*मनस्पर्शी साहित्य परिवारच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वेडा छंद*
जसे कोळियाचे जाळे
तसे माझे काही झाले
छंद म्हणू की हे वेड
त्यात अडकत गेले
असा खेळ अक्षरांचा
मज आवडला भारी
खेळ खेळता कळाले
हीच जादूई नगरी
होता छंद अक्षरांचा
शब्द सापडले नवे
गुंफतांना कवितेत
आले शब्दांचे ते थवे
शब्दातुनी त्या जन्मल्या
काही सुंदरशा ओळी
ओळीतुनी जन्मा आली
कविताच साधीभोळी
छंद जडावा चांगला
वेड त्याचेच लागावे
अशा वेड्या छंदावर
प्रेम नितांत करावे
@अरुणा गर्जे