सावंतवाडी:
सावंतवाडी तालुक्यातील वीज समस्या सुटता सुटत नसल्याने गावागावांतील लोकांना एकत्र आणून महावितरण व्यवस्थेवर दबाव निर्माण करण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंचांसोबत वीज ग्राहक संघटना सावंतवाडीने शनिवार दिनांक ३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता मळगाव ग्रामपंचायत कार्यालय शेजारील पेडणेकर हॉल मध्ये आयोजित करण्यात आली आहे. यावेळी वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुका व जिल्हा पदाधिकारी मार्गदर्शन करणार असून बैठकीसाठी सावंतवाडी तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच यांनी उपस्थित रहावे असे आवाहन वीज ग्राहक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
सावंतवाडी तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरात वीज ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील जनता संयमी व शांत असल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून कामात दिरंगाई होते, कित्येक कामचुकार अधिकारी ग्राहकांना उद्धट, उर्मट उत्तरे देतात. महिला सरपंचांशी देखील अरेरावीच्या भाषेत बोलतात, कोणाच्याही फोनला उत्तर देत नाहीत अशा कामचुकार उद्धट अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तालुक्यातील वीज ग्राहकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. वीज ग्राहक संघटना ही महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून व्यापारी संघाच्या अधिपत्याखाली काम करत असलेली पक्ष विरहित संघटना आहे. तालुक्यातील सर्व सरपंचांनी एकत्र येऊन वीज समस्यांना सोडविणे ही काळाची गरज आहे. यासाठीच सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या वतीने सरपंच, उपसरपंचांसोबत बैठक आयोजित केली आहे.