*मांगेलीत पहाटेच्या सुमारास भूस्खलन
*दोडामार्ग
निसर्ग संपन्न व डोंगर दऱ्यांनी नटलेल्या, पर्यंटन दृष्ट्या विकसित होणाऱ्या आणि दोडामार्ग तालुक्याचे शिखर असलेल्या मांगेली गावातील कुसगेवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर आज पहाटे दरड कोसळल्याची घटना घडली. ग्रामस्थ या घटनेने भयभीत झाले असून मोठ्या प्रमाणात केले जाणारे काळे दगड उत्खनन व ते दगड फोड करण्यासाठी केले जाणारे मोठे सुरुंग स्फ़ोट या भुस्खलनाला कारणीभूत असल्याचे स्थानिक गावाकऱ्याचे म्हणणे आहे. आजच्या या घटनेत कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही एवढे मात्र दिलासादायक आहे. मात्र मांगेली-कुसगेवाडी-दोडामार्ग हा रस्ता बंद झाल्याने वस्तीची एस.टी. बस तसेच कामावर जाणारे चाकरमानी अडकून पडले.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सदर भुस्खलन मांगेली कुसगेवाडी दोडामार्ग रस्त्यावर झाले. यामुळे हा मार्ग ठप्प झाला आहे. तीन चार वर्षांपूर्वी मांगेलेतील काही डोंगराना भेगा गेल्या होत्या त्यावेळी तिथल्या नागरिकांनी भुस्खलन व डोंगर कोसळण्याची भीती व्यक्त केली होती. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून उपाययोजना करू असे म्हटले होते मात्र त्यांनतर कोणतीही हालचाल झाली नाही ज्या ठिकाणी पहाणी झाली त्या ठिकाणी जरी भुस्खलन झाले नसले तरी मांगेली गावातील देऊळवाडी, कुसगेवाडी, फणसवाडी आदी भागात भुस्खलनाचा धोका आहे, याचे मुख्य कारण मोठ्या प्रमाणात केले जाणारे सुरुंग स्फ़ोट तसेच या भागात परप्रांतीय लोकांनी जमिनी खरेदी करून केलेली मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड आहे, यावर योग्य ती कारवाई करून मांगेली वासियांचे रक्षण व्हावे अशी मागणी स्थानिकातून होतं आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभाग यांचे दुर्लक्ष ही कारणीभूत असून त्यांच्या दुर्लक्षा मुळे रस्ता धोकादायक बनल्याचे गावाकऱ्यानी सांगितले.