच सारखे नाही, मुंगी पासुन ते हत्ती पर्यंत सगळे वेगवेगळे. केवढा चमत्कार आहे हा.
वीज.. दिसत नाही पण सारी अफाट अवजड अशी कामे हीच शक्ति करते तीही अदृश्यच
आहे ना? वारा दिसत नाही पण वादळ झाला की काय वाहून नेईल सांगता येत नाही. प्रचंड
ताकद आहे त्याची.तो ही यंत्रे हलवून वीज
निर्माण करतो.मोटारी चालवतो.
पाणी ही सुद्धा अफाट शक्ति आहे. डोंगर कडे
झाडे गावे सारे तडाख्यात सापडले की वाहून
जातात, सध्या आपण बघतो आहोत. केवढी
प्रचंड शक्ति आहे पाण्यात, होत्याचे नव्हते करून सोडतो.
सगळ्यात मोठी गुरूत्वाकर्षण शक्ति जिच्या मिळे स्थीर एका जागी बसून मी लिहिते आहे.
त्या ग्रहांनी एकमेकांचा तोल सांभाळलेला आहे, नाही तर बघता ना, चंद्रावर आपण कसे
हवेत उडतो.
किती अगणित शक्ति आहेत हो जगात. या सर्व निसर्ग शक्तिंपुढे आपण कस्पटासमान
आहोत. सूर्य चंद्र ग्रह तारे वारे पाणी वीज जमीन या साऱ्याच आपापल्या जागी महान
शक्ति आहेत. इतक्या की या प्रत्येक शक्तिवर
एक एक मोठा लेख होऊ शकतो. ही जमीन, एरव्ही किती शांत, उपजाऊ, सुजलाम, सुफलाम, अखिल विश्वाचे भरण पोषण करणारी.. पण ती आतून जेव्हा तापते, आतील
लाव्हा सळसळतो तेव्हाचा तिचा धरणीकंप किती भयावह असतो हे १९९२ च्या भुकंपात आपण चांगलेच अनुभवले आहे. पार ती माणसाचा चोळामोळा करून फेकून देते किंवा
तिच्या आत गाडून टाकते. ३०/३० मजल्याच्या इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळतात,
माणसाचा पार कचरा होतो व त्याचे गर्वाचे घर क्षणात खाली येते. इतक्या या साऱ्या निसर्ग
शक्ती म्हटल्या तर महान नाहीतर विध्वंसक आहेत. त्यांच्या पुढे कुणाचाही टिकाव लागत नाही.
एरव्ही स्वत:ला सर्वशक्तिमान समजणारा माणूस हतबल होतो तो फक्त नि फक्त या निसर्ग शक्तिपुढेच. भले त्याच्या प्रचंड बुद्धीमत्तेने तो परग्रहावर गेला तरी या नैसर्गिक
शक्तिपुढे त्याचे काही चालत नाही. भयंकर पुरात शेकडो माणसे वाहून जातांना तो फक्त
हतबलतेने त्यांच्याकडे पाहत राहतो, फार फार
तर एअरलिफ्ट करण्याचा प्रयत्न करतो बस्स.
पुरात उडी घेऊन तो शक्तिचे प्रदर्शनही करू शकत नाही कारण तो स्वत:च बुडण्याचा धोका असतो.शेवटी माणसाने आपल्या बुद्धीमत्तेचा कितीही गर्व केला तरी या निसर्ग
म्हणा किंवा परमेश्वरी म्हणा शक्तिपुढे त्याला
हार मानावीच लागते.
मंडळी….
व्यवहारातील शक्तिचे उदा. म्हणजे माणूस.
अगदी चाळीस किलो वजन असलेला माणूस
त्याच्या बुद्धी कौशल्याने मोठी इंडस्ट्री चालवतो हे त्याच्या मानसिक शक्तिचे फलित
आहे. एखादी महिला पंतप्रधान एवढा मोठा देश सांभाळते तेव्हा हा तिच्या मानसिक शक्तिचा विजय होय.
आपण हनुमानाला शक्तिचे प्रतिक मानतो पण
त्यालाही परमेश्वरी शक्तिचा परिसस्पर्श झालेला असतो हे आपल्याला माहित आहे.
आपल्या घरात आपली आई आपली शक्ति
असते. ती नुसती घरात आहे म्हटल्यावर आपल्याला अनेक हत्तींचे बळ येते.
मंडळी, अजून एक शक्ति जिच्यावर आपला
विश्वास नव्हे ठाम विश्वास आहे, असा परमेश्वर व गुरू यांची अदृश्य कृपा किंवा पाठींबा आपल्याला असतो व त्यांच्या भरवशावरच आपण विश्वासाने पावले टाकतो,
किंबहुना तो आपल्या जीवनाचा मोठाच आधार असतो हे कुणीही अमान्य करूच शकत
नाही. कट्टर नास्तिकही संकटात म्हणतो, देवा रे, वाचव मला आता.कुणी मान्य करो न करो त्यांचे अनुभवही आपल्याला येतात हे ही खरेच
आहे. यातून क्वचितच कुणी सुटला असेल असे मला वाटते. अर्थात, शेवटी हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. असो.
तर मंडळी, शक्तिची खूप उदा. अजून देता येतील जी तुम्हालाही माहित आहेत म्हणून
थांबते आता.
जय हिंद.. जय महाराष्ट्र…
आपलीच,
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)